रायपूर : अनेक अडथळ्यांमधून वाट काढीत भुयार खणून पाच दिवस, चार रात्री असे एकूण १०४ तास ५६ मिनिटे चाललेल्या शोधकार्याला अखेर मंगळवारी (ता.१४) रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी यश मिळाले व अकरा वर्षांच्या राहुल साहूची सुखरूप सुटका करण्यात आली. हे मदतकार्य देशातील सर्वांत मोठी बचाव मोहीम ठरली आहे. छत्तीसगडमधील जांगिर-चंपा जिल्ह्यात पिहरीड गावात राहणारा राहुल घराच्या मागे असलेल्या ८० फूट खोल कूपनलिकेत गेल्या शुक्रवारी (ता.१०) दुपारी पाय घसरून पडला होता. जमिनीपासून ६९ फुटांवर तो अडकला. त्यादिवशी त्याचे वडील रामकुमार साहू हे घरात नव्हते. त्याची आई शिवणकाम करीत होती. त्यावेळी बाहेर खेळत असलेला राहुल कूपनलिकेजवळ गेला होता.
कूपनलिकेतून फारसे पाणी मिळत नसल्याने तिचा वापर होत नव्हता. लोखंडी जाळी तिच्या तोंडावर झाकली होती. बराच वेळ झाला तरी राहुल घरात दिसला नाही म्हणून गीता त्याला शोधत होती. तिला रडण्याचा आवाज आला. ती त्या दिशेने गेली असता राहुल कूपनलिकेत पडल्याचे तिच्या लक्षात आले. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाने (एनडीआरएफ) तातडीने राहुलच्या बचावासाठी काम सुरू केले.
असे झाले बचावकार्य
राहुल साहा शुक्रवारी (ता. १० ) दुपारी कूपनलिकेत पडल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल.
एनडीआरएफ, लष्कर, स्थानिक पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसह ५०० पेक्षा अधिक कर्मचारी मदतकार्यात सहभागी.
ओडिशातील कटक व भिलाई येथूनही ‘एनडीआरएफ’चे पथकाला पाचारण.
लष्करातील कर्नल चिन्मय पारिख व त्यांच्या चमूचा मदत कार्यात पुढाकार.
पाइपद्वारे ऑक्सिजन पोहचविण्याची व्यवस्था.
कॅमेऱ्याद्वारे व कुटुंबाच्या मदतीने राहुलवर लक्ष ठेवून त्याचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न.
राहुलला खाण्यासाठी ज्यूस, केळी, सफरचंद, फ्रुटी व अन्य खाद्यपदार्थ कूपनलिकेत सोडले जात होते.
कूपनलिकेतील पाणी काढण्यासाठी राहुलने मदत केली.
बचाव मोहिमेच्या पहिल्या दिवशी क्रेनच्या साह्याने दोरी आत सोडून राहुलला बाहेर काढण्याचा प्रयत्न.
राहुलला दोरी पकडता येत नसल्याने ‘एनडीआरएफ’ने कूपनलिकेच्या बाजूने खोदकामास सुरुवात.
वेगवेगळ्या यंत्रांद्वारे ६५ फूट खोदल्यानंतर पहिला रस्ता तयार करण्यात आला.
ड्रिलिंग करून कूपनलिकेपर्यंत पोहोचण्यासाठी बोगदा खणला.
खडकांमुळे ड्रिलिंगमध्ये अडथळे येत असल्याने विलासपूरहून अधिक क्षमतेचे ड्रिलिंग यंत्र मागविले.
अतिशय सावधगिरी बाळगून राहुलजवळ पोहोचून मदत पथकाने राहुलला सुखरूप बाहेर काढले.
त्याची तातडीने तपासणी करून उपचारांसाठी १०० किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून राहुलला विलासपूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल केले.
राहुलच्या आईवडील व नातेवाइकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह जिल्हाधिकारी व मदत कार्यात सहभाही सर्वांचे आभार मानले.
या बचाव मोहिमेतील पाचही दिवस जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार शुक्ला व पोलिस अधिकारी विजय आग्रवाल यांनी गावात तळ ठोकला होता.
तळपणारे ऊन आणि ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे विजय कुमार यांची प्रकृती बिघडली, पण तरीही त्यांनी घटनास्थळ सोडले नाही.
आमचा मुलगा बहादूर आहे. कूपनलिकेच्या खड्ड्यात १०४ तास साप, बेडूक त्याचे सहकारी होते. आज संपूर्ण छत्तीसगड उत्सव साजरा करीत आहे. राहुल लवकरच बरा होऊन रुग्णालयातून घरी परतेल, अशी आम्ही सर्वजण प्रार्थना करीत आहोत.
- भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.