Narendra Modi : भाजपचा प्रचार : ‘आम्ही मोदींचा परिवार’; ऑनलाइन मोहिमेतून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभेतून थेट विरोधकांवर निशाणा साधल्यानंतर भाजपनेही समाजमाध्यमांतून ‘मोदी का परिवार’ अशी आक्रमक प्रचार मोहीम सुरू करत विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.
narendra modi and revanth reddy
narendra modi and revanth reddysakal
Updated on

नवी दिल्ली-आदिलाबाद (तेलंगण) - ‘या देशातील १४० कोटी जनता हेच माझे कुटुंब आहे,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेतून थेट विरोधकांवर निशाणा साधल्यानंतर भाजपनेही समाजमाध्यमांतून ‘मोदी का परिवार’ अशी आक्रमक प्रचार मोहीम सुरू करत विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून ते प्रदेशपातळीवरील नेत्यांपर्यंत सर्वांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाईन अवतरली होती. मोदींनी आदिलाबादेतील सभेत ‘इंडिया’ आघाडीचे वाभाडे काढल्यानंतर सायंकाळी चेन्नईत झालेल्या सभेमध्येही अवघा देश एकसुरामध्ये आम्ही मोदींचा परिवार असल्याचे सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तत्पूर्वी पाटण्यामध्ये झालेल्या विरोधकांच्या सभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी यांना कुटुंब नसल्याची टीका केली होती. लालूंच्या याच टीकेचा संदर्भ घेत पंतप्रधानांनी आज त्यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी ही भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या राजकारणात आकंठ बुडाली असल्याचा घणाघात मोदींनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘ माझे जीवन खुले पुस्तक असून १४० कोटी जनता हेच माझे कुटुंब आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोट्यवधी मुली आणि माता भगिनींचा समावेश आहे.

देशातील प्रत्येक गरीब माणूस माझे कुटुंब आहे. ज्यांच्यासाठी कुणीच नाही त्यांच्यासाठी मोदी आहेत. माझ्यावर सगळ्याच लोकांचे लक्ष असते. कधी कधी मी रात्रभर काम करत असतो तेव्हा हीच मंडळी मला विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहील. मी लोकांसाठी जगतो आणि त्यांच्यासाठी संघर्ष करतो आहे. तुमच्या स्वप्नांना साकार करण्याचा दृढसंकल्प मी केला आहे.’

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ५६ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी हे देखील उपस्थित होते. के. चंद्रशेखरराव हे तेलंगणचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेकवेळा मोदींसोबत कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले होते. पण रेवंथ रेड्डी यांनी ही परंपरा मोडली.

पंतप्रधान मोदी हे आमच्यासाठी मोठ्या भावासारखे असून गुजरातप्रमाणे आम्हाला प्रगती करण्यासाठी त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी आम्ही योगदान देऊ इच्छितो.

- रेवंत रेड्डी, तेलंगणचे मुख्यमंत्री

मोदी म्हणाले

  • लोकांच्या इच्छापूर्तीचा सरकारचा प्रयत्न

  • राज्यांच्या प्रगतीतूनच देशाचा विकास

  • राष्ट्रविकासावरील दृढ विश्वासाचा राज्यांना लाभ

  • आधीच्या सरकारकडून तेलंगणकडे दुर्लक्ष

  • गरीब, दलितांच्या विकासाला आमचे प्राधान्य

  • विकसित भारताचा उल्लेख

पंतप्रधानांनी यावेळी मागील दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करताना विकसित भारतासाठीच्या कृती आराखड्याचाही दाखला दिला. लाखो लोक या प्रक्रियेचे भागीदार असल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगानेच आतापर्यंत तीन हजारांपेक्षा अधिक बैठका झाल्या असून मागील पंधरा दिवसांमध्ये दोन आयआयटी, तीन आयआयएम आणि पाच ‘एम्स’ सारख्या संस्था सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील मोठी साठवणूक योजना सुरू करण्यात आली आहे, असे मोदी म्हणाले.

अशाही घोषणा

  • २०१४ - अच्छे दिन आने वाले है

  • २०१९ - फिर एक बार मोदी सरकार

  • २०२४ - अबकी बार चारसौ पार

किसान कर्जदार, युवा बेरोजगार, मजदूर लाचार! और देश लूट रहा है मोदी का ‘असली परिवार’।

- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.