जोधपूर : हैदराबाद येथील देशाला काळीमा फासणाऱ्या सामूहिक बलात्कार घटनेतील मुख्य आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी (ता.6) एन्काउंटर केला. त्यानंतर या घटनेसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
अनेकांनी या घटनेचे स्वागत करत हैदराबाद पोलिसांना पाठिंबा दर्शविला, तर काहीजणांनी पोलिसांचे ही कृती कायद्याला धरून नव्हती, असे म्हटले आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. हैदराबाद एन्काउंटर घटनेवर त्यांनी टीका करताना म्हटले आहे की, ''न्याय हा जेव्हा सूड बनतो तेव्हा त्याला काहीही अर्थ राहत नाही, मागील काही दिवसांत देशभरात घडलेल्या घटनांमुळे जुन्याच वादावर नव्या उत्साहाने चर्चा होते आहे. गुन्हेगारी न्यायीक व्यवस्थेने तिच्या भूमिकेवर पुन्हा विचार करायला हवा यात शंकाच नाही. गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यांची सुनावणी वेळेत पूर्ण व्हायला हवी, या संदर्भातील न्यायालयीन शिथिलतेबाबतच्या दृष्टिकोनात देखील बदल व्हायला हवा.''
जोधपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्धाटन कार्यक्रमासाठी ते जोधपूरमध्ये आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचीही या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, ''न्याय हा कधीच जलदगतीने होत नसतो. तसेच त्याने सुडाचे रूप देखील घेता कामा नये, पण जेव्हा हाच न्याय सूड बनतो, तेव्हा त्याला अर्थ राहत नाही. न्यायव्यवस्थेने आत्मपरिक्षण करून स्वत: मध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणायला हवेत, हे जाहीर करावे की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो. एखादी याचिका दाखल होण्यापूर्वीच बाहेर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती याचिकाच न्यायालयासमोर येणार नाही. काही याचिका जलदगतीने निकाली काढण्यासाठी एका वेगळ्या सर्वसमावेशक प्रक्रियेची आवश्यकता आहे. मध्यस्थीने वाद कसा मिटवावा याचे मार्गदर्शन करण्याचे प्रशिक्षण देणारा एकही कोर्स अथवा डिप्लोमा नाही,'' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून नराधमांनी तिला जिवंत जाळले. या घटनेमुळे देशभरात संतप्त लाट उसळली होती. अपराध्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी मागणी जोर धरत होती.
मात्र, शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी या अपराध्यांचा एन्काउंटर केला. पोलिसांची ही कृती कायद्याच्या चौकटीत बसते की नाही, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतभेद असले तरी, देशभरातील नागरिक हैदराबाद पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या घटनेचे संसदेमध्येही पडसाद उमटले होते. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी आज केलेले हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.
सध्या न्यायव्यवस्था ही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा विचारही सामान्य याचिकाकर्त्यांच्या मनात येत नाही.
रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.