Ayodhya Ram Mandir Inauguration : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा भारत उत्सुक

प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परतल्यानंतर अयोध्यावासीयांनी साजरा केलेल्या आनंदोत्सवाची अनुभूती पुन्हा घेण्याची संधी देशवासीयांना सोमवारी लाभणार आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration
Ayodhya Ram Mandir InaugurationSakal
Updated on

- आशीष तागडे

अयोध्या - देशातील विविध राज्यांतील वादकांच्या मंगलवाद्यांच्या मंगलध्वनीमध्ये, १२१ वेदशास्त्रसंपन्न पुरोहितांच्या वेदमंत्रघोषांत आणि देशविदेशातील अगणित भाविकांच्या जयघोषात सोमवारी (ता. २२) दुपारी अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राममंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

हा भावनिक क्षण साकार होताना पाहण्यासाठी हजारो जण अयोध्येत आले आहेत. या ऐतिहासिक घटनेसाठी प्रभू श्रीरामांची अयोध्या फुलांनी, ध्वजांनी आणि दिव्यांच्या माळांनी सजली आहे.

प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परतल्यानंतर अयोध्यावासीयांनी साजरा केलेल्या आनंदोत्सवाची अनुभूती पुन्हा घेण्याची संधी देशवासीयांना सोमवारी लाभणार आहे. सुमारे ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिराची निर्मिती होऊन त्यात रामलल्ला पुन्हा विराजमान होणार आहेत.

यानिमित्त अयोध्येमध्ये घराघरांवर भगवे ध्वज, गुढ्या तोरणे उभारण्यात आली आहेत; चौकाचौकांत सजावट करण्यात आली असून मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. सर्वत्र असलेली स्वच्छता, घरांच्या आणि दुकानांच्या भिंतींना केलेली रंगरंगोटी आणि रस्त्यारस्त्यांवर काढण्यात आलेल्या रांगोळ्या यांनी अयोध्येचे रुपडे अक्षरशः पालटले आहे. या आनंदोत्सावत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अयोध्या नगरीमध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून देशातील बहुतांश राज्यांमध्ये विविध मठमंदिरांमध्ये हा कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

देशभरातून सात हजार निमंत्रित

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील सात हजार जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये कला संस्कृती, साहित्य, क्रीडा, विज्ञान यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. देशातील १५० पेक्षा अधिक संप्रदायांच्या धर्माचार्यांना या कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विविध संप्रदायांचे सुमारे चार हजार संत-महंत, उपस्थित राहणार आहेत.

दिवसभर कार्यक्रम

अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठेचा विधी दुपारी होणार असला तरी अयोध्येमध्ये सोमवारी दिवसभर कार्यक्रम होणार आहे. अयोध्येमध्ये सोमवारी संध्याकाळी ऐतिहासिक स्थळे, शरयू तीर, हनुमान गढी, कनक भवन आणि लता मंगेशकर चौक यांसह विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून दहा लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घराघरांत राम ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहे.

असा असेल मुख्य कार्यक्रम

अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा विधी १६ जानेवारी पासून सुरू करण्यात आला असून बहुतांश विधी २१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेदिवशी म्हणजेच सोमवारी अगदी मोजकेच विधी होणार आहेत. सोमवारी सकाळी राममंदिरामध्ये १० ते १२ या दरम्यान देशभरातून बोलाविण्यात आलेल्या वादकांचे मंगलवाद्य वादन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या सर्व विशेष निमंत्रितांना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात होणार आहे. काशीचे विद्वान पंडित गणेश्‍वर शास्त्री द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली काशीचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित आणि १२१ पुरोहितांच्या वेदघोषामध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास हे उपस्थितांना आशीर्वचन देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()