Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News Updates 18 July 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात काल दुपारी विशेष सुरक्षेत दाखल झाली.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

Live News Updates छ: पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला भीषण अपघात

इंदापूर येथे रामवाडीच्या परिसरात पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. पिकअप टेम्पो रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला. या टेम्पोमध्ये एकूण अकरा लोक होते, ज्यापैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत आणि एक महिला वारकरीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात सहभागी असलेली लहान मुलं मात्र सुखरूप आहेत. घटनास्थळी इंदापूर पोलीस तत्काळ दाखल झाले आणि जखमींना तात्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Dhananjay Munde Live: धनंजय मुंडेंची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदी निवड

मंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाल्याने, बीडच्या परळीत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी परळी शहरातील लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकत्रित येत फटाक्यांची आतिषबाजी करत या निवडीचे स्वागत केले आहे. दरम्यान यावेळी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली

pune live: ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसाठी 3 ऑगस्ट रोजी पुण्यात शिबिराचे आयोजन

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसाठी 3 ऑगस्ट रोजी पुण्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे, ज्यामध्ये निवडणुकीसाठीची रणनीती आणि तयारीवर चर्चा होणार आहे.

Railway Accident Live: डीब्रुगड एक्सप्रेसच्या घातपाताचा संशय

डीब्रुगड एक्सप्रेसच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघात होण्यापूर्वी लोको पायलटने स्पोटाचा आवाज ऐकल्याचा दावा केला आहे.

Amdabas Danve: पैठण मधून गद्दारी मिटवायची आहे

पैठण विधानसभा मतदार संघाची गद्दाराला गाडायची परंपरा राहिली आहे. १९९० साली येथे गद्दारी झाली होती परंतू निष्ठावंत शिवसैनिकांनी ही चुक दुरुस्त करून १९९५ साली पुन्हा शिवसेनेचा आमदार निवडून आणला होता.आगामी विधानसभा निवडणुकीत ही असेच आपल्याला कार्य करायचे असून येथील गद्दारी मिटवायची असल्याची सूचना शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केली

Pooja Khedkar: दिलीप खेडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला आहे.

Pune: ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर

भोसरी विधानसभेच्या मुद्द्यावर पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झाली आहे. नेत्यांनी काढलेल्या समजुती नंतर नाराजी दूर झाली आहे.

दोन दिवसापूर्वी झालेल्या गर्दी संदर्भात ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली एअरपोर्ट प्रशासनाची भेट

दोन दिवसापूर्वी झालेल्या गर्दी संदर्भात ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली एअरपोर्ट प्रशासनाची भेट घेतली. मुंबईत एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेतील गोंधळ आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत जाब विचारण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांनी ही भेट घेतली. लोकाधिकार समितीचे अध्यक्ष-शिवसेना नेते-सचिव खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष आमदार विलास पोतनीस, सरचिटणीस प्रदीप मयेकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. महाराष्ट्रासह देशभरातून मुंबईत आलेल्या उमेदवारांना कोणत्याही सोयीसुविधा न पुरवता पावसात उभे केले जाते, त्यांच्या आरोग्याची आणि जिवाची पर्वा केली जात नाही. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने पुन्हा भरती प्रक्रिया राबवू नका शिष्टमंडळाने एअरपोर्ट प्रशासनाला निवेदन दिले.

Nashik Live News Updates : नाशिकच्या सिटी सेंटर मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून लहान मुलगा पडला

नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून लहान मुलगा पडल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Live: भाईंदर पालिकेच्या बसची महिलेला धडक, महिलेचा मृत्यू

भाईंदर पूर्वेच्या बस स्पॉटवर एका महिलेला बसची धडक बसली. मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहनच्या बसच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड करण्यात आली. ५८ वर्षीय महिलेचे नाव दुर्गादेवी बिस्ट असं आहे. बस चालकाला नवघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Mumbai Live : विधानसभेसाठी शिंदे यांचा शरद पवार फॉर्म्युला?

विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शरद पवार फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याची चर्चा आहे. काही जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा प्लॅन आहे. विधानसभेसाठी 100 जागांची तयारी शिंदे गटाकडून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. 100 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. लोकसभेला केवळ दहा जागा घेऊन आठ जागा शरद पवार यांनी जिंकल्या होत्या. त्याचप्रमाणं लिमिटेड जागांवर लढून त्याच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचं कळतं आहे.

