नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी रात्री ९ वाजता बंगभवन येथे अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. मात्र, या कार्यक्रमाला अवामी लीगचा एकही नेता किंवा कार्यकर्ता उपस्थित नव्हता.
छत्रपती संभाजीनगरच्या घाटीतील नर्सिंग काॅलेजमधील ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग घेत त्यांचे डोके त्यांचे डोके भिंतीवर आदळणाऱ्या ११ सिनिअर विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी सस्पेंड करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांना वसतिगृहातूनही काढण्यात येणार आहे
सेवानिवृत्त मुख्य अग्निशामक अधिकारी अनिल महाजन यांच्या घरावर लाचलुचपत विभागाची धाड टाकली. यावेळी अपसंपदा जमा करण्यात पत्नीने प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला,
उद्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 वाजता ऑगस्ट क्रांती मैदानात जाणार आहेत.
सिंधुदुर्ग-पुणे या मार्गासाठी विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून गणेश चतुर्थीपूर्वी 24 ऑगस्टपासून ही विमानसेवा फ्लाय ९१ कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे.
मुंबईत ७५ फूट उंचीवर डौलात फडकणार तिरंगा ध्वज. उद्या सकाळी मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा करणार उद्घाटन. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर लागणार तिरंगा ध्वज. नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ ७५ फूट उंचीवर तिरंगा उभारला जाणार. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अनोखा उपक्रम.
दिव्यांगाना निकृष्ट दर्जाचे ई रिक्षा वाटप करणार्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनीधीच्या कानशिलात आमदार बच्चू कडू यांनी लगावली. दिव्यांग वित्त महामंडळाकडून मागील महिन्यात झालेल्या ई रिक्षा अतिशय निकृष्ट दर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या ई रिक्षाच्या अपघात व नियंत्रण गेल्याच्या तसेच बैटरी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. याकरीता दिव्यांग वित्त महामंडळाचे अधिकारी व कंत्राटदार कंपनीस संभाजीनगर येथे लाभार्थी सक्षम रिक्षाची चाचणी घेण्यात आली.
रस्ते दुरूस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा कामचुकारपणा केला तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे थेट आदेशच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळं आता कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही चांगलीच तंबी असल्याचं बोललं जात आहे.
दादा तुम्ही लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका शेतकरी योजना देखील सुरू करा, अशी मागणी एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं अजित पवारांकडं केली आहे. ही योजना सुरु केली तर तुम्हाला दरवर्षी पैसे द्यावे लागणार नाहीत. एकदाच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करुन टाका, असंही या शेतकऱ्यानं म्हटलं आहे.
पुणे शहरात झिका विषाणूचे आणखी 7 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली: PMC (पुणे महानगरपालिका) आरोग्य अधिकारी
नाशिक शहरातील माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या राका कॉलनी येथील घरात बुधवारी रात्री तब्बल 57 लाखांच्या जुन्या दागिन्यासह इतर वस्तूंची चोरी झाली होती. ही चोरी करताना संशयित आरोपींनी सीसीटीव्हीच्या डीव्हीआर सुद्धा लंपास केला होता.
पोलिसांनी हा तपास करत 24 तासात तीन आरोपींना संपूर्ण मुद्देमालासह जेरबंद केलय. यामध्ये क्राईम ब्रांचं युनिट वनचे मधुकर कड यांच्या टीमला देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 75 हजाराचे बक्षीस देऊन सन्मानित केले.
दिल्ली अबकारी धोरण सीबीआय प्रकरणात राउझ अव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. त्यांना तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी ५.३० वाजता सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. ठाकरे कुटुंबीय आणि खासदार संजय राऊत यांच्यासह गांधी यांच्या निवासस्थानी होणार भेट होणार आहे.
वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 वर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देत भाजप नेत्या हेमा मालिनी म्हणाल्या,"त्यांना (विरोधकांना) प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय आहे. एखादी गोष्ट चांगली असेल तर ती स्वीकारावी. ही मानसिकता त्यांच्यात नसते. एखादी गोष्ट प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ती निदर्शनास आणून द्यावी, पण जर ते ठीक असेल तर ते मान्य केले पाहिजे. सर्व काही चुकीचे असू शकत नाही.'
सुरेश पालवेंची बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविले आहे. ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये त्यांना हे पदक मिळाले असून वैयक्तिक पदक मिळविणारे ते महाराष्ट्रातील दुसरे खेळाडू ठरला आहे.पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर स्वप्नील चे जोरदार स्वागत करण्यात आले.यानंतर स्वप्नील ने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली आहे.यावेळी त्याचे ट्रस्ट कडून स्वप्नील चे स्वागत करण्यात आले.यावेळी स्वप्नील म्हणाला की पहिले गणपती बाप्पा मोरया..बाप्पाच्या मुळेच सर्व काही आहे म्हणून पाहिले बाप्पा ला भेटायला आलो आहे.जे मागितलं आहे ते बाप्पाने आजपर्यंत दिलं आहे.अस यावेळी स्वप्नील ने सांगितल.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि अजय चौधरी नवनियुक्त राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभेत जातीय जनगणा करण्याची मागणी लावून धरणाऱ्या विरोधीपक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जात भाजपचे खासदार अनुराग ठाकुर यांनी विचारली. याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
10 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी वायानाडला जाणार आहेत. तिथे जाऊन मोदी एरियल सर्वे करणार असून दरड कोसळल्यामुळे वायनाडची सध्याची स्थिती काय आहे, त्याची पाहाणी ते करणार आहेत.
