केंद्राकडून ५१ हजार कोटींचे अंशदान

शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च घटणार
farmer
farmeresakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी ‘एनपीके’ रासायनिक खतांसाठी पोषक घटकांवर आधारित ५१ हजार कोटी रुपयांचे अंशदान जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च कमी होणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला. ‘इथेनॉलमिश्रित पेट्रोल’ कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ मधील पुरवठ्यासाठी इथेनॉलच्या दरवाढीचा निर्णयही केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशयासारख्या सूक्ष्म रासायनिक पोषक घटकांसाठी रासायनिक खतांवर प्रति किलोग्रॅम पोषक द्रव्य आधारित अंशदान देण्याच्या खत मंत्रालयाच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने मंजुरीची मोहोर उठविली. या बैठकीत ५१ हजार ८७५ कोटी रुपयांचे अंशदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे अंशदान १ ऑक्टोबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील रब्बी हंगामासाठी असेल.

खते मिळणार परवडणाऱ्या दरात

या निर्णयानुसार ‘नायट्रोजन’साठी प्रति किलो ९८.०२ रुपये, ‘फॉस्फरस’साठी प्रति किलो ६६.९३ रुपये, ‘पोटॅश’साठी २३.६५ रुपये प्रति किलो आणि ‘सल्फर’ साठी ६.१२ रुपये प्रति किलो अंशदान देण्यात येईल.

खते आणि युरिया, डीएपी, एमओपी आणि गंधक या कच्या मालाच्या किमतींमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड वाढ झाल्यामुळे, सरकारने ‘डीएपी’सह फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांवर अनुदान वाढवून वाढीव किमतीचा बोजा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खत कंपन्यांना मंजूर दरांनुसार अनुदान दिले जाईल यातून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध होतील, असे सरकारचे म्हणणे आहे.

इथेनॉल दरांवर शिक्कामोर्तब

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी १ डिसेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ च्या साखर हंगामासाठी उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या वाढीव दरांवरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. यात ‘सी’ हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ४६.६६ रुपयांवरून प्रतिलिटर ४९.४१ रुपये अशी वाढ करण्यात आली आहे .

‘बी’ हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ५९.०८ रुपयांवरून प्रतिलिटर ६०.७३ रुपये वाढ करण्यात आली आहे. उसाचा रस, साखर किंवा काकवी यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ६३.४५ रुपयांवरून प्रतिलिटर ६५.६१ रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.