Gadchiroli Naxal Encounter Live Updates: गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडो पथकाने 12 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडो पथकाने काल जिल्ह्यात 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. हा व्हिडिओ C-60 कमांडोने केलेल्या नक्षलविरोधी ऑपरेशनचा आहे.

Maharashtra Rain Live Updates: कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता - प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई

कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. -प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई

Murlidhar Mohol Live Updates: देशात गेल्या दहा वर्षांत हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती झाली - राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ 

पॅनासोनिक अ‍ॅव्हिओनिक्स कॉर्पोरेशन'च्या पुण्यातील नवीन सॉफ्टवेअर आरेखन आणि विकास केंद्राचं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, देशात गेल्या दहा वर्षांत हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती झाली असून, प्रवासी विमानांची संख्या ४०० वरून ७१३ वर गेली आहे; तसंच हवाई प्रवाशांची संख्या सहा कोटींनी वाढली आहे. येत्या पाच वर्षांत एक हजार नवीन विमानं प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

Sindhudurg Rain Live Updates: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, होडवडे पुलावर पावसाचे पाणी आले आहे.

Mumbai Railway Live: अंधेरी स्थानकात छत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप, पावसात भिजत गाठतायत लोकल

अंधेरी स्थानकात प्लॅटफॉर्मला छत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यांना भर पावसात भिजत लोकल पकडावी लागतेय. तर लोकलमधून उतरलेले प्रवासीदेखील भिजत प्लॅटफॉर्मच्या बाहेर जाताना दिसत आहेत.

Sambhajinagar live : संभाजी नगरमधील मॉलमध्ये बिबट्याचा वावर

संभाजी नगरमधील मॉलमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील पोद्दार शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.

Ajit Pawar In Satara Live: अजित पवार साताऱ्यात दाखल; विशाळगढावर पाहणीसाठी जाणार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता साताऱ्यात दाखल झाले आहेत. विशाळगढावरील लोकांची भेट घेत परिस्थितीची पाहणी करणार. लवकरच करणार गढाकडे कूच.

Shivsena Eknath Shinde Live : शिवसेनेचे मंत्री, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि प्रवक्ते वर्षा बंगल्यावर दाखल

शिवसेना पक्षाचे मंत्री , नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते वर्षा बंगल्यावर दाखल. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातील घडामोडींचा घेणार अंदाज. पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियान बाबत घेणार माहिती. लोकसभा निवडणुकीत मध्ये कुठे दगाफटका झाला या संदर्भात देखील घेणारा आढावा. पक्षांतर्गत वाद व नाराजी तसेच स्थानिक राजकारणाबाबत आढावा घेणार.

Jayant Patil Live Update : विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर - जयंत पाटील

पायथ्याला असलेल्या लोकांना वरती जाऊ न दिल्याने, त्यांनी तेथील धार्मिक स्थळावर हल्ला केला. तेथील लोकांची घरदारं फोडून,तिजोऱ्या लुटून त्यातील संपत्ती नेली. हे शिवप्रेमींचे लक्षण नसून, पुण्यातील किंवा कुठूनतरी वेगळ्या ठिकाणावरून आलेले गुंड आहेत. अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल.

NEET Live: नीट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG 2024 परीक्षेतील कथित पेपर लीक आणि गैरप्रकार यासंबंधीच्या प्रकरणांची सुनावणी सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण महत्त्वाचे असून, लाखो विद्यार्थी या प्रकरणी निकालाची वाट पाहत आहेत.

Chiplun Blast Hindi: चिपळूण एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट; कर्मचारी गंभीरपणे जखमी झाल्याची शक्यता

चिपळूण-लोट एमआयडीसीतील पुष्कर पेट्रो केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. कंपनीच्या परिसरात असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार कंपनीतील कर्मचारी गंभीरपणे जखमी झाल्याची शक्यता आहे. दरम्यान स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai Rain Live: मुंबईत पावसाचा धुमाकूळ

मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणायचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Live News Updates : विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार?

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करणार आहे. शरद पवार यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत सरकारला चिमटा काढला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावरून अनेक निवडणुका लढल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात निर्णय प्रलंबित ठेवला आहे.

उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत, मराठीला अभिजात दर्जा मिळावा याबाबत मागणी केली होती. आता याबाबत मुख्यमंत्री विभागाकडून संबधिक विभागाला पत्र लिहून याबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.

Ratnagiri Rain Update Live : पावसाचा कहर! लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली

रत्नागिरी- लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. रात्रीपासूनच लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आले आहे.

