जयपूर - सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारातही विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळे ‘क्रिकेट फीवर’ स्पष्टपणे जाणवू लागला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दिवशी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील चुरू आणि झुनझुनू या जिल्ह्यांत प्रचारसभांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी क्रिकेटमधील काही उदाहरणे देऊन राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षावर टीका केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘राज्यातील काँग्रेस नेते पाच वर्षे एकमेकांना ‘रन आउट’ करत राहिले. उरलेले नेते महिलांच्या तसेच अन्य मुद्द्यांवरून टीका करत ‘हीट विकेट’ झाले. तर बाकीचे नेते लाच घेत ‘मॅच फिक्स’ करत राहिले.’’ निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांबाबत बोलताना ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाची टीमच इतकी खराब आहे, की ते रन करू शकणार नाहीत आणि तुम्हाला दिलेली आश्वासनेही पूर्ण करू शकणार नाहीत.’
काँग्रेसने राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार पसरवला असल्याचे सांगत ते म्हणाले, ‘राज्यात ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल, त्यावेळी या भ्रष्टाचारी लोकांना ‘आउट’ करेल; तसेच राज्याच्या विकासाचा ‘स्कोअर’ निश्चितपणे वाढवेल. यामुळे राज्यातील शेतकरी, महिला आणि युवक ‘जिंकणार’ आहेत.’
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी राज्यात वाढविलेल्या दौऱ्यांवरून काँग्रेसने टीका केली होती. त्यावर बोलताना मोदी म्हणाले, ‘आम्ही झुनझुनूचे सुपुत्र असणाऱ्या जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपती केले. ही गोष्ट काँग्रेसला सहन होत नाही. ते इथे आलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना चालत नाही.’ कोणी आपल्या कुटुंबाला, नातेवाइकांना भेटण्यासाठी येऊ शकत नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.
‘शेखावटी’ भागातील नागरिकांनी देशभरात अनेक उद्योगधंद्यांची स्थापना केल्याचे सांगत, परोपकार हा या भागातील नागरिकांचा गुणधर्म असल्याचे त्यांनी सांगितले. याच परंपरेला आपला देश सध्या पुढे नेत असल्याचेही ते म्हणाले.
...असे सरकार जायलाच हवे
राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याचे सांगून येथील एक मंत्री महिलांवरील अत्याचाराला योग्य ठरवत असल्याचे सांगत मोदी यांनी मंत्री शांती धारिवाल यांच्यावर निशाणा साधला. अशाप्रकारे पुरुषांचा आणि महिलांचा अपमान करणारे काँग्रेस सरकार सत्तेवरून जायलाच हवे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
लाल डायरीची पाने हळूहळू उघडली जात आहेत. जसजशी या डायरीची पाने उघडली जात आहेत, तसतसा मुख्यमंत्री गेहलोत यांचा ‘फ्यूज’ उडत आहे. त्यांची जादुगारी डायरीच्या पानापानांत दिसून येत आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.