पाटणाः ‘‘तत्त्वांशी तडजोड करण्याऐवजी आपले दिवंगत वडील रामविलास पासवान यांचा आदर्श समोर ठेवत मंत्रिपदाला लाथ मारु,’’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी मंगळवारी केले. लोकजनशक्ती पक्ष (रामविलास) पक्षाचे प्रमुख असलेले चिराग पासवान पक्षाच्या एससी/एसटी विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असतील तोपर्यंत आपण ‘एनडीए’ मध्ये राहू, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणातील या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले,‘‘माझ्या वडिलांप्रमाणे मी मंत्रिपदाचा त्याग करण्यास मागेपुढे पाहणार नाही. माझे वडील (रामविलास पासवान) हे काँग्रेस नेतृत्वाखालील ‘युपीए’ सरकारमध्ये मंत्री होते. दलितांच्या हिताला बाधक अशा अनेक गोष्टी त्याकाळी घडल्या. सार्वजनिक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्रही ठेवले जात नव्हते. त्यामुळे, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.’’
२०१४ मध्ये भाजप नेतृत्वाखालील ‘एनडीए’त सहभागी होण्यासाठी चिराग पासवान यांनीच रामविलास पासवान यांचे मन वळविले होते. मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत केंद्रातील विद्यमान सरकारला दलितांची काळजी आहे, असेही चिराग पासवान यांनी सांगितले. आपल्या या मुद्द्याच्या समर्थनार्थ त्यांनी क्रिमी लेअरवरील केंद्राच्या भूमिकेसह थेट भरती प्रक्रियेचेही उदाहरण दिले.
दरम्यान, चिराग पासवान यांच्या मूळ भाषणात त्यांनी नंतर दिलेल्या स्पष्टीकरणापेक्षा अधिक काही होते, असे ‘एनडीए’ तसेच ‘इंडिया’ आघाडीतील सूत्रांचेही मत आहे. रामविलास पासवान यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात २००२ मध्ये गुजरात दंगलीच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करणे, ही काँग्रेसपेक्षा भाजपसाठी अधिक लाजिरवाणी बाब आहे, असे दोन्ही आघाडीतील सूत्रांचे म्हणणे आहे.
रामविलास पासवान यांनी त्यानंतर ‘युपीए’मध्ये सहभागी होत पाच वर्षे मंत्रिपदही उपभोगले होते. त्यानंतर २००९ मध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता.
भाजपला अप्रत्यक्ष संदेश
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बिहारमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले चिराग पासवान आपला पाया विस्तारण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या छायेतून बाहेर पडण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. नितीशकुमार यांच्या विरोधात आघाडी उघडल्यानंतर आता त्यांना अनिच्छेने त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे, लोकजनशक्ती पक्षात फूट पाडणारे आपले काका पशुपतीकुमार पारस यांच्याशी भाजपची जवळीक वाढत असल्याने आपण खूष नसल्याचा अप्रत्यक्ष संदेशही त्यांनी भाजप नेतृत्वाला दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.