‘जुलै आला...पण लस आलीच नाही,‘ कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या ६ शब्दांच्या ट्विटने भाजपचा पुन्हा तिळपापड झाला असून तीन तीन केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरूनही राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. राहुल गांधी काही वाचतात की नाही? अज्ञान व अहंकाराच्या विषाणूवर अजून लस नाही, असा पलटवार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केला.
कोरोना, बेरोजगारी, अर्थव्यवस्था आदींवरून राहुल गांधींनी दररोज ट्विट करायचे व किमान तीन ते चार कॅबिनेट मंत्र्यांसह भाजप प्रवक्त्याच्या फौजेने त्यांना प्रत्युत्तर द्यायचे हा सिलसिला गेले अनेक महिने सुरू आहे. १ जुलै रोजी राहुल गांधी यांनी देशातील लसलकव्याच्या परिस्थितीवर एका ओळीचे ट्विट केले होते. त्यावर भाजपने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या भवितव्याशी जोडून उलटवार केला.
डॉ. हर्षवर्धन सर्वाधिक संतापले आहेत. राहुल गांधी यांना नेमकी अडचण काय आहे ? ते वाचतात की नाही ? असे विचारून त्यांनी म्हटले की मी कालच लसीकरणाची आकडेवारी जाहीर केली होती. जूनमध्ये केंद्राने राज्यांना ११. ५० कोटी लसी मोफत दिल्या व जुलैत हे प्रमाण १२ कोटींवर जाणार आहे हे मी सांगितले होते. राज्यांना किती लसी कधी मिळणार हे १५ दिवस आधीच कळविले जाते. सारे काही स्पष्ट आहे व लसीकरणाने वेग पकडला आहे. पण अज्ञान व द्वेष यांच्या विषाणूवर कोणतीही लस तयार झालेली नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. कॉंग्रेसला आपले नेतृत्व व पक्षाला सांभाळण्याकडे लक्ष द्यायला हवे असे सांगून त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राहुल यांच्या वक्तव्याने कॉंग्रेसचे नुकसान: नक्वी
संकटाच्या काळात राहुल गांधी यांनी असे क्षुद्र राजकारण करणे बरोबर नाही , देशात वेगाने लसीकरण सुरू आहे, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिले. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, की राहुल गांधींकडे तथ्य व वस्तुस्थितीच्या दृष्टीने कायमच कंगालपण असते. त्यांच्याकडे जबाबदारी तर काही नाही पण अशा वक्तव्यांनी कॉग्रेसचे अधिकाधिक नुकसान होत चालले आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले की कोवीडला मोवीड म्हणणाऱ्या राहुल गांधी यांना द्वेषाचा मोतीबिंदू झाला असून त्यावर त्वरित उपचार कॉंग्रेससाठी हितकारी ठरेल. जुलै आला पण राहुल गांधी यांना ही सुबुद्धी कधी येणार की विरोधी पक्षांची भूमिका रचनात्मक असते. सत्ता सुख भोगण्याच्या तुमच्या लालसेला हादरा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करणे हेच तुमचे काम राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.