राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी येत्या शनिवारी (ता. २५) मतदान होत असून त्यासाठीचा प्रचार काल संपला. प्रचाराच्या अंतिम टप्यात काँग्रेस, भाजपसह सर्व पक्षांनी आपली ताकद लावली होती. गेल्या निवडणुकीप्रमाणे याहीवेळी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच मुकाबला होत आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवगड येथे जाहीर सभा झाली. राज्यात पुन्हा गेहलोत सरकार सत्तेत येणार नाही असे मोदी यांनी या सभेत सांगितले. भाजपच्या 'स्टार' प्रचारकांनी अंतिम दिवशी राज्य पिंजून काढले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली. केंद्रातील विविध योजनांचा आढावा घेत ते म्हणाले की, २००४ ते २०१४ या कालावधीत तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राजस्थानसाठी दोन लाख कोटी रुपये दिले होते.
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी, उमेदवारीसाठी निवडसमितीवर दबाव आणि उमेदवारी न मिळाल्याने नाराजीनाट्य पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा फडकविल्याने या दोन्ही पक्षांच्या डोकेदुखीत वाढ झाली.
अशातच काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील सुप्त संघर्षाचा निकालावर काय परिणाम होतो याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचप्रमाणे भाजपमध्ये देखील माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या समर्थकांना जाणीवपूर्वक उमेदवारी नाकारल्याची तक्रार वसुंधराराजे समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजस्थानात सत्तास्थापनेच्या भाजपच्या स्वप्नाला ही नाराजी सुरुंग लावेल का? याकडेही राजकीय अभ्यासकांचे लक्ष आहे.
सरदारपुरा
अशोक गेहलोत, काँग्रेस - महेंद्रसिंह व्यास, भाजप
१९९८ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला
२००३ पासून सातत्याने अशोक गेहलोत यांचा या मतदार संघात विजय
निवडणुकांत काँग्रेस उमेदवाराचा विजय
मतदारसंघात जोधपूर शहराचा समावेश
मागील विधानसभा निवडणुकीत गेहलोत यांचा या मतदारसंघात तब्बल ४५ हजार ५९७ मतांनी विजय
झालारपाटन
रामलाल चौहान, काँग्रेस - वसुंधराराजे शिंदे, भाजप
२००३ पासून भाजपचा बालेकिल्ला
राजस्थानात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी २००३ पासून वसुंधराराजे यांचा सातत्याने मतदारसंघात विजय
टोंक
सचिन पायलट, काँग्रेस - अजितसिंह मेहता, भाजप
२०१८मध्ये हा मतदारसंघ भाजपकडून काँग्रेसच्या पायलट यांनी हिसकावून घेतला
मागील निवडणुकीत पायलट यांचा ५४ हजारापेक्षा जास्त मतांनी विजय
एखादा अपवाद वगळता या मतदारसंघात प्रत्येकवेळी भाजप आणि काँग्रेस यांचे उमेदवार आलटूनपालटून विजयी झाले आहेत.
बसपच्या उमेदवाराचा पायलट यांना पाठिंबा
विद्यानगर
सीताराम अग्रवाल, काँग्रेस - दीया कुमारी, भाजप
२००३ पासून भाजपचा बालेकिल्ला
दिया कुमारी या जयपूर राजघराण्यातील आहेत
वसुंधराराजे यांना पर्याय म्हणून दीयाकुमारी यांच्या नावाचा विचार केला जात असल्याचा विश्लेषकांचा दावा
नाथद्वारा
सी. पी. जोशी, काँग्रेस - विश्वराजसिंह मेवाड, भाजप
भाजपचे उमेदवार विश्वराजसिंह मेवाड हे महाराणा प्रताप यांचे वंशज
तब्बल ३० वर्षांनंतर महाराणा प्रताप यांचे वंशज निवडणुकीच्या रिंगणात
झोटावाडा मतदारसंघ
अभिषेक चौधरी, काँग्रेस - राज्यवर्धनसिंह राठोड, भाजप
भाजपचे खासदार राज्यवर्धनसिंह राठोड यांनी उमेदवारी दिल्याने भाजपचे स्थानिक नेते नाराज
मागील निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या लालचंद कटारिया यांनी विजय मिळवला होता.
२०० - राजस्थानातील एकूण मतदारसंघ
१८७५ - एकूण उमेदवार
१८३ - महिला उमेदवार
यांची बंडखोरी भोवण्याची शक्यता
चंद्रभानसिंह आक्या (भाजप) - चित्तोडगड
जीवनराम चौधरी (भाजप) - सांचौर
फतेह खान (काँग्रेस) - शिव
रवींद्र सिंह भाटी (भाजप) - शिव
लाल बैरवा (काँग्रेस) - बसेडी
जौहरीलाल मीना (काँग्रेस) - राजगड-लक्ष्मणगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.