‘बर्ड फ्लू’चा पाच राज्यात शिरकाव;बाधित भागात चिकन,अंडी विकण्यावर बंदी 

‘बर्ड फ्लू’चा पाच राज्यात शिरकाव;बाधित भागात चिकन,अंडी विकण्यावर बंदी 
Updated on

नवी दिल्ली - राजस्थान, केरळ, पंजाब आणि मध्य प्रदेशनंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये देखील बर्ड फ्लूचे प्रकरणे समोर येत आहेत. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात पोंग सरोवराच्या क्षेत्रात काही बर्ड फ्लूमुळे स्थलांतरित पक्ष्याचा मृत्यू झाला आहे. राजस्थानातही अनेक जिल्ह्यात पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. राजस्थानात विविध जिल्ह्यात चोवीस तासात १७० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बाधित क्षेत्रात चिकन, अंडी, मांस खाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. 

राजस्थानात आतापर्यंत ४२५ हून अधिक कावळे, बगळे आणि अन्य पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. झालावाड येथे पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या राष्ट्रीय उच्च संरक्षण पशुरोग संस्थेकडे पाठवले असता त्यात बर्ड फ्लूची लक्षणे असल्याचे सिद्ध झाले. त्याचवेळी अन्य जिल्ह्यातील पक्ष्यांचे नमुने देखील पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आतापर्यंत मिळाला नाही. 

पोंग सरोवर अभयारण्यात १८०० पक्ष्यांचा मृत्यू 
हिमाचल प्रदेशच्या पोंग सरोवर अभयारण्यात आतापर्यंत १८०० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) अर्चना शर्मा म्हणाल्या की, बरेली येथील भारतीय पशू उपचार संशोधन केंद्राने सादर केलेल्या अहवालात मृत पक्ष्यांत बर्ड फ्लूचे लक्षणे आढळून आल्याचे म्हटले आहे. जालंधरच्या (उत्तर क्षेत्र) रोगनिदान उपचार प्रयोगशाळेतही पक्ष्यांच्या नमुन्यात बर्ड फ्लूचा संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे कांगड्याचे उपायुक्त राकेश प्रजापती यांनी जिल्ह्याच्या फतेहपूर, देहरा, जवाली आणि इंदोरा उप विभागीय भागातील कोंबड्या, बदक, मासे आणि त्यापासून उत्पादित होणारी अंडी, मांस, चिकन आदींच्या विक्रीवर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे पोंग सरोवर वन्यजीव अभयारण्यात काम करणाऱ्या लोकांना फतेहपूर येथे चार पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर तेथे बर्ड फ्लूची असल्याची भीती व्यक्त केली गेली आणि ती खरी ठरली. 

मध्य प्रदेशात बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात कोरोना चाचणी 
मध्य प्रदेशात बर्ड फ्लूची सुरवात इंदूर शहरातून झाली. या ठिकाणी गेल्या आठवड्यात डेली कॉलेज परिसरात १४८ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. यात दोन मृत कावळ्यांचे नमुने भोपाळला पाठवले असता त्यात बर्ड फ्लूचे निदान झाले. बर्ड फ्लूचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत असल्याने इंदूरच्या आरोग्य विभागाने डेली कॉलेज परिसरात एक किलोमीटरच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची चाचणी केली. त्यानुसार  तेथील रहिवाशांना सर्दी, खोकला. तापाची लक्षणे आढळून आली. त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंदसौर जिल्ह्यातही बर्ड फ्लू पसरल्याचे उघड झाले आहे. 

मानवी आरोग्यावर परिणाम 
बर्ड फ्लुमुळे पक्षीच नाही तर मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. कोंबड्या आणि बाधित पक्ष्याजवळ राहिल्याने व्यक्तींनाही त्याची बाधा होऊ शकते. त्याचा संसर्ग डोळे, तोंड आणि नाकाच्या माध्यमातून शरिरात पसरतो. 

लक्षणे काय 
बर्ड फ्लूची लक्षणे ही साधारणपणे सामान्य तापेप्रमाणेच असतात. एच५एन१ हा संसर्ग पक्ष्यांच्या फुफ्फसावर हल्ला करतो. त्यामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. दम लागणे, घशात खवखव करणे, ताप वाढणे, अंग दुखी, पोटदुखी, छातीत दुखणे आदी लक्षणे होत. 

लोकांनी घ्यावयाची काळजी 
बाधित क्षेत्रात जाण्याचे टाळावे. 
मास्क घालणे अनिवार्य 
मांसाहार खरेदी करताना स्वच्छता तपासावी 
सोसायटीत येणाऱ्या पक्ष्यांना अन्न टाकणे बंद करावे. 

सध्याचा बर्ड फ्लू धोकादायक आहे. अशावेळी पक्ष्यांपासून दूर राहिले पाहिजे. कारण मनुष्यातही पसरण्याचा धोका अधिक आहे. 
-डॉ. राजेश शर्मा, सेवानिवृत्त प्रोफेसर मेडिसिन, राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज टांडा, कांगडा 

भोपाळच्या प्रयोगशाळेत एव्हियन इन्फ्लूएंजाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोंग सरोवरानजिक भागात मासे, कोंबड्या, अंड्यांच्या विक्री करणारी दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. 
राकेशकुमार प्रजापति, उपायुक्त, कांगडा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.