केंद्राच्या मदतीनेच बॅंकांचे घोटाळे - राहुल गांधी

केंद्राच्या मदतीनेच बॅंकांचे घोटाळे - राहुल गांधी
Updated on

अथणी - एकीकडे देशात शेतकऱ्यांना मदत करण्यास केंद्र सरकारकडे पैसे नाहीत, तर दुसरीकडे बॅंकांचे रोज नवे घोटाळे बाहेर येत आहेत. नीरव मोदीसारख्या उद्योजकाने बॅंकेकडून कर्जरूपाने ११ हजार कोटी पळविले. अशाप्रकारचे बॅंकांचे मोठे घोटाळे हे पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या मदतीशिवाय होणे शक्‍यच नाही, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (ता. २४) केला.

तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्याला राहुल गांधी यांनी बेळगाव जिल्ह्यातील अथणीतून आज प्रारंभ केला, त्यावेळी आयोजित जनआशीर्वाद यात्रेच्या सभेत ते बोलत होते.

दृष्टिपथात....

  •  राहुल गांधी यांचे १.५२ वाजता व्यासपीठावर आगमन
  •  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शक्तिप्रदर्शन
  •  उन्हाच्या प्रखरतेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांचे हाल
  •  जिल्ह्यातून कार्यकर्त्यांसाठी हजारो वाहनांची गर्दी
  •  राहुल गांधींकडून कानडी भाषेत बोलण्याचा प्रयत्न

श्री. गांधी पुढे म्हणाले, ‘‘कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर असताना एक मुख्यमंत्री व चार मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले. त्यांतीलच एक असलेल्या येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली मोदी व अमित शहा यांचा पक्ष येथील निवडणूक लढविणार आहे. एकीकडे स्वच्छ कारभाराची पोकळ आश्‍वासने द्यायची आणि जेलमध्ये जाऊन आलेल्यांवर विश्‍वास दाखवायचा, हे लोकांना कळून चुकले आहे. भाजप अध्यक्षांच्या मुलाच्या गैरव्यवहारावर कोणी बोलायला तयार नाही. उलट कर्नाटकात काँग्रेसचे सरकार विकसनशील व पारदर्शी आहे. देशाला, सर्वांना सोबत घेऊन विकासाकडे नेण्यासाठी काँग्रेसची गरज आहे.’’

काँग्रेसकडून ‘काम की बात’
केंद्रातील भाजप सरकारने दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. मात्र राज्यातील काँग्रेस पक्षाच्या सरकारने दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण केली आहेत. मोदी ‘मन की बात’ करतात तर काँग्रेस ‘काम की बात’ करते. कर्नाटकाला समानतेतून जोडणाऱ्या व आपल्या तत्त्वांमुळे महात्मा बनलेल्या बसवेश्‍वरांच्या तत्त्वाला मूठमाती दिलेल्या भाजपला सत्तेपासून रोखावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

काळा पैसा आणला काय?
ते पुढे म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदींनी गेल्या निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पाळलेली नाहीत. १५ लाख रुपये बॅंक खात्यावर जमा केले काय? विदेशातील काळा पैसा आणला काय? वर्षाला २ कोटी बेरोजगारांना रोजगार दिला काय? शेतकरी, युवक, महिला, दीनदलितांसाठी काय केले? बसवेश्‍वर खोटे बोलू नये, रागावू नये, चोरी करू नये, असे सांगतात; पण त्याच्या उलट केंद्रातील भाजप सरकार काम करत आहे.

देशातील शेतकरी संकटात असून, त्यांच्यासाठी काय करता, असे मी पंतप्रधान मोदी यांना विचारले आहे. परंतु, त्याचे आजवर उत्तर काही आलेले नाही. उलट कर्नाटकात काँग्रेस सरकारने ८ हजार कोटींची शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. शेतीसाठी तीनपट निधी वाढविला आहे.’’ 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर, डी. के. शिवकुमार, आमदार सतीश जारकीहोळी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लक्ष्मी हेब्बाळकर, हरिप्रसाद, अशोककुमार असोदे, खुर्शिद सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले.

सभेस पालकमंत्री रमेश जारकीहोळी, के. वेणुगोपाल, बेळगाव विभाग संपर्कप्रमुख मणिकम टागोर, के. एच. मुनियप्पा, एस. आर. पाटील, रोशन बेग, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, विवेकराव पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, श्रीमंत पाटील, शहाजहान डोंगरगाव, वीरण्णा मत्तीकट्टी, शाम घाटगे यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते.

राज्य सरकार जनहिताचे - सिद्धरामय्या
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘नरेंद्र मोदी कर्नाटकात येतात; पण विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. तपास संस्था त्यांच्या ताब्यात असताना कोणतीही चौकशी अथवा अहवाल नसताना काँग्रेस सरकार १० टक्के कमिशनचे सरकार, असा खोटा आरोप करतात. बेजबाबदारपणे केलेले आरोप सिद्ध करून न दाखविल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाला लायक नाहीत. राज्यातील सरकार पारदर्शी व जनहिताचे आहे.’

कर्नाटकवर बोलण्याचा अधिकार नाही
बसवेश्‍वरांच्या भूमीत येऊन त्यांना नमन करता; पण त्यांच्या तत्त्वांचा सन्मान न राखणाऱ्या व निवडणुकीत दिलेली आश्‍वासने न पाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील कर्तबगार काँग्रेस सरकारच्या कारभारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला राहुल गांधी यांनी मारला. अलीकडेच मोदी यांनी कर्नाटक दौऱ्यावर असताना कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार हे कमिशनचे सरकार असल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार आज खुद्द राहुल गांधी यांनीच घेतला. केंद्र सरकारला कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या स्वच्छ कारभाराचीच भीती असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.