नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखक आणि स्तंभलेखक चेतन भगत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींमध्ये अमुलाग्र बदल झाल्याचं त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. तसंच सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी ज्या पद्धतीनं भाषण करत आहेत त्याचही चेतन भगत यांनी कौतुक केलं आहे. आपल्या लेखातील विश्लेषणाबाबत भगत यांनी इंडिया टुडेशी बोलताना आपली भूमिका मांडली.
चेतन भगत म्हणाले, "राहुल गांधी यांनी आपली पप्पू ही इमेज बाजुला सारत खटाखट नेता म्हणून पुढे आले आहेत. पण भाजपला हे मान्य नाही, उलट राहुल गांधी हे देशाला विभाजित करत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला एकत्र आणत आहेत, असंच भाजपला वाटतंय. पण मी विश्लेषक या नात्यानं देशात काय घडतंय त्यावर बोलत असतो. भाजपचे जे चमचे आहेत त्यांचा आवाज सध्या वाढतोय. त्यांचा खरंतर आयक्यूच कमी आहे. हे लोकच सध्या भाजप या ब्रँडला धक्का पोहोचवत आहेत.
मी सन २०११ मध्ये एका लेखात म्हटलं होतं की, मोदींचा उदय हा सध्याच्या राजकारणात फीट बसणारा आहे. त्यावेळी मला काँग्रेसनं आणि त्यांच्या समर्थकांनी वाईटरित्या ट्रोल केलं होतं. त्यावेळी इंग्रजी माध्यमांनी देखील मोदींचा साधा उल्लेखही केला नव्हता. कारण त्यावेळी ते दखलपात्र नव्हते पण आज ते तिसरी टर्म पूर्ण करत आहेत.
पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर हे स्पष्ट झालं आहे की, राहुल गांधीचा उदय हा दखल घेण्याजोगा आहे. याची प्रमुख तीन कारणं आहेत, एक म्हणजे राहुल गांधी यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदललं आहे. ते कसं बदललं हे मला माहिती नाही. पण या निवडणुकीत त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा नव्हत्या, कारण ते स्पष्टपणे विचार मांडत नव्हते. त्यांनी एखादं विधान करत त्यानंतर ते एकदमच उच्चस्तरीय विचार करायला लागायचे. पण दुसऱ्याच क्षणी ते सर्वकाही गमावून बसायचे. पण आता यामध्ये खूपच बदल झाला आहे. त्यांचा सध्याचा फिटनेस, त्यांची जिम, त्यांचे चांगले सल्लागार याबदद्लही मला माहिती नाही. पण आता ते खूपच खरे वाटतात कारण आता ते स्वतःलाही घाबरत नाहीत. ते कोणालाही इम्प्रेस करायचा प्रयत्न करत नाहीएत तर स्वतः एक्स्प्रेस होत आहेत.
त्यांनी अत्यंत अवघड विषयांवर गेल्या काही दिवसांत भाष्य केलं आहे, जो म्हणजे धर्म. भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, हे त्यांचं विधान म्हणजे भाजपची झोप उडवणार आहे. त्यावरुन भाजपला त्यांनी टीका करायला भाग पाडलं. ज्या प्रकारे राहुल गांधी संसदेत शंकराचा फोटो घेऊन आले ते तर काँग्रेसलाही अपेक्षित नव्हतं. पण त्यांनी ते केलं आणि त्याची चर्चा झाली. कारण त्यानंतर त्याचे रिल्स, युट्यूब शॉर्ट्स झालेले पाहायला मिळाले. आता हे बरं की वाईट हे सोडून द्या कारण हा गेम आहे.
पण लोकांनी त्यांना पसंत केलं असून २०२४ च्या निवडणुकीत लोकांनी त्यांना स्थिर स्वरुपाची साथ दिली. राहुल गांधी सध्या योग्यवेळी योग्य ठिकाणी आहेत. सध्या भाजपवाले राहुल गांधींचा तिरस्कार करत आहेत. कारण एखाद्या हिरोप्रमाणं सर्वकाही गमावलेलं असताना सर्वकाही झिडकारुन त्यांनी पुन्हा एकदा भरारी घेतली आहे.
राहुल गांधी कोणीच नाहीत म्हणजेच पप्पू म्हणून त्यांची प्रतिमा तयार केली गेली होती. त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवलं, त्यांना बेघर केलं गेलं. काँग्रेसची बँक अकाऊंट फ्रीज करण्यात आली, या सगळ्या गोष्टी घडल्या. यातूनही एखाद्या हिरोप्रमाणं तरुन ते बाहेर आलेत, त्यामुळं ते आता लोकसभेत सरकार तुटून पडत आहेत, त्यांची ही भूमिका सध्या काम करत आहे, अशा शब्दांत चेतन भगत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.