आज आपण नारी शक्तीचा गजर बघितला असेल. विकसित भारताचा संकल्प केला आहे. ज्या पद्धतीने बजेटमध्ये व्यवस्था उभ्या केल्या. यामधून नारीशक्ती मजबूत होणार आहे.मोदीजींच आणि अर्थमंत्री यांच अभिनंदन करतो. देश कल्याणाकरिता अनेक बाबी या अर्थसंकल्पात दिसतील. जेव्हा विस्तृत अर्थसंकल्प येईल तेव्हा अजून बदल दिसतील, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला हा अर्थसंकल्प आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेट मध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला. प्राप्तिकर स्लॅबमध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही असाही टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला
आजचा अर्थसंकल्प हा निराशाजनक असल्याचे काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पात व्यावसायिकांना सवलती दिल्या गेल्या नाहीत. महागाई आणि त्याबाबत काही उपाययोजना या अर्थसंकल्पातून झाल्या नाहीत. खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. या बजेट मधून सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना काहीच मिळालेलं नाही त्यामुळे हे बजेट निराशा जनक असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. पाहुयात राजू शेट्टी काय म्हणाले आहेत.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले, आभार मानले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरिब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे. 1 कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे. गरिब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चे घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतीकारी आहे. यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल.
‘लखपती दिदी’ या कार्यक्रमातून 3 कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आला आहे. 9 कोटी महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे. 11 लाख कोटींची गुंतवणूक रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी करण्यात येते आहे. यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या गुंतवणुकीतून एकिकडे पायाभूत सुविधा निर्माण होत असताना रोजगारात सुद्धा वृद्धी होणार आहे.
शेतकर्यांसाठी नॅनो डीएपी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. शेतकर्यांच्या शेतमालाला भाव आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यासाठीच्या विविध योजनांचा उहापोह या अंतरिम अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. विकासाची दिशा सांगणारा पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. विकसित भारताचा रोडमॅप पूर्णकालिन अर्थसंकल्पातून येईल, हा आत्मविश्वास देणारा सुद्धा हा अर्थसंकल्प आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. त्यात सातत्याचा विश्वास आहे. हा अर्थसंकल्प युवा, गरीब, महिला आणि किसान या 4 स्तंभांना सक्षम करेल. हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची हमी देतो. या अर्थसंकल्पात तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवकल्पना यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी आहे.
2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्पातील रेकॉर्डवरील सर्वात लहान भाषणांपैकी हे एक होते. त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही,असं त्यांनी म्हटलं आहे.
अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्याने संसदेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. मी कर दरात कपात केली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, आम्ही जैवइंधनासाठी समर्पित योजना आणली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-वाहने उपलब्ध करून दिली जातील. रेल्वे-सागरी मार्ग जोडण्यावरही भर दिला जाणार आहे. पर्यटन केंद्रांच्या विकासाला गती देणार. पर्यटन क्षेत्राच्या विकासाला वेग आला आहे. राज्यांना बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरे हवाई मार्गाने जोडली जातील. लक्षद्वीपमध्ये नवीन प्रकल्प सुरू होतील. पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरे महिलांसाठी बांधलेली आहेत. पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल. 75 हजार कोटी रुपयांचे कर्ज बिनव्याजी देण्यात आले आहे. एफडीआय देखील 2014 ते 2023 पर्यंत वाढले आहे. सुधारणांसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प येईल. त्यात विकसित भारताचा रोडमॅप मांडण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांवर 11 टक्के अधिक खर्च केला जाईल. लोकसंख्या वाढीबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे दिली जातील. स्किल इंडियामध्ये 1.47 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार केला जाईल. मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. पीएम मोदींनी जय अनुसंधानचा नारा दिला आहे. हे लक्षात घेऊन पावले उचलली जातील. गेल्या 4 वर्षात आर्थिक विकासाला वेग आला आहे. युवाशक्ती तंत्रज्ञान योजना बनवेल. तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर रेल्वे गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे. 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील. विमानतळांची संख्या वाढली आहे. एव्हिएशन कंपन्या एक हजार विमानांची ऑर्डर देऊन पुढे जात आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, लखपती दीदींना बढती दिली जाईल. पगार दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींकडून स्वावलंबन आले आहे. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जाईल. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे.
येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी लसीकरण करणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहे.
नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. यासाठी समिती स्थापन करणार आहे.
9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाईल.
नॅनो डीएपीचा वापर पिकांवर केला जाईल. दुग्धविकास क्षेत्रात चांगले काम होईल. दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाईल.
1361 मंडई eName शी जोडल्या जातील. येत्या ५ वर्षांत विकासाची नवी व्याख्या तयार करू.
आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
तेलबियांवरील संशोधनाला चालना दिली जाईल.
महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
मध्यमवर्गीयांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे, येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत.
पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची वर्षे असतील असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. अर्थमंत्र्यांनी 20 मिनिटे केंद्र सरकारच्या योजनांची गणना केली आणि भारताच्या विकासाच्या गतीवर चर्चा केली. पुढे त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील.
'सरासरी वास्तविक उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढले आहे. महागाईचा दर आवाक्यात आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. लोक चांगले जगत आहेत आणि चांगले उत्पन्न मिळवत आहेत. मोठे प्रकल्प प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होत आहेत. जीएसटीमुळे एक देश, एक बाजार आणि एक कर ही संकल्पना बळकट झाली आहे. IFSC ने जागतिक आर्थिक गुंतवणुकीचा मार्ग खुला केला आहे.
'गरीबांचे कल्याण, देशाचे कल्याण, या दृष्टीकोनातून आम्ही काम करत आहोत. 'सबका साथ' या उद्देशाने आम्ही २५ कोटी लोकांना विविध प्रकारच्या गरिबीतून बाहेर काढले आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
'गेल्या 10 वर्षात आम्ही सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला पाणी, सर्वांसाठी बँक खाती अशी कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली आहेत. 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. संसाधनांचे वितरण पारदर्शकतेने करण्यात आले आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांच्या मते गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार घटकांवर आमचे लक्ष आहे. त्यांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
'देशाला नवा उद्देश आणि नवी आशा मिळाली. जनतेने पुन्हा मोठ्या जनादेशाने सरकारला निवडून दिले. आम्ही दुहेरी आव्हाने स्वीकारली आणि सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या दृष्टीकोनातून काम केले. आम्ही सामाजिक आणि भौगोलिक समावेशासह काम केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या, गेल्या 10 वर्षांत अर्थव्यवस्थेत खूप विकास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रगती झाली आहे. ते पंतप्रधान झाले तेव्हा अनेक आव्हाने होती. सबका साथ, सबका विकास या मंत्राने सरकारने या आव्हानांचा सामना केला. लोककल्याणकारी योजना आणि विकास आमच्यापर्यंत पोहोचला.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर करण्यास सुरूवात केली आहे.
अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पातून देशवासियांना काय मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता आहे. मात्र,या अर्थसंकल्पातून सामान्यांना, महिलांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.
मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच अंतरिम अर्थसंकल्प मंजूर केला जाईल. या बैठकीला पंतप्रधान मोदीही उपस्थित आहेत.
अंतरिम बजेट २०२४ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत. त्यानंतर आता मंत्रिमंडळ बैठक होईल. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर ११ वाजता संसदेत बजेट सादर केलं जाईल.
गृहकर्जाच्या व्याजावरील कर कपातीची मर्यादा 2 लाखांवरून ठेट 4 लाखांंपर्यंत वाढू शकते. तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी FAME योजनेचा विस्तार करण्याची तयारी असल्याचे म्हटले जात आहे. याच बरोबर दागिने क्षेत्राला प्रोत्साहन मिळू शकते.
अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात पोहोचल्या आहेत. सध्या त्याला टेम्पोमधून बाहेर काढण्यात येत आहे.
मोरारजी देसाई यांच्यानंतर त्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत, ज्यांनी सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची घोषणा करू शकते. याशिवाय, गावांवर लक्ष केंद्रित करणे आणि शेतकरी आणि महिलांसाठी निधी वाढवण्याची घोषणा देखील होऊ शकते.
आयएमएफचे कार्यकारी संचालक आणि भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यन म्हणाले, 'संपूर्ण बजेट निवडणुकांनंतर जून किंवा जुलैमध्ये आणले जाईल. अशा स्थितीत या अर्थसंकल्पात फारशा तरतुदी होणार नाहीत. अर्थव्यवस्था खूप चांगल्या स्थितीत आहे आणि 7.3 टक्के वेगाने वाढू शकते. मागील वर्षांत सरकारने जे काही केले ते पुढे नेले जाऊ शकते. बजेटमध्ये महिलांसाठी काहीतरी असू शकते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची त्या भेट घेत आहेत.
