Latest Maharashtra News Updates : एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Breaking Marathi News live Updates 21 july 2024 : भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस सुरु आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

भंडारा जिल्हात रेड अलर्ट जारी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. रहवामान खात्याने भंडारा जिल्हात रेड अलर्ट जाहीर केले असून खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Kokan: रत्नागिरी जिल्ह्याला 23 जुलैपर्यंत आँरेंज अलर्ट

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्याला 23 जुलै पर्यंत आँरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यावेळी केवीज पार्क परिसरात मोठं झाड कोसळलं

गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, जगबुडी नदीवरील मोठ्या पुलाला भगदाड

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील मोठ्या पुलाला भगदाड पडल्यामुळे पुल धोकादायक बनला आहे. या कारणामुळे गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळी खेड पोलिस दाखल झाले आहेत.

kolhapur rain live: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर! झाड कोसळलं, रस्ते बंद

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. शिरोळ तालुक्यातील शिरढोण - कुरुंदवाड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सकाळपासून पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी धोकादायक स्थितीमध्ये पुलाचा वापर सुरू केल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला. कोल्हापूर शहरातही मुसळधार पाऊस पडत असून, केवीज पार्क परिसरात एक मोठं झाड कोसळलं आहे. रस्त्याच्या मध्यभागी झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महानगरपालिकेकडून रस्त्यात कोसळलेले झाड बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Satara Rain Live: साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस, महू धरण 100 टक्के भरले

साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या तालुक्यातील महू धरण 100 टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसाडून वाहू लागले आहे. तालुक्यातील कुडाळ, करहर, उडतरे आणि सर्जापूर परिसरातील नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. आज महू धरणातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या परिसरात येत्या 24 तासात पावसासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही एखादा पिक्चर काढावा लोकांना सत्य काय ते समजून घ्यावं....पिक्चरमध्ये खऱ्या आणि खोट्या गोष्टी दाखवता येतात. त्यांना कोणाचे मुखवटे पाडायचे असतील तर त्यांनी जरूर पिक्चर काढावा ... महाराष्ट्राला कळू द्या कोणाचे मुकुटे कसे आहेत अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. कर्जा घेऊन सरकार राज्य चालवतायेत मात्र डिंपल चड्ड्याला चारशे कोटी सरकार देत आहे.... यांना मराठी माणसं दिसत नाही... बिनव्याजी काय घरात पोहोचून देखील हे लोक पैसे देतील. मुंबई महानगरपालिकेत बिघडलेल्या मशीन पंचवीस हजारच्या त्याचं बिल 65000 लावलेला आहे. क्लीन सोल्युशन यामध्ये 60 कोटी रुपयांचा स्कॅम आहे 70 टक्के कामगार हे हैदराबादचे.... मराठी माणसं शिकून हे लोक तिकडचे कामगार मागवतात. मुंबई महानगरपालिका म्हणजे 50 लिटर दूध देणारी गाय... नुसतं दूध काढतात काही दिवसांनी बैलाचाही दूध काढतील ही परिस्थिती आहे....मुंबई महानगरपालिका म्हणजे लूट असेही अव्हाड यावेळी म्हणाले.

पालघर MIDCतील सफायर लाईफ सायन्सेज कंपनीला भीषण आग

पालघर एमआयडीसीतील सफायर लाईफ सायन्सेज कंपनीला संध्याकाळी चार वाजता च्या सुमारास भीषण अशी आग लागली. या आगीचे आणि धुराचे लोळ परिसरात पसरल्याने या एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीच वातावरण पसरले होते. औषध तयार करणाऱ्या या कंपनीत शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल आहेत .

तब्बल एक ते दीड तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असलं तरी अजूनही आग पूर्णपणे नियंणात नाही . सुदैवाने आग लागल्यानंतर या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी कारखान्यातून पळ काढल्याने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही या कंपनीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे . बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये आगी लागण्याचे सत्र सुरूच असून यामुळे या एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .

Mumbai Rain Live : नवी मुंबईत पावसाचा जोर कमी झाला, पण....

