बंगळूर : ‘चांद्रयान-३’चे विक्रम लँडर चंद्रावर उतरून ४८ तास उलटून गेले. लँडरमधून प्रज्ञान बग्गीही बाहेर आली असून सर्व उपकरणे कार्यरत झाली आहेत. ‘विक्रम’मधून बग्गी कशी बाहेर आली याचा व्हिडिओ भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी ‘एक्स’ वर पोस्ट केला आहे.
‘चांद्रयान-३’च्या लँडरवरून रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले ते येथे आहे...,’ असे ‘इस्रो’ने पोस्टमध्ये म्हटले आहे. लँडर इमेजर कॅमेऱ्याने हे छायाचित्रण बुधवारी (ता.२३) केले आहे. लँडरच्या उतरत्या मार्गावरून बग्गी कशी घसरत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरली आणि बग्गीतून सौर पॅनेल उघडले हे या व्हिडिओत दिसत आहे. सौर ऊर्जेच्या साहाय्याने बग्गी काम सुरू केल्याचे ते निदर्शक आहे.
यानंतर ‘इस्रो’ने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतानाचे चित्रण लँडर इमेजर कॅमेऱ्याने केले आहे. लँडरने ३० किलोमीटरहून खाली येत चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले, हे व्हिडिओतून पाहायला मिळते. तसेच चंद्रावर सुरक्षितपणे उतरण्यासाठी लँडर योग्य जागेची निवड करतानाही दिसत आहे.
पोस्ट हटविली
‘इस्रो’ने आज सकाळी ‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरच्या टप्प्यात ‘चांद्रयान-३’ आले असून ऑर्बिटरने विक्रम लँडरचे वरून छायाचित्र काढले असल्याची पोस्ट केली होती. पण नंतर ही पोस्ट व छायाचित्रेही ‘इस्रो’ने ‘एक्स’वरून हटविली.
बग्गीने कापले आठ मीटर अंतर
लँडरमधून प्रज्ञान बग्गी व्यवस्थित बाहेर पडल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर ‘इस्रो’ने आज सायंकाळी पोस्ट करीत बग्गीच्या नियोजित सर्व हालचालींची पडताळणी केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी आतापर्यंत आठ मीटर अंतर फिरली आहे. त्यावरील ‘एलआयबीएस’ आणि ‘एपीएक्सएस’ या पेलोडचे कार्य सुरू झाले आहे. प्रोपल्शन मोड्युवरील सर्व पेलोड, लँडर मोड्युल आणि ‘प्रज्ञान’चे कार्य सुरळीत सुरू आहे, अशी माहिती ‘इस्रो’ने ‘एक्स’वर दिली आहे.
अवकाश कचऱ्यापासून ‘आयएसएस’चा बचाव
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या (आयएसएस) दिशेने येणारा अवकाशीय कचऱ्यापासून बाजूला जाण्यासाठी ‘आयएसएस’ने इंजिन काही सेकंदांसाठी सुरू करण्यात आल्याची माहिती अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने गुरुवारी दिली.
अवकाश स्थानकाच्या मार्गातील कचऱ्यापासून बचाव करण्यासाठी ‘आयएसएस’मधील रशियन बनावटीचे झिवेदा मॉड्युलचे इंजिन २१ .५ सेकंद सुरू करण्यात आले होते. अवकाश संशोधनासाठी पाठविले उपग्रह, प्रक्षेपण निकामी झाल्यानंतर अंतराळात फिरत असतात. हे तुकडे ‘आयएसएस’ला धडकण्याचा धोका असतो.
म्हणून त्यापासून बचाव करण्यासाठी काल इंजिन सुरू करून ‘आयएसएस’ सुमारे एक हजार ६४० फूट खाली आणण्यात आले. ‘आयएसएस’ नेहमी ४०० किलोमीटरच्या कक्षेत फिरत असते. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री आठच्या सुमारास ‘आयएसएस’ची कक्षा बदलण्यात आली. यामुळे तेथे २४ तास सुरू असलेल्या कामात मात्र कोणताही व्यत्यय आलेला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.