बजेट तयार करणाऱ्या टीमचे फोटो सेशन पार पडले. केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीसाठी आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रवाना झाल्या आहेत. यावेळी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येईल त्यानंतर ते संसदेत सादर केले जाईल.
अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे त्यांच्या दिल्लीतील घरातून संसदेकडे रवाना झाले आहेत. अंतरिम अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता संसदेत सादर होणार असून अर्थमंत्री देशासमोर मांडणार आहेत. 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प तयार करण्यात अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबतच अर्थ राज्यमंत्रीही महत्त्वाची भूमिका बजावतात.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन वित्त मंत्रालयात दाखल झाल्या आहेत आणि तेथून अर्थसंकल्पाची प्रत घेऊन काही वेळाने राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. आज सकाळी 11 वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास तयार आहेत. नवीन कर प्रणाली पुन्हा फोकसमध्ये आहे. जुन्या कर प्रणालीला पर्याय म्हणून केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 मध्ये सादर केलेली नवीन कर प्रणाली 1 एप्रिल 2023 पासून डीफॉल्ट पर्याय बनली आहे. आता नव्या करप्रणालीचा अवलंब करण्याची आणखी एक संधी मिळू शकते, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
LPG Price Hike : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. आज (गुरुवार) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेमक्या आजच्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका बसला आहे. गॅसच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तास अगोदर एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसचे दर निश्चित करत असतात. कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंदरचे दर वाढवले आहेत. १९ किलोच्या सिलिंडरचे दर वाढलेले आहेत. घरगुती वापराच्या गॅसच्या दरांमध्ये वाढ झालेली नाही.
बातमी सविस्तर वाचा- 2024 Budget : 'बजेट'च्या दिवशीच सर्वसामान्यांना झटका, गॅसचे दर वाढले
लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प असल्यामुळे अनेक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्य, छोट्या-मोठ्या उद्योजकांसाठी काही घोषणा होणाच्या शक्यता आहेत. ़
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पाच पैकी तीन राज्यांत दणदणीत विजय मिळवला आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारकडून लोकभावनात्मक योजनांची घोषणाही अपेक्षित आहे. निर्मला सीतारामन सादर करणार असलेला अर्थसंकल्प तांत्रिकदृष्ट्या एक मत आहे आणि त्याला अंतरिम अर्थसंकल्प म्हटले जात आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा होऊ शकते.
अंतरिम अर्थसंकल्प एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी केंद्र सरकारच्या आवश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी आगाऊ अनुदानासाठी संसदेची मंजुरी घेतो. एप्रिल/मे मध्ये सार्वत्रिक निवडणुकांनंतर निवडून आलेले नवीन सरकार कदाचित जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. आचारसंहिता लागू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 7.30 नंतर त्यांच्या घरातून बाहेर पडतील. सकाळी 8:15 वाजता अर्थ मंत्रालयाच्या गेट क्रमांक 2 वर बजेट तयार करणाऱ्या टीमचे फोटो सेशन होईल. सकाळी 8.45 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि अर्थसंकल्पाला मंजुरी देतील. अर्थमंत्री सकाळी 9.15 वाजता संसदेत पोहोचतील. सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी ११ वाजता संसदेत सुरू होईल.
केंद्रातील मोदी सरकारचा या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आज (ता. १) संसदेत सादर होणार आहे. लोकसभा निवडणुका होईपर्यंतच्या खर्चाला मंजुरी देणे, हा अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश असला तरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या पेटाऱ्यातून काय काय बाहेर काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार नाही. पण, निवडणुकीच्या वर्षांत सरकार मोठ्या घोषणा करू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देशभरात अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प अत्यंत विशेष मानला जात आहे. संपुर्ण देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे.
आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण आणि रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रांवर किती पैसा खर्च करायचा आणि किती कर लावायचा हे सरकार ठरवतं. तसेच, प्रत्यक्ष कर - जसे की आयकर आणि अप्रत्यक्ष कर आणि GST द्वारे किती पैसे जमा करायचे. याचा लेखाजोखा अर्थसंकल्पात सादर केला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.