‘‘केंद्रीय अर्थसंकल्प सरकारच्या आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळाची दिशा ठरविणारा व २०४७ पर्यंत विकसित भारताची पायाभरणी करणारा असेल,’’ अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी संसद अधिवेशनाच्या प्रारंभी दिली. विरोधक नकारात्मकता पसरवीत असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.
पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधताना संसद अधिवेशन सकारात्मक असेल अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘‘देशवासीयांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा आवाज दडपण्याचा प्रकार विरोधकांनी संसदेच्या पहिल्या अधिवेशनात केला.अडीच तासांपर्यंत पंतप्रधानांचा आवाज दडपण्याचा प्रकार झाला. लोकशाहीत या प्रकारांना स्थान नाही. मात्र याबद्दल विरोधकांना पश्चात्ताप नाही,’’ असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (ता. २३) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. त्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी यंदाचा अर्थसंकल्प अमृतकाळाचा महत्त्वाचा अर्थसंकल्प असेल, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, की आम्ही देशवासीयांना ज्या गॅरंटी दिल्या होत्या त्यांची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट घेऊन आमचे सरकार पुढे जात आहोत. हा अर्थसंकल्प या पाच वर्षांच्या कार्यकाळाची दिशा ठरवेल. २०४७ मध्ये स्वातंत्र्याचे शतक पूर्ण होईल तेव्हा विकसित भारताची मजबूत पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प असेल.
तब्बल साठ वर्षांनी एखादे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले असून तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळत असल्याचा पंतप्रधान मोदींनी व्यक्तिगतरीत्या आनंद व्यक्त केला. तसेच, ‘‘विरोधकांना आता राजकीय लढाई संपवून, पुढील पाच वर्षे देशासाठी एकजुटीने काम करावे’’ असे आवाहनही त्यांनी केले.
विरोधकांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘मागील काही महिन्यांपासून सर्व शक्तीनिशी राजकीय लढाई लढून झाली आहे. या कालावधीत कोणी जनतेला मार्ग दाखविण्याचा तर कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र ती राजकीय लढाई संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी एक होऊन, देशासाठी लढणे हेच सर्व खासदारांचे आणि राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे.’’
विरोधकांना कानपिचक्या
विरोधक नकारात्मकता पसरवीत असल्याचा आरोप करत, पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शेलक्या शब्दांत कानपिचक्या दिल्या. ‘‘१४० कोटी देशवासीयांनी बहुमताने सेवेची संधी दिलेल्या सरकारचा आवाज दडपण्याचा प्रकार विरोधकांनी संसदेच्या पहिल्या अधिवेशनात केला. ‘‘जनतेने आपल्याला इथे देशासाठी पाठविले आहे, राजकीय पक्षासाठी नाही,’’ असाही टोला पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लगावला. तसेच सर्व खासदार साधकबाधक चर्चा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘‘लोकशाहीत परस्परविरोधी विचार वाईट नसतात तर नकारात्मक विचार वाईट असतात. देशाला नकारात्मक विचारांची आवश्यकता नाही. देशाला प्रगती, विकासाच्या विचारसरणीची गरज आहे. लोकशाहीच्या या मंदिराचा सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सकारात्मक वापर केला जाईल,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.