नवी दिल्ली : संसदेच्या येत्या १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये जातिनिहाय जनगणनेसह अन्य नऊ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी म्हणून काँग्रेस पक्ष आग्रही आहे. काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्यासह अन्य नऊ बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.
देशात जातिनिहाय जनगणना व्हावी म्हणून काँग्रेस पक्षाने आग्रही भूमिका घेतली आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांनीसुद्धा यापूर्वीच जातिनिहाय जनगणनेची मागणी केली होती. येत्या १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनाची कार्यसूची केंद्र सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. विरोधी पक्षांच्या गट नेत्यांच्या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींना एक पत्र पाठविले आहे. विरोधकांशी कोणतीही चर्चा न करता हे अधिवेशन बोलाविण्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
या अधिवेशनात जनतेचे प्रश्न लावून धरण्यासाठी विरोधक सहभागी होणार आहेत. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी निश्चितपणे वेळ दिला जाईल, अशी आशा त्यांनी पत्रात व्यक्त केली. या पत्रात सोनिया गांधी यांनी नऊ मुद्यांचा उल्लेख केला आहे.
यात महत्त्वाचा मुद्दा हा जातिनिहाय जनगणनेचा आहे. देशात तातडीने जातिनिहाय जनगणना करणे गरजेचे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातिनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘ओबीसीं’च्या आरक्षणासाठी ही जनगणना आवश्यक असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या मागणीला आता काँग्रेसनेसुद्धा पाठिंबा दिला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा वापरला जाऊ शकतो.
दुसरीकडे केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. ‘‘ जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर या विशेष अधिवेशनात चर्चा व्हावी,’’ अशी मागणी सोनिया यांनी केली आहे. या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सकारात्मक सहकार्य देऊ, असे आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले आहे.
खर्गेंच्या निवासस्थानी खलबते
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा झाली. सोनिया गांधी यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर या नेत्यांनी सहमती दर्शविली आहे.
या बैठकीला ‘तृणमूल’चे डेरेक ओब्रायन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत, ‘द्रमुक’चे टी. आर. बालू, ‘राजद’चे मनोजकुमार झा, ‘संयुक्त जनता दला’चे लल्लनसिंग, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बिनॉय विश्वम, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, ‘आप’चे संजयसिंह आणि राघव चढ्ढा उपस्थित होते.
येत्या १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यसूची वेळेत विरोधकांना उपलब्ध करून दिली जाईल. संसदीय परंपरेप्रमाणे अधिवेशनाच्या आधी विरोधकांशी चर्चा केली जाते. या परंपरा माहिती असणे गरजेचे आहे; यात लपविण्यासारखे काहीही नसून अधिवेशनाच्या आधी कार्यसूची विरोधकांना दिली जाईल.
- प्रल्हाद जोशी, संसदीय कार्यमंत्री
विशेष अधिवेशन नव्या वास्तूत
येत्या १८ सप्टेंबरपासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन जुन्या इमारतीत सुरू होणार आहे. गणेश चतुर्थीला म्हणजे १९ सप्टेंबरला नव्या इमारतीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज होईल, असे बोलले जात आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन गेल्या २८ मे रोजी झाले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशन हे जुन्याच इमारतीत पार पडले होते.
या मुद्द्यांवर चर्चेसाठी सोनिया गांधी आग्रही...
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील प्रचंड वाढ
देशभरातील लघु उद्योगांची दयनीय स्थिती
कृषी कायदे रद्द करताना केंद्राने दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?
किमान हमी भाव (एमएसपी) देण्याच्या घोषणेचे काय झाले?
अदानी उद्योगसमूहाची ‘जेपीसी’ मार्फत चौकशी करण्यात यावी
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून तिथे अद्यापही शांतता नाही
हरियानासह विविध राज्यांमध्ये जातीय तणाव वाढत आहे
चीनच्या भारतातील अतिक्रमणामुळे सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला आहे
केंद्र-राज्यांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे
अनेक राज्यांना अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.