नवी मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असून असे असले तरी सखल भागातील पाणी अद्याप ओसरले नाहीये. नवी मुंबईतील एमआयडीसी भागात सर्वत्र घुडघाभर पाणी आहे. या पाण्यारून वाट काढतांना वाहनचालकांची दमछाक होताना पाहायला मिळतेय. एमआयडीसी विभागातील पाणी ओसरायला अजूनही 1 ते 2 तास लागण्याची शक्यता आहे

Kokan Rain Live : रत्नागिरीतील तुफान पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिज वरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. अंजणारी ब्रिज ब्रिटिश काळातील असून काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षितता म्हणून वाहतूक थांबवण्यात आली आहे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय बैठक संपली

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेधानाच्या पार्श्वभूमीवर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सभागृह नेत्यांची सुरू असलेली सर्वपक्षीय बैठक संपली आहे

सर्वपक्षीय बैठकित काँग्रेसने मांडलेले मुद्दे

NEET/NET घोटाळे, UPSC वाद, बिघडणारी रेल्वे सुरक्षा, अग्निवीर यांच्याशी संबंधित प्रशासनाच्या समस्या

जम्मू आणि मणिपूरमधील अंतर्गत सुरक्षा परिस्थिती

चीनच्या सीमाबाबत देशासमोरील आव्हाने

पूर आणि नैसर्गिक आपत्ती, जंगलतोड आणि प्रदूषण यांमुळे उद्भवलेल्या पर्यावरणविषयक चिंता

केंद्र-राज्य संबंध आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे

असंवैधानिक आदेश देऊन UP सारख्या राज्यात ध्रुवीकरणाचा जाणीवपूर्वक प्रयत्न

Palghar MIDC Fire Update : पालघर MIDC मध्ये औषध बनवनाऱ्या कंपनीला भीषण आग

पालघर नगर परिषद हद्दीतील सफायर लाइफ साइंसेज कम्पनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाची एक गाडी दाखल झालीये. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शार्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai Rain Live Update : मुंबई कोसळणाऱ्या पावसाचा हवाई वाहतुकीला फटका

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि मुंबईतून रवाना होणारी विमानसेवा उशिराने होत आहे. घरातून निघण्यापूर्वी फ्लाईट स्टेटस तपासण्याच्या प्रवाश्यांना सूचना दिल्या जात आहेत. तसेच शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि पाणी साचल्यामुळे प्रवाश्यांना आपला प्रवास लवकर सुरू करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Akhilesh Yadav Live : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवनी मानले ममता बॅनर्जींचे आभार;शहीद दिनाच्या कार्यक्रमात झाले भावुक

“सर्वप्रथम, मला शहीद दिनानिमित्त आमंत्रित केल्याबद्दल दीदीजी (ममता बॅनर्जी) यांचे आभार मानायचे आहेत. पक्ष आणि नेत्याची कार्यकर्त्यांशी असलेली आसक्ती ही पक्षाला मोठा आणि मजबूत बनवते,” असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

Raigad Rain Update Live: महाडमध्ये पूर परिस्थितीची भीती; सावित्री आणि गांधारी नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

काल रात्रीपासून महाबळेश्वर परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे महाडमध्ये पुर परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. सावित्री आणि गांधारी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. सावित्री नदी 5.95 मीटरवरून वाहू लागली आहे.

Mumbai Rain Update Live: मुंबईसह ठाणे- पालघरला मुसळधार पावसाचा इशारा; पुढील ३- ४ तास महत्वाचे

मुंबईत हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ३-४ तास मुंबईत मुसळधार तसेच अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबतच ठाणे- पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Navi Mumbai Rain Live: वाशी, कोपरखैरणे भागात जोरदार पाऊस, पाणी साचायला सुरुवात

नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे वाशी कोपरखैरणे भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर हार्बर मार्गावर ११. ते ४. ४० पर्यंत विशेष ब्लॉक सुरू आहे. त्यामुळे कुर्ला ते पनवेल मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Devendra Fadnavis Live : आज थेट बोलतो; आमदारांचे देवेंद्र फडणवीस यांनी टोचले कान

आज राज्यात समाजा मध्ये दुफळी तयार केली जातेय, काहींना वाटते आम्ही असे केले तर निवडून येऊ याचमुळे पेट्रोल टाकले जात आहे, अरे निवडणुका येतील जातील पण दुफळी निर्माण करू नका, चार वेळा पवार मुख्यमंत्री होते मग आरक्षण का दीले नाही. सुप्रीम कोर्टात देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं तुम्ही का नाही टीकवले आम्ही अण्णा साहेब पाटील मंडळ तयार केले आणि तरुणांना उद्योग दिलेत मनोज जरांगे यांना माझा सवाल नाही माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आहे.

