Chhattisgarh:
कांकेर: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाबरोबर (बीएसएफ) झालेल्या चकमकीत 29 नक्षलवादी ठार झाले. त्यात नक्षलवाद्यांचा म्होरक्या शंकर रावही मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मदतानापूर्वी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 रोजी होत आहे. कांकेरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षादले तैनात करण्यात आली आहेत. नक्षलग्रस्त बस्तरमध्ये पहिल्या टप्प्यात शुक्रवारी मतदान होणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची पथके मतदान केंद्रावर आजच रवाना झाली आहेत.
‘बीएसएफ’ आणि राज्य जिल्हा राखीव पोलिस दलाच्या जवानांनी बिनागुंडा आणि कोरोनार गावांच्या दरम्यान असलेल्या हापातोला जंगलाच्या परिसरात नक्षलवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली होती. त्यावेळी आज दुपारी दोनच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांची नक्षलवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली. त्यात 29 नक्षलवादी मारले गेले. या सर्वांचे मृतदेह घटनास्थळी पोलिसांना आढळले आहेत.
या कारवाईत सात एके रायफली आणि तीन लाइट मशिन गन जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या शिवाय ‘इन्सास’, ‘एसएलआर’, कार्बाइन व पॉइंट 303 रायफलीही जप्त करण्यात आल्या आहेत.
या चकमकीत नक्षलवाद्यांचा म्होरके शंकर राव आणि ललिता मडवी ठार झाल्याचे समजते. या दोघांवरही प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बीएसएफने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार या चकमकीत बीएसएफचा एक जवान जखमी झाला. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य जिल्हा राखीव पोलिस दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांतील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदराज यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कारवाईमध्ये ठार झालेले सर्व नक्षलवादी उत्तर बस्तर विभागातील आहेत. नक्षलवाद्यांचे म्होरके शंकर राव, ललिता आणि राजू हे या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती.’’
कांकेरमध्ये चकमक कधी झाली?
यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी हुरातराई जंगलात नक्षलवाद्यांच्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले होते. 3 मार्च रोजी छोटा बेठियाच्या हिदूरमध्ये पोलीस-नक्षलवादी चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. तर बस्तरचा एक सैनिक शहीद झाला. 16 मार्चलाही चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही नक्षलवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये बीएसएफचे 2 जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांची छायाचित्र असलेली पोस्टर्स चिकटवली. प्रत्येक गावात नक्षलवाद्यांची पोस्टर्स दिसत आहेत.
येथे कबीरधाम जिल्ह्यात नक्षलवाद्यांची माहिती देणाऱ्या आणि त्यांना अटक करणाऱ्याला 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारासोबतच एसपी अभिषेक पल्लव यांनी पोलीस खात्यात सरकारी नोकरीची घोषणाही केली आहे. माहिती देण्यासाठी 78988 15399 हा हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे. त्यासाठी सैनिक प्रत्येक गावात भिंतींवर नक्षलवाद्यांचे चित्र असलेले पोस्टर लावत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.