कुचबिहार - विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) लागल्यानंतरही पश्चिम बंगाल (West Bengal) धुमसतच आहे. राज्यपाल जगदीप धनकर (Jagdeep Dhankar) यांनी हिंसाचार (Violence) झालेल्या कुचबिहार जिल्ह्याचा दौरा केला, पण सीतलकुचीमध्ये त्यांना काळे झेंडे (Black Flag) दाखविण्यात आले. (Black flags shown to Governor Dhankar during his visit to Sitalkuchi Tour)
माथाभांगा येथून त्यांच्या वाहनांचा ताफा सीतलकुली येथे जात असताना गोलोकगंज येथे काही व्यक्तींनी निदर्शने केली. पोलिसांनी निदर्शकांना रोखून धरले होते. सीतलकुचीमध्ये दहा एप्रिल रोजी मतदानाच्या चौथ्या टप्प्याच्या दिवशी केंद्रीय दलाच्या जवानांना गोळीबार करावा लागला होता. त्यात चार व्यक्तींचा मृत्यू झाला. दोन मे रोजी निकाल लागल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हल्ल्यांत बळी पडलेल्या आणि पिडीतांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी राज्यपालांनी हा दौरा आखला आहे.
काही ठिकाणी महिला रडत होत्या, राज्यपालांच्या पाया पडत होत्या. आपल्या सर्व चीजवस्तू लुटल्या आणि हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून पुरुषांना घरातून पलायन करावे लागल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या. राज्यपालांबरोबर भाजप खासदार नितीश प्रामाणिक होते.
तृणमूलचा आरोप
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. ते म्हणाले की, राज्यपालांनी अगदी निवडक पद्धतीने काही भाजप कार्यकर्त्यांच्या घरांनाच भेट दिली. ते भाजपच्या मर्जीनुसार वागत आहेत. त्यांच्याबरोबर भाजपचेच नेते असतात.
१९७८ मधील संदर्भ
राज्यपालांनी आपले दौरे आखताना राज्य सरकारला बाजूला करता कामा नये. राज्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधतानाही असे करू नये असा शिष्टाचार १९७८ मध्ये निश्चित करण्यात आला आहे. याचा संदर्भ तृणमूल काँग्रेसने दिला.
हेलिकॉप्टरचा मुद्दा
राज्यपालांनी सीमा सुरक्षा दलाचे हेलिकॉप्टर वापरण्यासही बंगाल सरकारने आक्षेप घेतला. राज्य सरकारकडून ही सुविधा न घेता थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही व्यवस्था करण्यात आली. ममता यांच्या सरकारचे श्रेय कमी करण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी दिल्ली दौराही आखल्याचा आरोप तृणमूलने केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.