भाजपबाबत संघ ‘दक्ष’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील संबंधांवर नजर टाकल्यास त्यांच्यात अधूनमधून प्रियकर-प्रेयसीमध्ये होत असलेल्या भांडणाची झलक दिसून येते.
bjp-rss relation
bjp-rss relationSakal
Updated on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील संबंधांवर नजर टाकल्यास त्यांच्यात अधूनमधून प्रियकर-प्रेयसीमध्ये होत असलेल्या भांडणाची झलक दिसून येते. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वात नागपूर कोणताही बदल घडवून आणेल असा अर्थ काढणे हा संघाचा हेतू आणि शक्तीबाबत चुकीचा समज करून घेणे आहे.

भाजप नेतृत्वाखालील सरकाच्या अहंकाराबद्दल जाहीर नापसंती व्यक्त करणाऱ्या विधानांची राळ उडवून देताना संघ नेमका काय विचार करत आहे? सरसंघचालक मोहन भागवत यांचे संघ कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाच्या समारोपाचे भाषण आणि संघाच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि संघ-समर्थित मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मुख्य संरक्षक इंद्रेश कुमार यांनी दिलेल्या अहंकाराच्या विशिष्ट संदर्भाचा समावेश आहे.

कुमार म्हणाले की, भगवान राम यांनी २४० जागांपर्यंत मर्यादित ठेवून भाजपला अहंकाराची शिक्षा दिली. रामराज्याच्या न्यायाने ‘इंडिया’ आघाडीलाही मतदारांनी २३७ पर्यंत आणखी खाली ठेवले कारण ते ‘राम विरोधी’ आहेत. दुसरीकडे संघ विचारवंत रतन शारदा यांनी ‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर टीका केली.

तर संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील लेखात महाराष्ट्रातील पराभवासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीला जबाबदार धरले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर संघाने गेल्या दशकात प्रथमच एवढ्या समन्वयाने टीका केल्याचे दिसते.

भागवत यांनी त्यांच्या भाषणात विरोधकांपेक्षा प्रतिपक्षाची बाजू पसंत करतील, असे काहीसे संयत शब्दांत सांगितले. जे आपल्याला आपल्या पुढील प्रश्नाकडे घेऊन जाते; संघ काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे? या गोंधळात सत्तेचे राजकारण आणि राजकीय चर्चेतील आवाजाच्या सर्व छटा लपलेल्या आहेत.

सर्वप्रथम ताज्या ‘हस्तक्षेपा’वर उदारमतवादी बाजूने आलेल्या प्रतिक्रियांवरून संघाची चांगलीच करमणूक झाली असणार. ज्यांनी अनेक दशकांपासून संघाच्या विचारधारेशी लढा दिला आहे, त्यांनी आता संघ प्रमुखांच्या टीकेमध्ये सांत्वन धुंडाळणे ही बाब जेवढी उपरोधिक तेवढीच त्यांची अगतिकता दाखविणारी आहे.

भाजपला डिवचण्यासाठी काँग्रेसमधील काहींनी संघाच्या या भूमिकेमुळे नरेंद्र मोदी काही अंशी कमकुवत होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. भागवतांच्या वक्तव्यानंतर लेख आणि सोशल मीडिया पोस्ट्सचा पाऊस पडला.

त्याचा सूर ‘तुम्ही (मोदी) आमचे ऐकणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे. पण निदान भागवतांचे तरी ऐका.’ असाच आहे. चार जूननंतरच्या बदललेल्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर संघ प्रमुखांचा मोदी-शहा यांच्या भाजपपेक्षा अधिक स्वीकार होताना दिसत आहे. परंतु, हे परिस्थितीचे अत्यंत चुकीचे आकलन ठरेल.

कठोर परिश्रमाची सूचना

वस्तुस्थिती अशी आहे की संघ-भाजप संबंधाच्या इतिहासात अधूनमधून अशी प्रेमी युगुलाप्रमाणे भांडणे दिसून येतात. यामुळे क्वचितच काही बदलते. उघड नाराजीनंतर नागपुरातील संघ नेतृत्व कोणताही बदल घडवून आणेल असे वाटणे म्हणजे त्यांचा हेतू आणि शक्ती या दोन्हींचा चुकीचा अर्थ काढणे आहे.

या निवडणुकीने मोदींना पराभूत केले जाऊ शकते, हे त्यांच्या टीकाकारांना दाखवून दिले आहे. तथापि, ते साध्य करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये एकामागोमाग एक राज्याच्या निवडणुकीत कठोर परिश्रम घ्यावे लागतील. संघाचा आशीर्वाद असो वा नसो, कोणत्याही अंतर्गत सत्तापालटातून हे घडू शकत नाही.

शिवाय संघ स्वतःच्याच सरकारला अस्थिर करण्याच्या मनःस्थितीत आहे असे सुचविण्यासारखे अक्षरशः काहीही नाही. जर संघ गुरू आणि सध्याचे भाजपचे नेतृत्व त्यांचे शिष्य असतील, तर ही टीका शिक्षकाने आवडत्या शिष्याच्या सुमार कामगिरीमुळे आलेल्या निराशेतून केली आहे, असे समजावे.

