आझमगड (उत्तर प्रदेश) - आझमगड लोकसभा मतदारसंघात २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सपला धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सपचे उमेदवार धर्मेंद्र यादव यांनी संपूर्ण ताकद पणास लावली असल्याचे या मतदारसंघाचा दौरा करताना दिसून आले. धर्मेंद्र यादव यांचा मुकाबला भाजपचे उमेदवार भोजपुरी अभिनेते दिनेशलाल निरहुआ यांच्याशी होत आहे.
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आझमगडमध्ये सपचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी विजय मिळवला होता. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. आझमगड हा सपचा बालेकिल्ला मानला जातो. यादव-मुस्लिम मतांवर येथील जय-पराजयाचे समीकरण निश्चित होत असते.
आझमगडमध्ये आतापर्यंत २० वेळा निवडणुका झाल्या असून त्यातील तब्बल १७ वेळा यादव-मुस्लिम उमेदवाराने विजय प्राप्त केला आहे. यातही यादव समाजातील नेत्यांनी १४ वेळा तर मुस्लिम समाजातील नेत्यांनी तीन वेळा विजय मिळवला होता.धर्मेंद्र यादव हे अखिलेश यांचे चुलत बंधू आहेत. सुमारे १९ लाख मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघातील यादव व मुस्लिम समाजाची मते ४५ टक्क्यांवर आहेत. दलित मतदारांची संख्या २० टक्के इतकी आहे.
२०२२ च्या पोटनिवडणुकीवेळी बसपतर्फे गुड्डू जमाली यांनी दोन लाख मते घेतली होती. तर दिनेशलाल निरहुआ यांचे विजयाचे फरक अवघा आठ हजार एवढा होता. जमाली हे अलीकडील काळात सपमध्ये आले आहेत. याचा धर्मेंद्र यादव यांना फायदा होऊ शकतो. बसपने या मतदारसंघात आधी भीम राजभर यांचे नाव जाहीर करण्यात आले. नंतर सबिहा अन्सारी यांना तिकीट देण्याची घोषणा झाली.
सरतेशेवटी सबिहा यांचे पती मशहूद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली. अहमद हे फारसे परिचित नाहीत. त्यामुळे सप आणि भाजप हा दोन्ही पक्षांची चिंता वाढली आहे. धर्मेंद्र यादव व निरहुआ हे दोघेही यादव समाजातले आहेत. त्यामुळे सपच्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई होत आहे. महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सपने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
खासगीकरणामुळे भुर्दंड
वीज-पाण्यासह अन्य सेवांचे खासगीकरण झाल्याने लोकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय महागाई वाढल्याने जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याचे प्रदीप सोनकर नावाच्या रिक्षा चालकाने सांगितले. भाजपच्या काळात समस्या वाढल्या आहेत, त्यामुळे आम्ही सपला मत देणार आहोत, असे दुकानदार इस्माईल शेख यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले.
तर रस्त्यांची कामे, नव्याने बनलेले विमानतळ आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे निरहुआ यांचा विजय पक्का असल्याचे राजेश यादव नावाच्या फळ विक्रेत्याने सांगितले. सप नेते दिवंगत मुलायमसिंह यादव यांचे बंधू अभयराम यांचे धर्मेंद्र यादव पुत्र आहेत. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी २००४ मध्ये मैनपुरीमधून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.
धर्मेंद्र यांनी तेव्हा बसपच्या अशोक शाक्य यांचा १.७ लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी बदायूं मतदारसंघातून विजय प्राप्त केला होता. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील आक्रमक नेते अशी धर्मेंद्र यादव यांची ओळख आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.