गांधीनगर : भारतीय सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर स्वदेशी बनावटीची शस्त्रसंपदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय हा आत्मनिर्भर भारताची क्षमता दाखविणारा आहे. जागतिक पातळीवर शस्त्रांच्या निर्मितीमध्ये काही मोजक्या कंपन्यांचे वर्चस्व असताना देखील भारताने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. यातून शस्त्रनिर्मितीमधील भारताचा वाढत जाणारा आत्मविश्वास दिसून येतो, असेही मोदी म्हणाले. ते येथे आयोजित ‘संरक्षण प्रदर्शन-२०२२’ च्या उद््घाटनप्रसंगी बोलत होते.
मोदी म्हणाले की, ‘‘ भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात २०२१-२२ मध्ये तेरा हजार कोटी रूपयांवर पोचली असून येत्या काही दिवसांमध्ये आम्हाला चाळीस हजार कोटी रूपयांचे ध्येय गाठायचे आहे.’’ मोदींच्या हस्ते यावेळी भारत- पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या उत्तर गुजरातमधील बनासकांठा येथे दिसा या नव्या हवाई तळाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. ‘देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने एक प्रभावशाली केंद्र म्हणून हे हवाई तळ ओळखले जाईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आधी आपण कबुतरे सोडत असू आता चित्त्यांना सोडत आहोत, असेही त्यांनी सांगितले. मोदींनी यावेळी सागरी सुरक्षा आणि अंतराळ तंत्रज्ञानाचे महत्त्व देखील विशद केले. सागरी सुरक्षेचा मुद्दा वैश्विक प्राधान्यक्रमाचा विषय म्हणून पुढे येऊ लागला असल्याचे त्यांनी सांगितले. आता संरक्षणक्षेत्राशी संबंधित ४११ उत्पादनांची निर्मिती स्थानिक पातळीवर होईल त्यामुळे भारततातील संरक्षण उद्योगाला मोठा बूस्टर डोस मिळेल, असे ते म्हणाले.
नौदलाची भूमिका बदलली
भविष्यातील संधींचा वेध घेण्यासाठी भारताला स्वतःची संरक्षणसज्जता आणखी वाढवावी लागेल, भारत- प्रशांतमधील भारताचे अस्तित्व सर्वसमावेशक अशाप्रकारचे आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराला असलेली जागतिक सुरक्षा, सागरी सुरक्षा हे प्राधान्यक्रमाचे विषय म्हणून पुढे आले आहेत. जागतिकीकरणाच्या काळामध्ये मर्चंट नेव्हीची भूमिका देखील आमूलाग्र बदलली आहे. जगाकडून भारताच्या अपेक्षा वाढल्या असून भारत त्या अपेक्षा पूर्ण करेल. हे संरक्षणविषयक प्रदर्शन जगाचा भारतावर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे, असेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले
भारत- आफ्रिका सहकार्य नवी उंची गाठत आहे
भारताची संरक्षण निर्यात आठपटीने वाढली
भारताच्या क्षमतांमुळे जगाचा आपल्यावर विश्वास
आपण ७५ देशांना शस्त्रसंपदेचा पुरवठा करतो
धोरण, सुधारणा, ईज ऑफ डुईंग बिझिनेसचा लाभ
अर्थसंकल्पातील ६८ टक्के रक्कम कंपन्यांसाठी राखीव
चारशेपेक्षाही अधिक उत्पादनांना मेक ईन इंडियाचा टच
अवकाशातील संधींसाठी तयारी वाढवावी लागेल
‘फाइव्ह-जी’मुळे शिक्षणाला उंची
अदालज (गुजरात) : फाइव्ह-जी प्रणालीमुळे देशाची शिक्षण व्यवस्था एका वेगळ्या पातळीवर जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ते गुजरात सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स इनिशिएटिव्ह’च्या उद् घाटनप्रसंगी बोलत होते. इंग्रजी ही केवळ संवादाची भाषा असताना देखील तिला विद्वत्तेचे लक्षण मानले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘फाइव्ह-जी’ची सेवा स्मार्ट सुविधा, स्मार्ट क्लासरूम आणि स्मार्ट अध्यापनाच्याही पुढे गेली असून यामुळे आमची शिक्षणप्रणाली एका वेगळ्या उंचीवर पोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.