याचा अर्थ असा नाही की संघ आणि भाजपमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर मतभेद झालेले नाहीत. आपण तीन मतभेदांची यादी करूयात. मात्र, आत्ता निवडणुकीच्या निकालानंतर संघाकडून झालेल्या टीकेचा या यादीत समावेश करता येणार नाही.

१९८० मध्ये मूळ भारतीय जनसंघाच्या विखुरण्यातून भाजपचा उदय झाला. त्यानंतर जवळपास दोन दशके संघ-भाजप संबंध कडू-गोड अशा स्वरूपाचे होते. या कटुतेची शिक्षा प्रत्येक वेळी भाजपला भोगावी लागली. १९८४, २००४ आणि आता २०२४ .

१९९८ मध्ये संघाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात झालेल्या युतीचा उदय साजरा केला. मात्र, वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांना मानवणारे नव्हते. २००३ मध्येही त्यांच्यातील संघर्ष सगळ्यांच्या पुढे आला. २००४ च्या निवडणुकीत संघाचा उत्साह कमीच होता कारण वाजपेयी आणि अडवानी यांनी पाच महिने आधीच निवडणूक घोषित केली होती.

या निवडणुकीत भाजपला थोडक्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर एप्रिल २००५ मध्ये ‘वॉक द टॉक’ या मुलाखतीत सुदर्शन यांनी याची चिडचिड व्यक्त केली होती. या मुलाखतीसाठी सरसंघचालकांच्या कार्यालयातून विचारणा झाली होता.

सरसंघचालक क्वचितच मुलाखत देत असल्याने मी मुलाखत मागितली नव्हती. यात वाजपेयींनी सत्ता गमावल्यानंतर सुदर्शन यांचा सूर ‘बरे झाले अद्दल घडली. जर त्यांनी आमचे ऐकले असते तर.’ असाच होता. या टप्प्यावर संघाने नरेंद्र मोदी यांच्यातील तरुण नेत्याचा उदयाची दखल घेतली होती. या युवा नेता त्यांच्या विचारधारेशी अधिक निष्ठावान होता.

आता २० वर्षे पुढे या. लोकसभा २०१४ च्या मोहिमेत संघ-भाजप संबंधात पुन्हा कटुता आली. भाजपला असा विश्वास वाटत होता की या निवडणुकीत फक्त मोदींच्या नावाने प्रचार केले की मोहीम फत्ते होणार. यामुळे संघाला थोडे अपमानित झाल्यासारखे वाटले असणार. मोदी यांनी कलम ३७० हटवणे, राम मंदिराची उभारणी आणि तिहेरी तलाक रद्द करणे असे धाडसी निर्णय घेतले असले तरीही संघाला थोडेसे डिवचल्यासारखे वाटले असावे.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला डॉ. मोहन भागवत यांना मानाचे स्थान देण्याची काळजी मोदींनी घेतली होती. विचारधारेचा मुद्दा नसला तरी स्वयंसेवकाला तो आता इतका अपरिहार्य नाही असे वाटले असावे. भागवत यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या भाषणात असे सांगितले की, संघाने नेहमीच जनतेच्या आवाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

तर दुसरीकडे भाजपने असे म्हटले की, पक्षाला आता संघाची करंगळी धरून वाटचाल करण्याची गरज उरलेली नाही. परंतु, हे सारे निकालापूर्वी होते. हे सरकार तसेच मोदी आणि शहा यांची शक्ती संघासाठी एक अपरिहार्य ठरली आहे.

विशेषत: ही संघटना शताब्दीकडे वाटचाल करीत असताना. म्हणूनच त्यांच्याकडून होत असलेल्या टीकेचा अर्थ शिक्षकाने आपल्या आवडत्या विद्यार्थ्याला फटकारले एवढाच आहे. याचा आणखी काही अर्थ काढणे चुकीचे ठरेल. हा स्तंभ लिहिला जात असताना भागवत हे गोरखपूरमध्ये होते आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी ग्रामीण उत्तर प्रदेशात भाजपला बळकट करण्यासाठी काय करायला हवे याची चर्चा करीत आहेत.

पूर्वीही धरली होती वेगळी वाट

पंजाबमधील संकटामुळे चिंतित असलेल्या संघाने १९८४ मध्ये राष्ट्रीय हित लक्षात घेत असा निष्कर्ष काढला की राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली देश अधिक सुरक्षित राहू शकतो आणि युतीत भाजपचाही समावेश असू शकतो. राजीव गांधी आणि तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यात भेट झाल्याच्या बातम्याही तेव्हा प्रकाशित झाल्या होत्या.

त्या निवडणुकीत मी मध्य प्रदेश आणि दिल्लीतून वार्तांकन केले होते. त्यात संघाचे कार्यकर्ते भाजपच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत तर स्थैर्य आणि राष्ट्रहितासाठी काँग्रेसला मत देण्याचा संदेश प्रसारित करताना आढळून आले. संघाला भाजपशी तशी काही तक्रार नव्हती. पण अद्याप त्यांची वेळ आली नाही, असे संघाचे मत होते.

(अनुवादः किशोर जामकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com