बिहारमध्ये सत्ताबदलाने राजकीय समीकरण बदलले असले तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुन्हा नितीशकुमार हेच आहेत. नितीश कुमार यांनी एनडीएशी युती तोडून बुधवारी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी काही मतभेदांमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबतचे नाते संपुष्टात आणले आहे. राजकीय प्रवासातील जुना मित्र असलेल्या लालू प्रसाद यादव यांचा पक्ष असलेल्या आरजेडीमध्ये पुन्हा सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी बुधवारी शपथ घेतली तेव्हा त्यांच्या नावावर एक विक्रमही झाला आहे.
नितीश कुमार 2000 साली पहिल्यांदाच 7 दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. आतापर्यंतच्या 22 वर्षांत त्यांनी एकूण आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा देखील एक मोठा विक्रम आहे.
नितीश यांच्या नावावर सर्वाधिक वेळा शपथ घेण्याचा विक्रम
10 ऑगस्ट रोजी नितीश कुमार यांनी विक्रमी आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देशातील सर्वाधिक काळ काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही इतक्या वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता आली नाही. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याच्या बाबतीत नितीश भलेही मागे असतील, पण सर्वाधिक वेळा शपथ घेण्याच्या बाबतीत त्यांच्या आसपास देखील कोणी नाही. नितीश यांच्यानंतर देशातील सर्वाधिक मुख्यमंत्री बनलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश आहे. चला जाणून घेऊया...
1. वीरभद्र सिंह
हिमाचलचे मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत तब्बल 6 वेळा मुख्यमंत्री बनले आहेत. 1983 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलेले वीरभद्र सिंह यांनी 1985 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय वीरभद्र सिंह हे 1993, 1998, 2003 आणि 2012 मध्येही मुख्यमंत्री झाले होते.
2. जयललिता
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या दिवंगत जे जयललिताही 6 वेळा मुख्यमंत्री झाल्या आहेत. 1991 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या जयललिता यांना मात्र दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. 2001 मध्ये त्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. यानंतर 2002, 2011, 2015 आणि 2016 मध्ये त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. जयललिता भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात अडकल्या होत्या, त्यामुळे त्यांना अनेकवेळा हे पद सोडावे लागले.
3. पवनकुमार चामलिंग
देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सिक्कीमच्या पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. चामलिंग हे सलग 5 वेळा मुख्यमंत्री होते. 1994 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंत सलग निवडणुका जिंकून ते मुख्यमंत्री झाले. चामलिंग हे एकूण 28 वर्षे मुख्यमंत्री होते, हा एक विक्रम आहे.
4. ज्योती बसू
चामलिंग यांच्यापूर्वी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या नावावर होता. बसू हे 1977 ते 2000 पर्यंत सतत बंगालचे मुख्यमंत्री होते. मात्र, या काळात त्यांना केवळ पाच वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता आली.
5. गेगॉन्ग अपांग
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री गेगोंग अपांग यांनीही 5 वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 1980 मध्ये अपांग पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर 1985, 1990 आणि 1995 मध्ये अपांग मुख्यमंत्री झाले. 2004 मध्ये अपांग पुन्हा पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले.
6. नवीन पटनायक
ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देखील पाच वेळा मुख्यमंत्री बनले आहेत. नितीश यांच्याप्रमाणेच नवीन पटनायक यांनी 2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून तेच सतत ओडिशात मुख्यमंत्री राहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.