नाशिक येथील श्रीराम शेटे यांच्या कादवा सहकारी कारखान्याला अजित पवार यांची भेट दिली. श्रीराम शेटे नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते आणि शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आजपासून नरहरी झिरवाळ यांच्या दिंडीरी मतदारसंघपासून सुरू होतेय.
आगामी विधानसभेसाठी मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली आहे. भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या तातडीच्या बैठकीत आमदार श्वेता महाले, राणा जगजीत सिंह पाटील, मोनिका राजळे, तुषार राठोड, महेश लांडगे, संजय सावकारे आणि मंगेश चव्हाण यांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. भाजपच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता या बैठकीत तातडीने निर्णय घेतले जातील.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आज दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:०० वा. धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट बंद करण्यात आले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वाभिमान गमावल्याचे सोपे उदाहरण म्हणून त्यांची टीका केली आहे. भाजप आणि शिवसेना यांची वैचारिक युती होती आणि काँग्रेसला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी युती केली होती. मात्र सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती केली, असे उपाध्ये म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नॅशनल हायवे मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील नॅशनल हायवेंची स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी नॅशनल हायवेच्या अख्त्यारितील रस्त्यांची तात्काळ दूरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीत रस्त्यावरील खड्डे आणि त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. गणेशोत्सवापूर्वी नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अख्त्यारित येणाऱ्या सर्व हायवेंची दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, कालच भिवंडी खाडेगाव बायपास रस्त्याच्या दुरवस्थेत तातडीचे काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
4o
जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा येत्या शनिवारी (१० ऑगस्ट) होत असून, या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पहाटे धुपारती अंगारा होऊन या यात्रेची सांगता होते. रविवारी (ता. ११) सकाळी या यात्रेची सांगता होईल.
जयपूर : राजस्थानमधील सलंबरचे आमदार अमृतलाल मीणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उदयपूरच्या एमबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 65 वर्षांचे होते. मीना यांना काल रात्री छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर उदयपूर येथील एमबी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीना 2013 पासून तीन वेळा आमदार झाले आहेत. त्याचवेळी अमृतलाल मीणा यांच्या निधनानंतर राजस्थान विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या 114 झाली आहे.
नवी दिल्ली : वक्फ बोर्डाचे नियमन करणाऱ्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आज अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू लोकसभेत मांडणार आहेत. या विधेयकाला अनेक खासदारांनी आधीच विरोध नोंदवला आहे. त्याचबरोबर आजही या विधेयकाला लोकसभेत मुस्लिम खासदारांचा विरोध होऊ शकतो. वक्फ मालमत्तेची नोंदणी केंद्रीय पोर्टलद्वारे करण्याचे मार्ग सुव्यवस्थित करण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. हे विधेयक 18 फेब्रुवारी 2014 रोजी राज्यसभेत मांडण्यात आले.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची आज बैठक आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही बैठक बोलावलीये. सकाळी १० वाजता संसद भवनातील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे, त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार आहे.
सांगली : मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली आज (ता. ८) येथे निघणार आहे. मिरजेतून सुरवात होणार असून राम मंदिर चौकात समारोप होईल, तिथेच सभा आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी दिली.
दादर रेल्वे स्थानकात बॅगेत मिळालेल्या मृतदेहाप्रकरणी मयत अर्शदअली शेख याच्या पत्नीला अटक केली आहे. पत्नी रूक्सनाचा हत्येत सहभाग आढळल्याने पायधुणी पोलिसांनी कारवाई केली. रूक्सनाच्या पतीचा मित्र आणि आरोपी जय चावडा याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पायधुणी येथे जय चावडाने अर्शदला दारू पिण्यासाठी बोलावून मित्र शिवजीत सिंगच्या मदतीने त्याची हत्या केली.
माझगाव कोर्टाचा नीतेश राणे यांना दणका बसला आहे. राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. अटक टाळण्यासाठी नीतेश राणेंना १७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत राणेंविरोधात माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिंडोरीतून यात्रेची सुरुवात होणार आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. अनिस चव्हाण असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी चव्हाण यांच्या डोक्याला एका अपघातात दुखापत झाली होती. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वरिष्ठ डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसल्याने त्यांना दोन ते अडीच तास उपचार मिळाले नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा आणि अखेरचा दिवस आहे. आज उपराष्ट्रपती धनखड यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. धनखड यांची होणारी ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर, दुपारनंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. INDIA आघाडीतील इतर काही महत्त्वाच्या पक्षांचे नेते आज उद्धव ठाकरे यांना भेटण्याचीही शक्यता आहे.
Latest Marathi Live Updates 8 August 2024 : बांगलादेशमध्ये हंगामी सरकार आज स्थापन होणार असून, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ महंमद युनूस या सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा आणि अखेरचा दिवस आहे. त्याचबरोबर राज्य पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा येत्या शनिवारी होत असून, या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. वक्फ बोर्डाचे नियमन करणाऱ्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आज अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू लोकसभेत मांडणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.