'Abhaya' of Bengal : सीआयएसएफच्या पथकाकडून परिसराची पाहणी

पश्‍चिम बंगालमधील कोलकत्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) सुरक्षा पुरविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बुधवारी ‘सीआयएसएफ’च्या पथकाने महाविद्यालयाची आणि येथील परिसराची पाहणी केली.
'Abhaya' of Bengal
'Abhaya' of Bengal sakal
Updated on

बंगालची ‘अभया’

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील कोलकत्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) सुरक्षा पुरविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बुधवारी ‘सीआयएसएफ’च्या पथकाने महाविद्यालयाची आणि येथील परिसराची पाहणी केली. सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या पथकाने स्थानिक पोलिसांशी आणि महाविद्यालयाच्या प्रशासनाशी चर्चा करत महाविद्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

या महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या महिला डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये आढळला होता. दरम्यान, या घटनेची प्रतिक्रिया म्हणून शेकडो लोकांनी या रुग्णालयाची तोडफोड केली होती. मात्र, या तोडफोडीमध्ये सेमिनार हॉलसह शेजारच्या खोल्यांचे नुकसान झाले. त्यामुळे पुरावे मिटविण्यासाठीच हा प्रकार घडवून आणला जात असल्याचा आरोप अनेक जणांकडून करण्यात आला होता. त्याचप्रमाणे संबंधित रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत हलगर्जीपणा झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पश्‍चिम बंगाल सरकारला फटकारले आणि येथील सुरक्षेची जबाबदारी ‘सीआयएसएफ’कडे देण्याचे आदेश दिले.

निवासी डॉक्टरांचा मोर्चा

आर. जी. कर वैद्यकीय रुग्णालयातील घटनेच्या निषेधार्थ पश्‍चिम बंगालमधील विविध वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये येथील निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्यावतीने बुधवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरदेखील सहभागी झाले होते. रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा पुरविण्यात यावी आणि आर. जी. कर वैद्यकीय रुग्णालयातील घटनेतील आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी केली. येथील सीजीओ कॉम्प्लेक्स ते स्वास्थ्य भवन असा हा मोर्चा काढण्यात आला. आर. जी. कर रुग्णालयात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या प्राचार्या या रुग्णालयात उपस्थित नसतात अशी तक्रारही काही डॉक्टरांनी केली. त्याचप्रमाणे महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास वेगात पूर्ण करावा अशी मागणी सर्व डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली.

‘ममतांनी राजीनामा द्यावा’

आर. जी. कर वैद्यकीय रुग्णालयातील घटनेप्रकरणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पश्‍चिम बंगालमधील भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत बिघडली आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. भाजपच्या वतीने कर वैद्यकीय रुग्णालयाच्या जवळच शामबाजार येथे आंदोलन करण्यात येत आहे. ‘‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने राजीनामा द्यावा,’’ अशी मागणी भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजूमदार यांनी केली.

‘माजी प्राचार्यांची ‘ईडी’ चौकशी करा’

आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यांच्या आर्थिक व्यवहारांची सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने (ईडी) करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी उप-अधिष्ठाता अख्तर अली यांनी बुधवारी कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक आर्थिक गैरव्यवहार केले असून याप्रकरणी २०२३ मध्ये राज्यसरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती असे अली यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजर्षी भारद्वाज यांनी अली यांची याचिका दाखल करून घेण्याची परवानगी घेतली. दरम्यान, महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी पश्‍चिम बंगाल राज्य सरकारच्या वतीने सोमवारी (ता.१९) विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()