Rahul Gandhi : आदिवासींना जंगलांमध्येच ठेवण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपवर टीका

‘वनवासी’ शब्दावर आक्षेप; जमीन त्यांना उद्योगपतींना देऊन टाकायची आहे
bjp insulted tribals by calling them forest dwellers rahul gandhi accuses bjp rahul gandhi
bjp insulted tribals by calling them forest dwellers rahul gandhi accuses bjp rahul gandhisakal
Updated on

वायनाड (केरळ) : सत्ताधारी भाजपकडून वापरल्या जाणाऱ्या ‘वनवासी’ या शब्दाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वायनाड येथील खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा तीव्र आक्षेप घेतला. ‘आदिवासी’ शब्दाऐवजी ‘वनवासी’ हा शब्द वापरून आदिवासी नागरिकांना जंगलांपुरतेच मर्यादित ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाली असून आज ते त्यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये दाखल झाले आहेत. आज त्यांनी येथे आदिवासींसाठीच्या एका रुग्णालयाला भेट दिली.

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका सभेत बोलताना राहुल यांनी,‘‘आदिवासींना वनवासी असे संबोधून भाजप त्यांचा अपमान करत आहे,’’ अशी टीका केली होती. तोच धागा पकडून आज राहुल गांधी म्हणाले,‘‘वनवासी असे संबोधून भाजपला आदिवासींकडून त्यांचे जमिनीचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत.

ही जमीन त्यांना उद्योगपतींना देऊन टाकायची आहे. शिवाय, आदिवासींना जंगलांमध्येच मर्यादित ठेवण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. आदिवासी हे जंगलातच राहणारे असून त्यांनी तेथेच राहिले पाहिजे, असे भाजपला वाटते. मात्र, ही विचारसरणी आमच्या पक्षाला मान्य नाही. ‘वनवासी’ हा शब्द इतिहासाचे आणि आदिवासी परंपरांचे विडंबन करणारा आहे. हा शब्द म्हणजे आदिवासी आणि भारत देश यांच्यात असलेल्या नात्यावरील हल्ला आहे.’’

आदिवासींकडून शिका

पर्यावरण संरक्षणाबाबत आदिवासींकडून शिकण्याची गरज असल्याचे मतही राहुल गांधी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,‘‘सध्याच्या काळात पर्यावरण आणि पर्यावरण संरक्षण या शब्दांचा केवळ प्रसिद्धीसाठी वापर केला जातो. मात्र, आदिवासी हे हजारो वर्षांपासून जंगलांचे संरक्षणच करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच खूप काही शिकण्यासारखे आहे.’’

आदिवासी हे जमिनीचे मूळ मालक असल्याची काँग्रेस पक्षाची भावना आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या जमिनीचे व वनाचे पूर्ण हक्क दिले जावेत. त्यांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांमध्ये संधी मिळायला हवी. आदिवासींना कोणत्याही वर्गात मर्यादित ठेवणे योग्य नाही. .

- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

...ही तर जुन्या बाटलीत जुनीच वाईन ः शहा

मानसा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या आघाडीची ‘जुन्या बाटलीत जुनीच वाईन’ अशा शब्दांत खिल्ली उडविली. या आघाडीत सुमारे १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावाही त्यांनी केला. गुजरातेतील गांधीनगर जिल्ह्यातील मानसा शहरात राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (एनएसजी) प्रादेशिक केंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध (एनडीए) भारतीय राष्ट्रीय विकासात्मक सर्वसमावेशक आघाडीची (इंडिया) स्थापना केली आहे.

या आघाडीवर शहा यांनी टीका केली. ते म्हणाले, की काँग्रेस व संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) म्हणजे १२ लाख कोटींच्या भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांचा गट आहे. आता त्यांनी स्वत:चे नाव बदलले आहे. मात्र, त्यांना युपीए म्हणूनच ओळखले पाहिजे. सुमारे १२ लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्यांना कोण मतदान करेल?, असा सवालही त्यांनी केला.

तुम्ही नवीन बाटलीत जुनी वाईन ही म्हण ऐकली असेल मात्र विरोधकांच्या आघाडीबाबत तर बाटली आणि वाईन असे दोन्हीही जुने आहे. विरोधकांची ही आघाडी म्हणजे जुन्या बाटलीत जुनीच वाईन आहे. ते पुढे म्हणाले, की आपल्यापैकी अनेक जणांनी स्वातंत्र्य चळवळ पाहिली नाही तसेच देशासाठी प्राणांचे बलिदान देण्याची संधीही मिळाली नाही.

आपण त्यावेळी तिथे असतो तर देशासाठी प्राणांचे बलिदान दिले असते, असे अनेकजण म्हणतात. मात्र, आपल्याला देशासाठी प्राणत्याग करण्याची गरज नाही. आपल्याला देशात जगण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.

स्वत:च्या घरापासून सुरुवात करत पाच मुलांचे संगोपन करूयात. या मुलांमध्ये देशभक्तीचे बीज रुजवुयात. त्यानंतर ती आपले अवघे आयुष्य देशासाठी समर्पित करतील. भारताने हजारो वर्षांपासून जगाला मार्ग दाखविला असल्याचे सांगत देशाला शिक्षण, अंतराळ, सुरक्षा व आर्थिक क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही शहा यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.