Sambit Patra Live : संसदेतील सर्वपक्षीय बैठकीनंतर डॉ. सस्मित पात्रा काय म्हणाले

संसदेतील सर्वपक्षीय बैठकीनंतर बीजेडीचे खासदार डॉ. सस्मित पात्रा म्हणाले बिजू जनता दलाच्या (बीजेडी) वतीने, आम्ही सर्वपक्षीय बैठकीत अनेक मागण्या मांडल्या आहेत... ओडिशा यापासून वंचित आहे. दोन दशकांहून अधिक काळ विशेष श्रेणीचा दर्जा... बिहार आणि आंध्र प्रदेशातील राजकीय पक्षांनीही आपापल्या राज्यांसाठी विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. दुसरा मुद्दा आहे कोळशाची पुनरावृत्ती न करणे ओडिशा राज्यासाठी रॉयल्टी... आम्ही निधीचे घटणारे केंद्रीय हस्तांतरण आणि त्या दिशेने काम करण्याची गरज याविषयी मुद्दा उपस्थित केला, राजभवनाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या ओडिशाच्या राज्यपालाच्या मुलावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Abhishek Banerjee Live : भाजप सरकारने पश्चिम बंगालसाठीचा केंद्रीय निधी थांबवला - अभिषेक बॅनर्जी

भाजप सरकारने पश्चिम बंगालसाठी केंद्रीय निधी थांबवला, लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी त्यांना धडा शिकवला, कोलकाता रॅलीत अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला.

Goa Cargo Ship Fire Live : गोव्यातील मालवाहू जहाजाला आग

गोव्यातील मालवाहू जहाजाला आग, अग्निशामक ऑपरेशन अद्याप सुरू आहे. आम्ही हेलिकॉप्टरद्वारे कोरडी रासायनिक पावडर पसरवली ज्यामुळे आग मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली,” असे भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक मनोज भाटिया यांनी सांगितले.

Odisha CM Mohan Charan Majhi Live : ओडिशाचे मुख्यमंत्र्यांनी नवीन पटनायक यांची भेट घेतली

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज सर्वपक्षीय बैठक आणि ओडिशा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Bansuri Swaraj Live: बन्सुरी स्वराज यांच्या खासदारकीला आप नेते सोमनाथ भारती यांनी आव्हान

नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार आणि सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांच्या खासदारकीला आप नेते सोमनाथ भारती यांनी आव्हान देत याचिका दाखल केली आहे. याचिकेत स्वराज यांनी निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे.

Orange Alert Live: राज्याला पाऊस झोडपणार,'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात आज रायगड, रत्नागिरी, सातारा, अकोला,अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Sanjay Raut Live: आनंद दिघेंना त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त ओळखतो- संजय राऊत

बाळासाहेबांमुळे आमच्यासारखे लोक उभे आहेत. आम्ही आनंद दिघे साहेबांना त्यांच्यापेक्षा जास्त ओळखतो. त्यांच्याबाबत यांचे काय विचार होते हे आम्हाला माहिती आहे. आज गुरुपोर्णिमा आहे. त्यामुळे खोटे चित्र उभे करू नका, असं संजय राऊत म्हणालेत.

Manoj Jarange Patil Live: प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत- मनोज जरांगे

प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत. दरेकरांना मुलांच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही. डोळ्यातल्या पाण्याला भंपकपणा म्हणता का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Mahayuti Live: जागावाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार- सूत्र

जागावाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Amravati Live: पावसामुळे अमरावती शहरातील मुख्य रस्त्याची चाळण

पावसामुळे अमरावती शहरातील मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्ता नावाला राहिला आहे. ठिकठिकाणी खड्डे दिसत आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

CM Siddaramaiah live : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार, काय आहे कारण?

बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) मधील पर्यायी जमीन वाटप घोटाळ्याबाबत भाजप नेते एन. आर. रमेश यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली. ‘सिद्धरामय्या अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असताना जमीन बळकावण्यासह ‘मुडा’ घोटाळ्यात गुंतले होते,’ असा आरोप करून रमेश यांनी ४०० हून अधिक पानांच्या कागदपत्रांसह तक्रार दाखल करून तपासाची मागणी केली.

Israel Hamas War : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 14 पॅलेस्टिनी ठार; लेबनॉनमध्ये 7 जखमी

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ऑक्टोबरमध्ये सुरू झाल्यापासून थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी उत्तर गाझा पट्टीत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात किमान 14 पॅलेस्टिनी ठार झाले. इस्रायली विमानांनी जबलिया निर्वासित छावणीतील एका घरावर बॉम्बहल्ला केला, त्यात एक पत्रकार, त्याची पत्नी, त्याची दोन मुले आणि त्याची आई ठार झाली, असे सुरक्षा आणि वैद्यकीय सूत्रांनी शनिवारी मीडियाला सांगितले.

