नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भाजपने चालू महिन्याच्या अखेरीस पक्षशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती बुधवारी सूत्रांनी दिली. केंद्र आणि भाजपशासित सरकारांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा, केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय तसेच भाजपच्या संघटनेतील मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
‘चारशे पार’चा नारा दिलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याइतपत जागाही मिळाल्या नव्हत्या. घटक पक्षांची मदत घेत सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश मिळाले असले तरी खराब कामगिरीचे सर्व स्तरावर विश्लेषण सुरु आहे. जुलैच्या अखेरीस होणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांतील पक्षांतर्गत कलह प्रकर्षाने समोर आला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर खलबते होण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर अलिकडेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या आणि प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह यांना राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी पाचारण करीत चर्चा केली होती.
लोकसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीरपणे सांगितले होते. तर योगी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्या यांच्यादरम्यान संघर्ष सुरु असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.