नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विरोधात संयुक्त उमेदवार देण्याची घोषणा करणाऱ्या १७ विरोधी पक्षांना अद्याप उमदेवार सापडलेला नाही. या नावावरील सहमतीसाठी विरोधी पक्षांची बैठक मंगळवारी (ता. २१) दिल्लीत होणार असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांची एकजूट दाखविण्यासाठी मागील आठवड्यात १७ विरोधी पक्षांची बैठक झाली होती. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ही बोलावलेली ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यात विरोधी पक्षांचा सहमतीचा उमेदवार देण्यावर एकमत झाले असले तरी नाव अद्याप ठरलेले नाही. त्यावेळी शरद पवार यांनी विरोधकांचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर गोपाळकृष्ण गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांची नावे तृणमूलतर्फे सुचविण्यात आली होती. यातील अब्दुल्ला यांनीही इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर गोपाळकृष्ण गांधींनी अद्याप उमेदवारीसाठी स्पष्ट शब्दात नकार दिलेला नाही ही विरोधकांची जमेची बाजू आहे. त्यानुसार, मंगळवारी दिल्लीमध्ये संसद भवनाच्या आवारातील पार्लमेन्ट अॅनेक्स इमारतीत ही बैठक होईल. बैठकीच्या समन्वयाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सरकारतर्फे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूलसह सर्व विरोधी पक्षांशी चर्चा केली असली तरी सरकारकडून अद्याप उमेदवार कोण हे स्पष्ट करण्यात आले नसल्याने संरक्षण मंत्र्यांना ठोस उत्तर मिळाले नाही. दरम्यान, ममता बॅनर्जी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. याबद्दल त्यांनी शरद पवार यांनाही कल्पना दिली होती. त्यांच्याऐवजी तृणमूलचा ज्येष्ठ नेता उपस्थित राहील, असे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसची भूमिका
काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी विरोधकांच्या या निर्णयाला दुजोरा देताना, काँग्रेस पक्ष आपला उमेदवार सुचविणार नाही असेही स्पष्ट केले. काँग्रेसने उमेदवाराचे नाव सुचविल्यास त्याला तृणमूलकडून विरोध होऊ शकतो. तसे झाल्यास विरोधी ऐक्यावर सवाल उपस्थित होण्याची शक्यता असल्याने सहमतीच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहील अशी भूमिका आधीच्या बैठकीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आधीच स्पष्ट केली होती, याकडे या सूत्रांनी लक्ष वेधले. काँग्रेसला विरोध करणारा आम आदमी पक्ष देखील अंतिमतः विरोधकांच्या संयुक्त उमेदवाराला पाठिंबा देईल, असे सूचक विधानही या सूत्रांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.