Bihar Election: बिहारच्या निवडणुकीचे संकेत

BIHAR
BIHAR
Updated on

नवी दिल्ली- बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष वेधले होते, ते दोन कारणासांठी. एक, भाजप व जदयू यांच्या सरकारचं पुनरागमन होणार, की राजद-काँग्रेस सह अन्य पक्षांच्या महाआघाडी सरशी होणार, यासाठी. मतमोजणीच्या पूर्वसंध्येवर जाहीर झालेल्या बव्हंशी जनमत चाचण्यांनी महाआघाडी बहुमताने येणार, असे अंदाज व्यक्त केले होते. ते सपशेल चुकले व भाजप-जदयूचं (एऩडीए) संयुक्त सरकारचं पुनरागमन झालं. 

निकाल येण्याआधी दोन गोष्टी घडल्या. एनडीएचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री नितिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार, ही भाजपने केलेली घोषणा व येथून पुढे आपण पुन्हा निवडणूक लढणार नाही, ही नितिश कुमार यांनी केलेली घोषणा. असे जाहीर करून आपण राजकारण सन्यास घेणार, असा संकेत त्यांनी दिला. इच्छा नसताना ते पुन्हा मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याने कामकाजात व सरकार चालविण्यात त्यांना किती स्वारस्य असेल, हे नजिकच्या भविष्यकाळात दिसेल.  

निकालांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, जदयू एवजी भाजपला बिहारमध्ये मिळणारा वाढता पाठिंबा. नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जदयूच्या लोकप्रियतेचा घसरता आलेख या निवडणुकीत दिसून आला. रालोआला 125, तर महाआघाडीला 110 जागा मिळाल्या. 2015 च्या निवडणुकीत जदयूला 243 पैकी 71 जागा मिळाल्या होत्या, ती संख्या घसरून यावेळी 43 वर आली. भाजपने आगेकूच करून 74 जागा मिळविल्या. 

तथापि, लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या जंगल राज्याची प्रचारादरम्यान वारंवार आठवण करून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध मात्र राजदचे नेते व लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी चांगलाच लढा दिला व भाजपपेक्षाही एक जागा जास्त (75) मिळवून पुढील कोणत्याही निवडणुकात भाजप व राजद असा थेट सामना असेल, असा संकेत दिला. 

मोदी यांनी राहुल गांधी व तेजस्वी यादव यांचे वर्णन डबल युवराज असे केले होते. त्यातील राहुल गांधी यांचा भारतीय राजकारणातील प्रभाव वेगाने घसरत चाललाय, याची प्रचीती बिहारच्या निवडणुकात पुन्हा एकदा आली. राजदने जागावाटपात काँग्रेसला 70 जागा देऊनही काँग्रेसला केवळ 19 जागा मिळाल्या. त्यामुळे त्याची थेट जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर आहे. त्यांच्या शिवाय काँग्रेसचा कोणताही ज्येष्ठ नेता प्रचारात उतरला नाही. दुसरीकडे सीपीआय (एमेल-लीबरेशन) या पक्षाला 12, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 2 व भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 2 अशा 16 जागा मिळाल्या. या पक्षांनी केवळ 29 जागा लढविल्या. यावरून बिहारमध्ये काही प्रमाणात त्यांचे अस्तित्व व प्रभाव टिकून आहे, असे म्हणावे लागेल. डाव्या आघाडी पक्षांना त्रिपुरा, पश्चिम बंगाल, केरळ आदी राज्यात झालेल्या पराभवांकडे पाहता डाव्यांसाठी ही समाधानाची बाब होय.   

सर्वाधिक फटका बसला तो केंद्रात मंत्रिपद राखण्यात यशस्वी होणाऱ्या लोकजनपक्षाला व या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून जदयूची मते कापल्याने नितिश कुमार यांना. पक्षाचे माजी अध्यक्ष कै. रामविलास पासवान हे पुलोआचे सरकार असो, की लोकशाही आघाडीचे सरकार असो, दलितांची मते मिळविण्याचे आश्वासन देत केंद्र सरकारमध्ये आपले मंत्रिपद कायम ठेवीत. त्यांना ही किमया जमली होती. परंतु, त्यांचे चिरंजीव व अध्यक्ष चिराग पासवान यांनी सूत्रे हाती घेतल्यावर पहिल्याच निवडणुकीत ते सपशेल तोंडावर आपटले. तब्बल 137 जागा लढवून व ते केवळ एक जागा जिंकू शकले. अनेक ठिकाणी अनामत रक्कम जप्त झाली. त्यांनी जदयूची मते कापली, त्यामुळे 39 जागा जदयूला गमवाव्या लागला, असा  अंदाज व्यक्त केला जातो. केंद्रात भाजप बरोबर सख्य व बिहारमध्ये भाजप-जदयू विरूद्ध लढत हा डाव त्यांनी टाकला. आपल्या वडिलांप्रमाणे आपल्याला केंद्रात स्थान मिळावे, अशी त्यांची इच्छा असणार. त्यांना ते मिळण्याची शक्यता नाही. मिळाले, तरी बिहारमध्ये जदयूची शक्ती खच्ची करण्याचे काम त्यांनी केल्यामुळे मिळेल. पुढे मागे नितिश कुमार यांना राज्यसभेत आणले जाईल. केंद्रीय मंत्रिपद देण्यात येईल अऩ्यथा राज्यपाल पद देण्यात येईल. 

भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचं नेतृत्व आहे. दुसरीकडे, भाजपशी काडीमोड करून त्यांनी राजदबरोबर जावे व सरकार स्थापन करावे, असा युक्तीवाद केला जातोय. लालूप्रसाद यादव  व नितिश कुमार यांचं संयुक्त सरकार होतं, तेव्हा त्यांनी तेजस्वी यादव यास उपमुख्यमंत्री व तेजप्रताप यादव याला मंत्री केले होते. लालू प्रसाद यादव यांनी पडद्यामागून सरकार चालविण्याचा प्रयत्न केल्यामुळे नितिश कुमार यांनी युती संपविली. सारांश, सत्तेतील पंधरा वर्षात नितिश कुमार यांचा राजकीय प्रवास पहिल्यांदा राजद व नंतर भाजपशी सख्य करण्यात झाला. मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत त्यांची प्रतिमा स्वच्छ होती. बिहारमधील गुन्ह्यांचे, माफिया टोळ्यांचे प्रमाण कमी झाले. दारूबंदी केल्याने घरगुती अत्याचाराच्या कचाट्यातून महिलांना बऱ्याच प्रमाणात सुरक्षा मिळाली होती. शाळेतील हजेरींचे प्रमाण वाढले होते. परंतु, औद्योगिकरण झाले नाही. त्यांच्या संयमी व अनुभवी राजकरणामुळे त्यांचे नाव संभाव्य पंतप्रधानपदासाठीही घेतले जात होते. पण, ती संधि आता कायमची संपुष्टात आली आहे. 

बिहारच्या राजकीय इतिहासाकडे पाहिले, की तेथील राजकारणाचा प्रवास काँग्रेस ते समाजवादी ते जनता दल ते राष्ट्रीय जनता दल ते समता दल ते भाजप व जनता दल संयुक्त असा झालेला दिसतो. 

देशाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहता, उत्तर प्रदेश व बिहार ही दोन राज्ये अत्यंत महत्वाची मानली जातात. परंतु, दोन्हीही आर्थिक दृष्ट्या मागासलेली व देशावर भार टाकणारी. त्यामुळे रोजगारांची साधने नसल्याने तेथील लक्षावधी लोक पोटापाण्यासाठी मुंबई व अऩ्य शहरात जात आहेत. त्यांना सर्वाधिक फटका बसला तो मोदी यांनी केलेल्या नोटाबंदी, नंतर आलेल्या करोना साथीचा. नोकऱ्या गेल्याने हजारो मैल प्रवास करून गावी जाण्याचा फटका फार मोठा होता. त्यामुळे बिहार सरकारवर ते बरेच नाराज होते. त्यांची मते मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांचे आश्वासन देणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या दिशेने वळली. 

निवडणुकातून स्पष्ट झालेली आणखी एक बाब म्हणजे, भाजप व जदयूच्या सरकारला येथून पुढे तितक्याच शक्तीशाली विरोधकांना सामोरे जावे लागणार. भाजपची वाटचाल सुशील मोदी यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या दिशेनं होईल. वस्तुतः भाजपला जदयूपेक्षा अधिक जागा मिळाल्याने सुशील मोदी हे आताच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरले आहेत. परंतु, निवडणुका होण्यापूर्वीच नितिश कुमार हेच नव्या सरकारचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करून त्यांना एकप्रकारे आश्वासन दिले. त्यापासून निदान काही काळ भाजप माघार घेऊ शकणार नाही. 

या निवडणुकातून भाजपशी युती करणाऱ्या प्रादेशिक पक्षांना धडा मिळाला आहे. तो म्हणजे, भाजपशी युती करणारे पक्ष हळूहळू कमकुवत होतात व भाजप त्यांच्या जोरावर अधिक शक्तिशाली बनतो. एकदा का शक्तिशाला बनला, की भाजप त्यांना सोडचिठ्ठी देण्यास मागेपुढे पाहात नाही. महाराष्ट्रात भाजप मोठी झाला, तो शिवसेनेच्या खांद्यावर बसून, जम्मू काश्मीरमध्ये ज्या पक्षाबरोबर भाजपने सरकार केले, त्या पीडीपीबरोबरचे संबंध व सरकार भाजपने संपुष्टात आणले. पीडीपीचे नेते अनेक महिने तुरूंगात होते. त्यांची सुटका झाली, तरी त्यांना राजकीय स्वातंत्र्य नाही. तामिळ नाडूत अण्णा द्रमुकचे माजी नेते कै. एम.जी.रामचंद्रन यांची प्रतिमा अलीकडे भाजपने वापरली, म्हणून आण्णाद्रमुकच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला. रालोआमधील कै रामविलास पासवान यांचा एलजेपी पक्ष बिहारमध्ये शून्यावर जाऊन पोहोचला. या व अलीकडे निरनिराळ्या राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकातून भाजपचे पाऊल पुढे पडले आहे. त्यातून भाजपची देशातील फुटप्रिन्ट वाढतेय, याची जाणीव ठेऊन बिहार प्रमाणे देशपातळीवर विरोधकांनी महाआघाडी स्थापन केली, तरच भाजपशी लढा देता येईल. अऩ्यथा, भाजपच्या घोडदौडीला थांबविणे शक्य होणार नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.