CM Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार आमदारांची महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची आज बैठक बोलावली आहे. यामध्ये आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Ajit Pawar Pimpri-Chinchwad Meeting Live: : अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकांसोबत बैठक सुरु

अजित पवार अॅक्शन मोडमध्ये गेले आहेत. त्यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. अजित पवार गटाच्या अनेकांनी काल शरद पवार गटात प्रवेश केला होता.

Ajit Pawar Live: अजित पवार आज विशाळगडावर जाऊन पाहणी करणार

उपमुख्यमत्री अजित पवार आज विशाळगडावर जाणार आहेत. त्याठिकाणी ते परिस्थितीचा आढावा घेतील. दोन दिवसांपूर्वी विशाळगडावर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राडा झाला होता.

Almatti Dam LIVE : आलमट्टी जलाशयात शंभर टीएमसी पाणीसाठा

चिक्कोडी : आलमट्टी जलाशयात एक जुलै रोजी केवळ ३७ टीएमसी पाणी जमा झाले होते. तर बुधवारी (ता. १७) तब्बल ९९.३१७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशय ८०.६९ टक्के भरले आहे. म्हणजेच केवळ १६ दिवसांत जलाशयात ६२ टीएमसी पाणी साठा झाला आहे. महाराष्ट्रातील पावसामुळे आलमट्टीत पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी ९२ हजार क्युसेक इतकी आवक होती, तर ६० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.

China Shopping Centre Fire live : चीनमध्ये मोठी दुर्घटना! शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत 16 जणांचा होरपळून मृत्यू

बीजिंग : नैऋत्य चीनमधील एका शॉपिंग सेंटरला आग लागली आहे. या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 14 मजली व्यावसायिक इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दल आणि बचाव कर्मचारी लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पहाटे 3 वाजेपर्यंत बचाव कर्मचाऱ्यांचे हे पथक लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करत होते.

Arrested by ED LIVE : माजी मंत्री नागेंद्र यांच्या पत्नीस ईडीकडून अटक

बंगळूर : महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाचे पैसे बेकायदेशीर हस्तांतरित केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार बी. नागेंद्र यांच्या पत्नी मंजुळा यांना सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली. बंगळूरच्या डॉलर्स कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक केली. चौकशीसाठी शांतीनगर येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात नेले.

NEET-UG 2024 शी संबंधित 40 हून अधिक याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आज (गुरुवार) वादग्रस्त वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG 2024 शी संबंधित याचिकांवर सुनावणी करणार आहे. ही परीक्षा ५ मे रोजी झाली. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ४० हून अधिक याचिकांवर सुनावणी होणार आहे.

Joe Biden LIVE : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीये. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होत आहेत. त्यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाचे तगडे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आहेत. अशातच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. व्हाईट हाऊसने यासंदर्भातील माहिती दिली आहे. इथे क्लिक करा

Vishalgad Kolhapur : ''राष्ट्रवादीचे पदाधिकारी उद्या विशाळगडावर जाणार''

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हा पदाधिकारी शुक्रवारी (ता. १९) विशाळगडाला भेट देणार आहेत. विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत सलोखा निर्माण व्हावा व पीडितांना अत्यावश्यक वस्तूंची मदत देण्याच्यादृष्टीने हे पदाधिकारी ही भेट देणार आहेत,’ अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंबा येथे खासदार दिवंगत उदयसिंहराव गायकवाड यांच्या ‘पर्णकुटी’ या निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येण्याचे आवाहनही पत्रकात केले आहे. या भेटीत आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Vishalgad Controversy LIVE : मोहरम, आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम स्थगित

शाहूवाडी : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम आज मोहरम व आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर स्थगित ठेवण्यात आली होती. त्यामुळे आज गडावर शांतता होती. विशाळगडावरील अतिक्रमणे काढावीत यासाठी १४ जुलै रोजी शिवभक्तांनी गडपायथ्यापर्यंत धडक देत आंदोलन केले होते.

Wagh Nakh Satara LIVE : शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात विशेष सुरक्षेत दाखल

Breaking Marathi News Updates 18 July 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात काल दुपारी विशेष सुरक्षेत दाखल झाली. ही वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. NEET परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. तर, पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवन इथं तातडीची बैठक होणार आहे. कोयना धरण परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने त्याची जाणीव झाली नाही. तसेच नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना सुरक्षा जवानांनी चकमकीमध्ये बारा नक्षलवादी ठार झाले. विशाळगड प्रकरण तापलं आहे. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.