निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले; सत्ता बदलाचा ट्रेंड कायम राहणार; भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान

कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी ११३ हा जादुई आकडा गाठावा लागणार
bjp congress Karnataka 224 Assembly seats trend of power change politics
bjp congress Karnataka 224 Assembly seats trend of power change politics sakal
Updated on

कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी ११३ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. राजकीय समीकरणे ही राज्यातील विभागांप्रमाणे वेगवेगळी आहेत. राज्यात लिंगायत समाज सर्वात मोठा आहे. त्यांचा प्रभाव उत्तर कर्नाटक व हैद्राबाद कर्नाटक (आताचा कल्याण कर्नाटक) या भागात आहे. मध्य व दक्षिण कर्नाटकात वक्कलिग समाजाचे वर्चस्व आहे. हा समाज जनता दल(सेक्युलर) अर्थात जेडीएसची व्होट बॅंक आहे.

किनारपट्टी भागात हिंदुत्वाचे कार्ड चालते, त्या जोरावर गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपने तेथे वर्चस्व मिळविले आहे. पण यावेळच्या निवडणुकीत हिंदुत्वाबरोबरच लिंगायत समाजातील पंचमसाली आरक्षण, ४० टक्के कमिशनचे आरोप, प्रादेशिक असमतोल हे मुद्दे महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. २०१९ साली ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून भाजपने राज्यात सत्तांतर घडविले. बी. एस. येडियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले.

पण दोन वर्षातच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवत, बसवराज बोम्मई यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. पण बोम्मई यांच्या दीड वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक आघाड्यांवर भाजपची पिछेहाट झाली. त्यामुळेच निवडणुकीची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा येडियुरप्पांकडे दिली. पण २००८ साली जो करिष्मा येडियुराप्पा यांनी केला होता, तो यावेळी ते करतील का? असा प्रश्‍न आहे.

भाजपच्या तुलनेत या निवडणुकीत काँग्रेस व ‘जेडीएस’ आक्रमक झाल्याचे दिसते. काँग्रेस पक्षाकडून १२४ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. जेडीएसकडूनही प्रमुख मतदारसंघातील उमेदवार निश्‍चित झाले आहेत. पक्षाचे प्रभावक्षेत्र असलेल्या मध्य व दक्षिण कर्नाटकात जेडीएसने जोर लावला आहे. कुमारस्वामी जेडीएसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. भाजप व काँग्रेस पक्षाकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्‍चित नाही. मात्र काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोच. २०१३ साली राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यावेळी काँग्रेसने १२२ जागा जिंकल्या. सिद्धरामय्या यांनी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केले. अर्थात २०१३ साली भाजपमध्ये पडलेली फूट, येडियुरप्पा व मंत्री श्रीरामलू यांनी स्थापन केलेले स्वतंत्र पक्ष याचा फायदा काँग्रेसला झाला होता.

मतविभागणीमुळे २०१३ साली भाजपला केवळ ४० जागा मिळाल्या होत्या.पाच वर्षे स्थिर सरकार दिल्यानंतरही २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळविता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या झंझावाती सभा, येडियुरप्पा व श्रीरामलू यांची घरवापसी यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्यता होती. पण भाजपला १०४ जागा मिळाल्या. काँग्रेसला ७८ तर जेडीएसला ३७ जागा मिळाल्या.

भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा जाहीर केला व कुमारस्वामी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मग भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ची तयारी सुरू केली. काँग्रेस व जेडीएसचे १७ आमदार फोडले. त्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले. जुलै २०१९ मध्ये येडियुराप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण भाजपच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री बदलाची परंपरा यावेळीही कायम राहिली. त्याचा फटका यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसू शकतो. जेडीएसला जास्त जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाचे गणित बिघडू शकते.

‘ऑपरेशन कमळ’ची सुरुवात

भाजपने २००८ साली कर्नाटकात सर्वप्रथम स्वबळावर सत्ता स्थापन केली. शिवाय भाजपच्या ऑपरेशन कमळची सुरूवातही २००८ साली कर्नाटकातूनच झाली. भाजपने अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. पण स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी ऑपरेशन कमळ राबविले. काँग्रेस व जेडीएसचे आमदार भाजपने फोडले.

पोटनिवडणुकीत बहुतेक सर्व आमदार भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले. भाजपच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात तीन मुख्यमंत्री झाले. येडीयुरप्पा यांच्यावर भूखंड गैरव्यवहाराचा आरोप झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सदानंद गौडा मुख्यमंत्री झाले. नंतर जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

कर्नाटक विधानसभा

  • एकूण जागा *२२४

  • बहुमतासाठी जागा *११३

  • मतदार *५.२१ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.