Chandrayaan-3 : ‘चांद्रयान ३’ दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले

‘चांद्रयान ३’ चा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत रोमांचकारी होता. सर्व भारतीय आज जिवाचे कान करून ऐकत होते. डोळे दूरचित्रवाणी संचापासून हटत नव्हते.
Chandrayaan-3
Chandrayaan-3sakal

बंगळूर - भारताची ‘चांद्रयान ३’ मोहीम बुधवारी यशस्वी झाली. चांद्रभेटीची आस घेऊन निघालेल्या ‘चांद्रयान ३’ मधील विक्रम लँडर त्यातील प्रज्ञान बग्गीसह ठरल्यानुसार आज सायंकाळी ६.०३ मिनिटांनी अलगदपणे दक्षिण ध्रुवावर उतरला आणि ‘चांद्रविजय’ मिळविला. या भागात उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

आता विश्वाच्या, त्यातही विशेषकरून पृथ्वीच्या निर्मितीची रहस्ये उलगडण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात होईल. आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका आणि चीन हे तीनच देश चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले आहेत, त्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळाला आहे.

‘चांद्रयान ३’ चा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत रोमांचकारी होता. सर्व भारतीय आज जिवाचे कान करून ऐकत होते. डोळे दूरचित्रवाणी संचापासून हटत नव्हते. ‘चांद्रयान ३’ उतरण्यासाठी केवळ १८ मिनिटांचा कालावधी राहिला होता. हृदयाचे ठोके वाढलेले होते.

गेल्यावेळच्या अपयशाची कटू आठवण नाही म्हटले तरी मनात डोकावत होती, कारण चांद्रभूमीवर उतरण्यासाठी दोन-अडीच किलोमीटरचे अंतर असताना ‘चंद्रयान २’चे नियंत्रण सुटले होते आणि ते आदळले. यानाबरोबरच तुकडे झाले होते ते शास्त्रज्ञांच्या नव्हे भारताच्या आशा- आकांक्षांचे... ‘इस्रो’च्या अध्यक्षांच्या भावनांचा बांध तिथेच फुटला होता. मात्र यावेळी असे व्हायचे नव्हते.

सर्व शास्त्रज्ञांनी अपार परिश्रम घेऊन त्रुटी दूर केल्या होत्या. अखेर ती वेळ आली. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी ‘चांद्रयान ३’ अलगदपणे उतरले. संपूर्ण भारताने जल्लोष केला... मिठाई वाटली, फटाके फोडले...

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी यशाची औपचारिक घोषणा केली आणि मोहिमेतील पुढील टप्प्यांची माहिती दिली. ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयानाची चंद्रावर उतरण्याची संपूर्ण प्रक्रिया दूरदृश्‍यप्रणालीद्वारे अनुभवली. त्यानंतर त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आणि ‘हे केवळ आपले यश नसून सर्व मानवजातीचे यश आहे,’ असे गौरवोद्गार काढले.

मानाचा तुरा

रशियाचे ‘लूना २५’ यान दोन दिवस आधीच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरत असताना नियंत्रण सुटल्यामुळे कोसळले होते. त्यामुळे चांद्रयानाच्या शेवटच्या तीस किलोमीटरचे अंतर पार करण्याची अवघड कामगिरी पार पाडली जात असताना सर्वांची धाकधूक वाढली होती. शेवटचे चार स्वयंचलित टप्पे यशस्वी पार पडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

या यशामुळे भारत आता चंद्रावर यान उतरविणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन या देशाच्या पंक्तीत जाऊन बसला. हे यशही काही लहान नाही. पहिल्यात प्रयत्नात चंद्र आणि मंगळाला गवसणी घालणाऱ्या भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारताचे अवकाश संशोधन हे इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नसून, स्वसंरक्षण आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, असा संदेश या मोहिमेच्या निमित्ताने जगाला दिला गेला.

प्राथमिक निरीक्षणानंतर बग्गी उतरणार

विक्रम लॅंडरच्या यशस्वी अवतरणानंतर चंद्रभूमीवर धुळीचे वादळ निर्माण झाले आहे. ते खाली बसल्यानंतर सर्व उपकरणांची स्थिती तपासण्यात येईल. विक्रम लॅंडर सुस्थितीत असल्यास पुढील काही तासांत किंवा एक दिवसाच्या आत प्रज्ञान बग्गी विक्रम लॅंडरमधून बाहेर येईल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथन यांनी दिली.

सुरुवातीला विक्रम लॅंडरवरील सर्व उपकरणे कार्यान्वित करण्यात येतील आणि सुरुवातीची निरीक्षणे प्राप्त केली जातील, असेही डॉ. सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

चंद्रयान-३ मिशन : ‘भारतीयांनो, मी माझ्या ईप्सितस्थळी(चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा!’ चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅंडीग! भारतीयांचे अभिनंदन!

- भारतीय अवकाश संशोधन संस्था(इस्रो)

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ यशस्वीरीत्या उतरविल्याबद्दल ‘इस्रो’चे अभिनंदन! या मोहिमेत आम्ही तुमचे सहकारी होतो याचा आम्हाला आनंद आनंद आहे!

- बिल नेल्सन, अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेचे(नासा) व्यवस्थापक

मोहिमेची उद्दिष्टे

1) चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सुरक्षितपणे उतरवणे. - प्रगत अवकाशयान तंत्रज्ञान, चंद्रावर यान उतरविण्याचे तंत्रज्ञान, स्वदेशी उपकरणे यांच्या चाचण्या घेणे. इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे.

2) चंद्राच्या दक्षिण भागात अब्जावधी वर्षांपूर्वीचे खडक आहेत. त्यांच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे. त्याद्वारे सौरमालेच्या उगमासंबंधी धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न करणे

3) बर्फाच्या स्वरुपातील पाण्याच्या साठ्याचा शोध घेणे

अखेरची १८ मिनिटे

रफ ब्रेकिंग (६९० सेकंद)

सायंकाळी पाच वाजून ४४ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरु झाली. या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागापासून तीस किलोमीटर उंचीवर असलेले लँडर सुरुवातीला समांतर रेषेत पुढे जाण्यास सुरुवात झाली. लँडर हळूहळू लंबरेषेत येऊन ते ७.४ किलोमीटरपर्यंत आले.

अल्टिट्यूड होल्ड (१० सेकंद)

या टप्प्यात यानातील सेन्सर अपडेट झाली. त्यांनी चांद्रभूमीची छायाचित्रे काढून ती पृथ्वीकडे पाठविण्याचे काम सुरु झाले. या टप्प्यात ७.४ किलोमीटरवरून लँडर ६.८ किलोमीटरपर्यंत आला.

फाइन ब्रेकिंग (१७५ सेकंद)

लँडर ८१२ मीटरपर्यंत खाली आला. तिथे तो काही काळ थांबला.लँडरवरील सेन्सरच्या साह्याने चंद्राच्या पृष्ठभागाची पाहणी केली गेली.

टर्मिनल डिसेंट-१ (१३१ सेकंद)

या टप्प्यात लँडर १४९ मीटरपर्यंत खाली आला. पुन्हा तो काही सेकंद थांबला. त्याने पुन्हा पाहणी केली. यावेळी लँडरवरील चार पैकी दोनच इंजिन सुरु होती.

टर्मिनल डिसेंट -२ (७६ सेकंद)

लँडर हळूहळू खाली उतरत सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी लँडरने चंद्राला स्पर्श केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com