अर्थसंकल्पी अधिवेशन
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) बांधिलकी पाहून विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे नियुक्ती केली जात असल्याचा उल्लेख विरोधी पक्षाच्या सदस्याने केल्याने राज्यसभेत गोंधळ उडाला. अखेर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. सभापती जगदीप धनकड यांनी मात्र रा. स्व. संघाच्या उल्लेखाचे जोरदारपणे समर्थन केले व देशाच्या उभारणीत संघाचे अतुलनीय योगदान असल्याचा दावा केला.
नॅशनल टेस्टिंग एजेंसीद्वारे (एनटीए) परीक्षाचे संचालन योग्यरितीने केले जात नसल्याचा मूळ प्रश्न आज राज्यसभेत चर्चेला आला होता. या प्रश्नावर पुरवणी प्रश्न विचारताना समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे नियुक्ती करताना व्यक्तींची पार्श्वभूमीवर पाहिली जाते. ‘आरएसएस’शी बांधिलकी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती केली जात असल्याचा आरोप केला. या उल्लेखाला सत्तारुढ पक्षाच्या सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला व गोंधळाला सुरूवात झाली.
समाजवादी पक्षाचे खासदार वक्तव्यावर ठाम होते. आपले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून असल्याचा दावा ते करीत होते. समाजवादी पक्षाच्या सदस्यांच्या या वक्तव्याचे काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी लगेच समर्थन केले. काँग्रेसचे जयराम रमेश, प्रमोद तिवारी, नासीर हुसेन, इमरान प्रतापगडी, मुकुल वासनिक, शक्तीसिंग गोहिल, रजनी पाटील यांनी उभे राहून समाजवादी पक्षाच्या सदस्यांचे समर्थन करू लागले. सभापती धनकड यांनी ‘सप’ सदस्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला. हे वक्तव्य निराधार असून सभागृहाच्या कामकाजाचे भाग होऊ शकत नाही, असा दावा करीत होते.
विरोधी पक्षाच्या सदस्यांचा बहिष्कार
सभापती जगदीप धनकड विरोधकांच्या समर्थनाच्या वक्तव्याला सहमती दर्शवित नव्हते. ते म्हणाले की संघ ही संघटना देशाच्या उभारणीत अग्रणी असलेली संस्था आहे. संघटनेच्या कामकाजात भाग घेणे हा त्या संघटनेचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे. ज्या तऱ्हेने ही संघटना काम करीत आहे. त्याबद्दल प्रत्येकाने अभिमान राखायला पाहिजे.,सभापती धनकड यांचे हे वक्तव्य सुरू असताना काँग्रेस, आप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, टीएमसीचे सदस्य जोरदारपणे घोषणा देत होते. अखेर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
‘काँग्रेसला अनुकूल वातावरण’
‘‘लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आत्ममग्न आणि अति आत्मविश्वास बाळगण्याची गरज नाही. काँग्रेसची गती कायम राखण्यासाठी जिंकण्याच्या भावनेने काम करावे लागेल,’’ अशा शब्दांत काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधींनी स्वपक्षीय नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. संसद अधिवेशनादरम्यान कॉंग्रेस संसदीय पक्षाची बैठक सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली आज संसद भवन परिसरात झाली. पक्षाध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार या बैठकीस उपस्थित होते. येत्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाना या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू- काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी नेत्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले.
भाजपचा संघ हाच आधार
कावड यात्रा आणि यात्रेच्या मार्गातील दुकानदारांना नावे लिहिण्याची केलेली सक्ती, त्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप यावरून सोनिया गांधी म्हणाल्या, ‘‘लोकसभा निवडणुकीतील मोठ्या धक्क्यातून मोदी सरकार योग्य धडा घेईल असे वाटले होते. परंतु त्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या समुदायांमध्ये फूट पाडण्याचे, भय दाखविण्याचे विभाजनवादी धोरण सुरूच ठेवले आहे. सुदैवाने न्यायालयाने वेळेवर हस्तक्षेप केला. आता संघाच्या कार्यक्रमामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागाची परवानगी देण्यासाठी नियम बदलले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपचा राजकीय व वैचारिक आधार आहे हे जगाला माहिती आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.