काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाची परंपरा राखत भाजपने छत्तीसगड या आणखी एका राज्यात आपल्या विजयाची पताका पुन्हा फडकावली आहे. एकूण अकरापैकी दहा जागांवर भाजपने आघाडी मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कॉँग्रेसला केवळ एका जागेवर आघाडी असल्याने कॉँग्रेसचे एक प्रकारे उच्चाटन भाजपने या राज्यातून एक प्रकारे केले आहे.
गेल्यावेळच्या २०१९च्या निवडणुकीत भाजपने नऊ तर कॉँग्रेसने दोन जागा मिळविल्या होत्या. त्या तुलनेत यंदाचे भाजपचे यश मोठे आहे. गेल्यावेळी राखलेल्या कोरबा मतदारसंघाची खिंड यंदाही कॉँग्रेस शाबूत ठेवण्याच्या स्थितीत आहे. तिथे विद्यमान खासदार जोत्स्ना महंत यांनाच कॉँग्रेसने पुन्हा रिंगणात उतरवले आहे. तर भाजपच्या राज्यसभा सदस्य सरोज पांडे यांच्याशी त्यांची लढत आहे.
इथे महंत पुन्हा आघाडीवर आहेत. बसपने इथे कांही जागा लढवल्या पण त्यांच्या पदरात एकही जागा पडलेली नाही. सायंकाळपर्यंत दोन मतदारसंघाचे निकाल हाती आले होते. दुर्ग मतदारसंघातून भाजपचे नेते विजय बघेल व रायपूरमधून बृजमोहन अग्रवाल, सरगुजा मतदारसंघातून चिंतामणी महाराज हे विजयी झाले. तर उर्वरित सात जागी भाजप आघाडीवर आहे.
मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांच्या नेतृत्वाखालील भाजपने इथे चांगले यश मिळविले आहे. सरगुजातून चिंतामणी महाराज, रायगडमधून राधेशाम राठिया, जांजगीरमधून कमलेश जांगडे, विलासपूरमधून तोखन साहू, राजनंदगावमधून संतोष पांडे, महासमुंदमधून श्रीमती रूपकुमार चौधरी, बस्तरमधून महेश कश्यप तर कांकेरमधून भोजराज नाग हे आघाडीवर होते. या विजयानंतरची मुख्यमंत्री साय यांची प्रतिक्रिया बोलकी होती.
ते म्हणाले की हा मोदी यांच्या गॅरंटीचा विजय आहे. आमची घोषणा चारसो पारची होती. मात्र आम्ही तिच्या जवळ गेलो आहोत. अकरापैकी आम्ही दहा जागा जिंकत आहोत. तसेच कोरबाही जिंकणार आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष किरणदेव यांनीही भाजपच्या यशाबद्दल छत्तीसगडमधील मतदारांचे आभार मानले आहेत.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसची सत्ता भाजप हिसकावून घेतल्यानंतर भाजपने मध्यप्रदेशातून तयार झालेल्या या राज्यात आपले चांगले वर्चस्व निर्माण केले आहे.
मध्यप्रदेशात व छत्तीसगडमधील भाजपच्या संपूर्ण यशाने हिंदी पट्ट्यातील भाजपचे वर्चस्व सिध्द झाले आहे. विशेष म्हणजे या राज्यांत भाजपच्या नेतृत्वात अनेकदा पक्षाने बदल केले. त्यातच पक्षाची धोरणे व केंद्र व राज्य सरकारांच्या योजना योग्य रितीने राबविण्यात आल्याने भाजपला हा विजय मिळविण्यात यश मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.