नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील भाजपसह सर्व संघटनांची महत्वाची वार्षिक समन्वय बैठक राजस्थानातील पुष्कर येथे उद्यापासून (ता. 7) सुरू होत आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भैय्याजी जोशी व भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह संघ परिवारातील विविध संघटनांचे व मुखपत्रांचे प्रमुख पुष्कर येथे येणार आहेत.
या बैठकीत कलम 370 हटवल्यावर काश्मीरमधील स्थिती, पर्यावरण रक्षण, प्रस्तावित समान नागरी कायद्याच्या शक्यता चाचपणे, जनगणना, आसाममधील वादग्रस्त एनआरसी रजिस्टर, आरक्षण, राममंदिराबाबतची न्यायालयीन सुनावणी व त्य़ानंतरची दिशा अशा विविध मुद्यांवर या तीन दिवसांत मंथन होण्याची शक्यता आहे.
पुष्कर हे हिंदू धर्मातील तीर्थ-क्षेत्र आहे. या तीर्थाच्या सहाय्याने संघ येत्या 10 तारखेपर्यंतच्या मंथनात आपल्या विचारांच्या भावी दिशेचे 'तीर्थ' भाजप व संघटनांना देणार असल्याचे मानले जाते. भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज रात्रीपर्यंत पुष्करला पोहोचणार आहेत. या बैठकीत पहिल्या दिवशी सहभागी होऊन ते भाजपच्या कामकाजाचा अहवाल मांडतील. नड्डा तसेच भाजपचे संघटनमंत्री बी. एल. संतोष, सौदान सिंह, सतीश वेलणकर आदींची प्रमुख संघनेत्यांबरोबर वेगळी चर्चा होण्याचीही शक्यता आहे.
या बैठकीत भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात होणाऱ्या कार्यक्रमांचेही नियोजन केले जाईल. भाजप व्यतिरिक्त वकील परिषद, आरोग्य भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, भारतीय शिक्षण मंडळ, राष्ट्रसेविका समिति, राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, हिंदू जागरण मंच, विद्याभारती, कुष्ठरोग निवारण समिती, भारतीय सिंधु सभा, सेवा भारती, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, दीनदयाळ शोध संस्थान, नॅशनल मेडिकल ऑर्गेनाइजेशन, पूर्व सैनिक परिषद, प्रज्ञा प्रवाह, भारत विकास परिषद, अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, राष्ट्रीय शीख संगत, लघु उद्योग भारती या संघपरिवारातील संघटनांचेही प्रतीनिधी या समन्वय बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.