Chandrababu Naidu : चंद्राबाबू होणार चौथ्यांदा आंध्रचे मुख्यमंत्री; विजयवाडा येथे आज शपथविधी सोहळा

आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष नारा ऊर्फ एन. चंद्राबाबू नायडू हे बुधवारी (ता.१२) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शपथ घेणार आहेत.
Chandrababu Naidu
Chandrababu NaiduSakal
Updated on

- एम.ए.एस.कुमार

हैदराबाद/अमरावती - आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष नारा ऊर्फ एन. चंद्राबाबू नायडू हे बुधवारी (ता.१२) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शपथ घेणार आहेत. शपथविधीसाठी विजयवाडातील गन्नावरमजवळील केसरपल्लीमध्ये तयारी झाली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

प्रदेश विधानसभेतील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (एनडीए) नेतेपदी एन. चंद्राबाबू नायडू यांची मंगळवारी निवड करण्यात आली. विजयवाडा येथे झालेल्या ‘एनडीए’च्या बैठकीत तेलुगू देशम, जनसेना आणि भाजपच्या आमदारांनी नायडू यांची एकमताने निवड केली.

जनसेनाचे प्रमुख पवनकल्याण यांनी नायडू यांच्‍या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष डी.पुरंदेश्‍वरी यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची ही त्यांची चौथी वेळ आहे.

आंध्र प्रदेश सरकारचे मुख्य सचिव नीरवकुमार प्रसाद आणि ‘एपीटीडीपी’चे अध्यक्ष अचेन नायडू हे या व्यवस्थेवर देखरेख करीत आहेत.८० फूट रुंद, ६० फूट लांब आणि आठ फूट उंचीचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. एक भला मोठा तंबू उभारण्यात आला असून सोहळ्याला उपस्थित राहणारे पाहुणे आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष वाहनतळ सुविधा निर्माण केली आहे. चंद्राबाबू नायडू, जनसेनाचे प्रमुख पवन कल्याण आणि नंदमुरी बालकृष्ण यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे आमदार आणि खासदारांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे.

१२ हेलिपॅडची व्यवस्था

गन्नावरम विमानतळावर १२ हेलिपॅड बांधण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पंतप्रधानांच्या विमानासह अन्य विमानांच्या उड्डाणाची सोय केली आहे. पावसाळ्यामुळे सर्व खबरदारी घेण्याचे आदेश नीरवकुमार यांनी दिले. शपथविधी स्थळाच्या मार्गावर अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या ताफ्याच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपचे सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

अमरावतीच राजधानी

‘एनडीए’च्या बैठकीत बोलताना नायडू यांनी अमरावती हीच आंध्रची एकमेव राजधानी असेल, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांवरून कोणताही खेळ होणार नाही. आमची राजधानी अमरावतीच असेल.’’ आघाडीतील पक्षांना उद्देशून ते म्हणाले की, ‘तुमच्या सहकार्यामुळे मी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही शपथविधी सोहळ्यासाठी येत आहेत.

‘टीडीपी’ नेत्याच्या हत्येने कर्नुलमध्ये तणाव

हैदराबाद - आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. कर्नुल जिल्ह्यातील वेल्डुर्थीमध्ये रविवारी (ता.९) तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) नेते गौरीनाथ चौधरी (वय ३५) आणि त्यांचे भाऊ कल्याण यांना बोम्मीरेड्डीपल्ली गावात त्यांच्या प्रतिस्पर्धकांनी काठ्या, चाकू आणि दगडांनी जबर मारहाण केली. यात चौधरी यांचा मृत्यू झाला असून कल्याण यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यामुळे वायएसआर काँग्रेस आणि ‘टीडीपी’च्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक कारवाया झाल्या. चौधरी यांच्या हत्येचा निषेध करीत ‘वायएसआर काँग्रेस’च्या कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप ‘टीडीपी’चे सरचिटणीस नारा लोकेश यांनी केला. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.