चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्यानंतर संपूर्ण जगभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक पिढ्यांच्या प्रयत्नांना यश असल्याचे ‘इस्त्रो’प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे. चांद्रयान-२ मधील अनेक शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ मध्ये काम केले. या लोकांना मागील चार वर्षांत शांत झोप लागली असेल, असे मला वाटत नाही. असे सोमनाथ म्हणाले.
- डॉ. एस सोमनाथ, ‘इस्रो’प्रमुख
प्रश्न : चांद्रयान-३ चे यश काय सांगते?
डॉ. एस. सोमनाथ : इस्रोच्या अनेक पिढ्यांच्या प्रयत्नाचे यश आहे. चांद्रयान-२ ने आम्हाला अनेक गोष्टी शिकविल्या म्हणूनच आम्ही ठरवले होते त्यापेक्षा अधिक अचूक पद्धतीने विक्रम लॅंडर चांद्रभूमीवर उतरला आहे.
चांद्रयान-३ चे यश हे भविष्यकालीन परग्रह मोहिमांचा शंखनाद आहे. पुढील महिन्यातच आदित्य एल-१ मोहिमेची सुरवात होत आहे. त्यामुळे माझा आनंद मी तुम्हाला शब्दांत व्यक्त करू शकत नाही. कारण प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची मने आज प्रज्वलित झाली आहे.
पुढील १४ दिवसांत नक्की काय होणार?
विक्रम लॅंडरची स्थिती तपासून लवकरच प्रज्ञान बग्गी त्यातून बाहेर येईल. त्यासाठी एक दिवसाचा कालावधी सुद्धा लागू शकतो. विक्रम लॅंडरवरील उपकरणे सुरवातीला कार्यान्वित होतील. ज्यातील ‘रंभा एलपी’ नावाचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील आयन्स आणि इलेक्ट्रॉन्सचे मापण करेल.
थर्मो फिजिकल उपकरण दक्षिण ध्रुवावरील तापमानातील बदल अभ्यासेल. तसेच चंद्रावरील भूकंपाचे मापन करणारे उपकरणही याच काळात कार्यान्वित होईल. प्रज्ञान बग्गीमधील एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या मातीची रासायनिक अवस्था स्पष्ट करेल तर लेझर स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या मातीतील खनिजांची माहिती देईल.
चांद्रयान - ३ मोहिमेतील कुठला टप्पा आव्हानात्मक होता ?
खरं तर चांद्रयानाचे पृथ्वीवरील उड्डाणच आव्हानात्मक गोष्ट होती. कारण प्रक्षेपकाने चांद्रयानाला योग्य कक्षेत सोडले नसते तर मोहीम तेथेच फसली असती. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पृथ्वीपासून झेपावलेले चांद्रयान चंद्राच्या कक्षेत स्थिर होणे.
जर आमची गणिते चुकली असती तर चांद्रयान अवकाशात भरकटले असते. त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रपोल्शन मॉड्यूल मधून विक्रम लॅंडर विलग करणे. कारण अनेक दिवसांच्या अवकाशातील प्रवासामुळे यांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे आजचे विक्रमचे लॅंडींग, ज्यात सर्वच देशवासीयांनी आमची साथ दिली.
या मोहिमेने इस्रोला काय दिले ?
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने असतानाही हे यश संपादित करणे नक्कीच आव्हानात्मक आहे. म्हणूनच चंद्रावर सुखरूप उतरण्यासाठी अनेकदा अपयश पचवावे लागले. भारताने मात्र एकाच अपयशानंतर हे यश संपादित केले आहे. भविष्यात मंगळ आणि शुक्र ग्रहांसह अवकाशातील लघुग्रहांवरही भारत यशस्वीपणे उतरू शकतो. आपण जे केले आहे ते जग करू शकले नाही.
चांद्रयान-२ च्या अपयशानंतर मागील चार वर्षे कशी होती?
अस्वस्थ करणारी. ते कठिण दिवस होते. चांद्रयान-२ मधील अनेक शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ मध्ये काम केले आहे. या यशाचे ते पडद्यामागील शिल्पकार आहे. अक्षरशः या लोकांना मागील चार वर्षात शांत झोप लागली असेल, असे मला वाटत नाही. प्रत्येक वेळी चांद्रयानाच्या अद्ययावत आणि अचूक बांधणीसाठी ते कार्यरत होते.
इस्रोच्या पुढील मोहिमा कोणत्या?
सूर्याचा अभ्यास करणारी आदित्य एल-१ मोहीम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये सात उपकरणांद्वारे सूर्याचा सखोल अभ्यास करण्यात येईल. गगनयानासंबीधीची एक महत्त्वाची मोहीम सप्टेंबर महिन्यात आहे. हवामानाचा अभ्यास करण्यासाठीच्या दोन मोहिमा डिसेंबर अखेरपर्यंत प्रक्षेपित होतील.
चांद्रयान ३मधील उपकरणे
लँडरचे आयुष्यमान एक चांद्र दिवस (पृथ्वीचे १४ दिवस)
वजन : १७४९.८६ किलो (बग्गीसह)
बग्गीचे आयुष्यमान एक चांद्र दिवस (पृथ्वीचे १४ दिवस)
वजन : २६ किलो
विक्रम लँडरवरील उपकरणे
n चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपिअरीमेंट (चास्ते) : चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील औष्णिक गुणधर्म तपासणे
n इन्स्ट्रूमेंट फॉर ल्युनार सेस्मिक अॅक्टिव्हिटी (इल्सा) - चंद्रावरील आसपासच्या भागावर होणाऱ्या भूकंपांचा अभ्यास करण्यासाठी
n लँगम्युईर प्रोब (रंभा एलपी) - प्लास्माचा अभ्यास करण्यासाठी
n पॅसिव्ह लेझर रिट्रोरिफ्लेक्टर अॅरे (पीएलआरए) - पृथ्वी ते चंद्र यांच्यामधील अंतर, चंद्राची त्रिज्या यांचे मापन करण्यासाठी
प्रज्ञान बग्गीवरील उपकरणे
n अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्टोमीटर (एपीएक्सएस) चंद्राच्या पृष्ठभागाची रचना अभ्यासण्यासाठी
n लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (एलआयपीएस) चंद्राच्या पृष्ठभागातील मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटेनियम, लोह यांचा अभ्यास करणे
प्रॉपल्जन मोड्यूलवरील उपकरणे
n स्पेक्ट्रो-पोलॅरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप) चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वातावरणाची रचना, जमिनीच्या आच्छादनातील बदल, महासागराची गतिशीलता आणि इतर पर्यावरणीय घटकांच्या अभ्यासासाठी. यासाठी निअर इन्फ्रारेड तरंगांचा वापर करणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.