नवी दिल्ली /पुणे : केंद्र सरकार आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्या सेवा देण्याकडे लक्ष पुरवत आहे. त्यासाठी सरकारने एक पोर्टलदेखील सुरू केलं असून या पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळू शकेल. या पोर्टलच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील (एमएसएमई) कंपन्या कामगारांशी संपर्क साधतील. तसेच ज्यांना नोकरी हवी आहे, तेदेखील या अॅपच्या माध्यमातून कंपन्यांशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे बेरोजगारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
गेल्याच महिन्यात हे पोर्टल पायलट प्रोजेक्ट (पथदर्शी प्रकल्प) म्हणून सुरू करण्यात आलं आहे. सध्या सक्षम पोर्टल हे काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित ठेवण्यात आलं असून लवकरच त्याचा विस्तार केला जाणार आहे. या पोर्टलचा फायदा नक्की कुणाला मिळणार आणि त्याचा कसा फायदा घेता येईल, याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.
काय सक्षम आहे?
टाइफैक (Technology Information Forecasting and Assessment Council) ने एमएसएमईच्या गरजा आणि कामगारांमधील कौशल्याला वाव मिळेल यासाठी सक्षम रोजगार पोर्टलची ११ फेब्रुवारीपासून सुरवात केली. ज्याद्वारे एमएसएमई कंपन्या कामगारांशी थेट संपर्क साधतील. यामुळे बेरोजगार तसेच सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना सहज रोजगार मिळू शकेल. नोकरी मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये मध्यस्थाची भूमिका घेणाऱ्या कंत्राटदार वर्गावर कामगारांना यापुढे अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार मिळू शकेल, या उद्दिष्टाने हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे.
विविध शहरातील कामगारांसाठी रोजगाराच्या हजारो संधी यामुळे उपलब्ध होतील. आणि एका क्लिकवर हजारो रोजगारांची माहिती मिळू शकेल. यासाठी अल्गोरिदम आणि आर्टिफिशियल इंटेलिजंसचा वापर केला गेला आहे. तसेच तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, तर त्याबाबतही तुम्हाला माहिती मिळू शकेल. सध्या दोन जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आल्यानंतर लवकरच त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. पोर्टलला भेट देण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
काम कसे चालते?
या पोर्टलवरील कामगार आणि उद्योगांसंबंधित माहिती विविध व्हॉट्सअॅप ग्रुप तसेच इतर लिंकद्वारे अपडेट केली जाते. सोशल मीडियासह अन्य माध्यमांद्वारे देशभरातील कामगार आणि एमएसएमई या दोन्हींना जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राज्य सरकार आणि एमएसएमई गटांशी चर्चाही केली जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना नोकरी, रोजगार हवा आहे, ते सर्वजण आपली माहिती विनामूल्य देऊ शकतात.
विशेष गोष्ट म्हणजे, कामगारांसह एमएसएमई संस्था, गटांनाही संधी मिळत असल्याने कमी वेळात, कमी खर्चात आणि अडचणींशिवाय सहज कामगार उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या पोर्टलमुळे सुमारे दहा लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण झाली आहे. कामगार आणि एमएसएमई संस्था थेट एकमेकांशी संपर्क साधतील. यामुळे कामाच्या शोधात होत असलेले स्थलांतरही रोखण्यात यश मिळत आहे.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.