Students_CBSE_Exam
Students_CBSE_Exam

CBSE : दहावीची परीक्षा रद्द, बारावीचे पेपर स्थगित; केंद्राचा मोठा निर्णय

Published on

CBSE Board Exam : नवी दिल्ली : देशाला कोरोनाचा पुन्हा विळखा पडलेला असताना केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (ता.१४) जाहीर करण्यात आला.

कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यासंदर्भात बैठक आयोजित केली. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय शिक्षण सचिव आदी अधिकारी त्यासाठी त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी परीक्षा ऑनलाइन स्वरुपात वा अन्य कोणत्या पद्धतीने घेता येतील, यावरही विचार करण्यात आला. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

बारावीची परीक्षा येत्या ४ ते १४ मे या कालावधीत होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या एक जून रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षेची तारीख निश्‍चित करण्यापूर्वी १५ दिवस विद्यार्थ्यांना सूचित केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परीक्षा कधी होणार, होणार की नाही, अशी चिंता लागून असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल हा मंडळाने तयार केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. यात पद्धतीने दिलेले गुण हे कमी वाटत असल्यास विद्यार्थ्यांना कोरोना प्रादुर्भाव निवळल्यानंतर दहावीच्या परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

सीबीएसईच्या परीक्षांबाबत निर्णय झाला असला, तरी आयसीएसईच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या मंडळाशी संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये अजूनही धास्ती कायम आहे. मात्र, सीबीएसईप्रमाणेच या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात येतील, असे सरकारी स्तरावरून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे आधीच जाहीर केले आहे. परंतु सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुंबईत सचिव स्तरावर संपर्क साधला असता, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होणार नाही. मात्र, शिक्षणमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.

दरम्यान, भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 38 लाखांच्या वर पोहोचली असून मंगळवारी दिवसभरात 1 हजार 27 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 72 हजार 85 जणांना मृत्यू झाला आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.