जयपूर (राजस्थान): मी दहशतवाद्यांना कंठस्नान घालेन आणि घरी परत येईन, असे ते कायम म्हणायचे. होय, ते परत आले पण तिरंग्यात लपेटून, अशा हृदयद्रावक भावना कर्नल आशुतोष शर्मा यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या हंदवाड्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत कर्नल, मेजरसह दोन जवान हुतात्मा झाले. यामध्ये कर्नल आशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. आशुतोष शर्मा यांच्या पत्नी पल्लवी यांनी भावनांना वाट करून देताना म्हणाल्या, आमचे कुटुंब आशुतोष यांना कायम त्यांच्या धैर्यासाठी लक्षात ठेवेल. त्यांचे गणवेशावर प्रेम होते. त्यांनी नेहमीच त्यांच्या युनिटला प्राधान्य दिले. त्यांच्या युनिटमधील सहकाऱ्यांची तंदुरुस्ती, त्यांना मिळणारे जेवण याबद्दल ते कायम सजग होते. एक अधिकारी म्हणून त्यांनी कायम त्यांच्या सहकाऱ्यांची काळजी घेतली. मी दहशतवाद्यांना कंठस्नान घालेन आणि घरी परत येईन, असे ते नेहमी म्हणायचे. होय, ते परत आले पण तिरंग्यात लपेटून. त्यांच्या जाण्यामुळे माझे खूप मोठे नुकसान झाले आहे. ते कधीही भरुन येणार नाही. स्वत:च्या सहकाऱ्यांच्या, देशाच्या नागरिकांच्या संरक्षणसाठी माझ्या पतीने केलेल्या कार्याचा मला सार्थ अभिमान आहे.'
'काही महिन्यांपूर्वीच मी त्यांच्यासाठी करवाचौथचा उपवास केला होता. त्यावेळी विविध वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे घरी आले होते. पुन्हा वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे आमच्या घरी आले आहेत. मात्र, तेंव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा फरक आहे. मी घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळेन, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यांच्या अनुपस्थितीत मी कुटुंबाची काळजी घेईन, याबद्दल ते कायम निश्चिंत असायचे. मला दीड हजार सहकाऱ्यांची काळजी घ्यायची आहे. तू कुटुंबाची नीट काळजी घेशील याची मला खात्री आहे, असे ते मला अनेकदा म्हणायचे. २७ फेब्रुवारीला काश्मीरच्या उधमपूरमध्ये सेना पदक वितरण सोहळ्यात आमची अखेरची भेट झाली. मात्र ही भेट केवळ दोन दिवसांची होती,' असेही पल्लवी यांनी सांगितले.
आशुतोष यांचे बंधू पियुष यांनी सांगितले की, गेल्या वर्षी होळीवेळी झालेली भेट अखेरची ठरली. गेल्या वर्षी होळीच्या एक दिवस आधी कोणालाही न कळवता घरी आला. त्याची भेट सगळ्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. होळी पेटवली जात असताना संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आशुतोष अचानक आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही खूप धमाल केली. आशुतोष यांची पत्नी पल्लवी आणि 12 वर्षांची मुलगी तमन्ना गेल्या अडीच वर्षांपासून जयपूरमध्ये वास्तव्यास आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.