Supreme Court : सुनावणी महिनाभर पुढे ढकलल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग पुन्हा खडतर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरण : सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा महिनाभर पुढे ढकलली. सुप्रीम कोर्टात आता २३ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कोर्टाने या सुनावणीसाठी २२ जुलै ही तारीख निश्चित केली होती. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका मागच्या काही वर्षांपासून झालेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्याने सुप्रीम कोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. मागच्या जवळपास १ वर्षांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही.

Surendra Panwar LIVE : बेकायदा खाणकाम प्रकरणी काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांना ED कडून अटक

सोनीपत : सहा महिन्यांपूर्वी बेकायदा खाणकाम प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सोनीपतचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांच्या घरावर छापा टाकला होता. आठवडाभराच्या तपासानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे जप्त केली होती. तेव्हापासून ईडीच्या पथकाने त्यांना सहा वेळा नोटीस पाठवून समन्स बजावले होते. शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, त्यानंतर गुरुग्राम कार्यालयात सुमारे 14 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

Chorla Marg live : चोर्ला मार्ग अवजड वाहनांना बंद

बेळगाव : जांबोटी-चोर्ला मार्गावर संततधार पावसामुळे वाहतुकीत व्यत्यय येत आहे. येथील नदी-नाल्यांवर असलेले पूल जीर्ण झाले असल्याने बेळगावातून जांबोटी-चोर्लामार्गे गोव्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना खानापूरमार्गे वळविण्यात आले आहे; तर चोर्ला घाटातील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. इथे क्लिक करा

Kolhapur News Live : पावसामुळे ३०० हून अधिक रोहित्रे बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून जिल्ह्यातील सुमारे ३०० हून अधिक शेतीसाठी वीज वितरण करणारी रोहित्रे (ट्रान्स्फाॉर्मर) बंद केली आहेत. पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील रोहित्रे बंद ठेवण्यात आली आहेत.

Karnataka Dam : कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

जयसिंगपूर : कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे शनिवारी पहाटेनंतर उघडल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी कमी होण्यास मदत होणार आहे. हिप्परगी धरण प्रशासनाने सर्व २६ दरवाजे खुले केल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. रविवारी दुपारपर्यंत कृष्णेची पाणी पातळी किमान तीन फुटाने कमी होण्याचा अंदाज आहे.

Maratha Kranti Morcha live : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

कोल्हापूर : क्षत्रिय मराठा चेंबर्सचे संस्थापक, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व उद्योजक दिलीप मधुकरराव पाटील (वय ६२)यांचे शनिवारी (ता. २०) सायंकाळी पुणे येथे उपचारासाठी नेताना वाटेतच कराडजवळ निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ असा परिवार आहे. रविवारी (ता. २१) सकाळी मुक्त सैनिक वसाहतीतील निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे.

Kalmodi Dam LIVE : आरळा नदीवरील कळमोडी धरण शंभर टक्के भरले

चास : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदीपात्रात होण्यास सुरूवात झाली आहे. मागील वर्षी धरण १७ जुलैला शंभर टक्के भरले होते. मात्र, चालू वर्षी धरण चार दिवस उशिरा म्हणजे २१ जुलै रोजी भरले आहे.

Parliament Monsoon Session LIVE : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'नीट', 'यूपीएससी' परीक्षेचा मुद्दा गाजणार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी आज (ता. २१) केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन ‘एनडीए’ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (ता. २३) मांडतील. दरम्यान, महाराष्ट्र, हरियाना, झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी हे अधिवेशन होत असल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. नीट परीक्षा, यूपीएससीचा गोंधळ, उत्तरप्रदेशातील कावड यात्रेमुळे निर्माण झालेला वाद हे मुद्दे या अधिवेशनात गाजू शकतात.

Monsoon Update LIVE : विदर्भासह दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार; संततधार पावसामुळे मुंबईतही वाहतूक सेवेला फटका

Latest Marathi Live Updates 21 july 2024 : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात धुवाधार पाऊस कोसळत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस सुरु आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यांनाही पावसाने झोडपलेय. तसेच मनोज जरांगे यांनी शनिवारपासून (ता.२०) अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पाणलोट क्षेत्रात सरासरी १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. महाराष्ट्रातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील कारवाईचे प्रकरण चर्चेत असताना सनदी अधिकाऱ्यांची निवड करणारी संस्था केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याचे उघड झालेय. तसेच राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com