कॅप्टन अमरिंदर सिंह आणि भाजप यांच्यात युती झाल्यास काँग्रेसला सर्वाधिक फटका बसू शकतो, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
पंजाबमध्ये पुढील वर्षी सुरुवातीलाच विधानसभा निवडणुका होत आहेत आणि भाजप (BJP) काँग्रेसचा (Congress) खेळ बिघडवण्यासाठी युतीच्या रणनीतीवर काम करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शनिवारी एका मुलाखतीत पंजाब निवडणुकीसाठी भाजपची रणनीती सुरु असल्याचं सांगितलं. पंजाबमधील युतीच्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, आमची कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांचा पक्ष आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या दोघांशी चर्चा सुरू आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ही युती होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नुकताच काँग्रेस पक्ष सोडून नवा पक्ष स्थापन केलाय.
पंजाब निवडणुकीशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना शाह म्हणाले, आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत. आमची कॅप्टन यांच्याशीही बोलणी सुरु आहे. तसेच आम्ही शिरोमणी अकाली दलाचे सुखदेव सिंग धिंडसा (Sukhdev Singh Dhindsa) यांच्याशीही चर्चा करत आहोत. कदाचित, निवडणुकीत आमची युती होण्याची शक्यता आहे. पंजाबची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल, ज्याची कामगिरी चांगली असेल, तोच निवडणूक जिंकू, असंही शाहांनी स्पष्ट केलं.
पुढील वर्षी होणार्या पंजाब विधानसभेच्या निवडणुका अतिशय रंजक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. आता कॅप्टन पक्षाची भाजपसोबत युती होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, कॅप्टननं अद्याप आपले राजकीय पत्ते उघडले नाहीत. सध्या ते आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह आणि भाजप यांच्यात युती झाल्यास काँग्रेसला अधिक फटका बसू शकतो, असं राजकीय जाणकारांचं मत आहे. पंजाबमध्ये भाजपचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनी सांगितलं, की भाजप पंजाबमधील सर्व 117 जागा लढवण्याची तयारी करत आहे. अमरिंदर सिंह यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेससोबत युती करणार की नाही याचा निर्णय कॅप्टन अमरिंदर सिंह घेतील, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.