तिरुअनंतपुरम : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर करत शशी थरूर यांनी उमेदवारी अर्ज सादर करण्यामागे वेगळे राजकारण दडले आहे. पक्षात नवा जोश भरत सत्तेचे विकेंद्रीकरण करून युवकांना पक्ष कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जेव्हा थरूर यांनी अर्ज भरला होता तेव्हा त्यांच्या राज्यातील म्हणजेच केरळमधील काँग्रेस नेत्यांनी त्यांना विरोध करत सोनिया आणि राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शविण्यातच धन्यता मानली होती. त्यामुळे थरूर यांचा उदय हा पक्षीय परंपरेच्या बदलाची नांदी ठरेल का? याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्व राजकीय विश्लेषक आणि अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
थरूर यांनी जेव्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा प्रकट केली तेव्हा खऱ्या अर्थाने गेली अनेक दशके काँग्रेसपक्षात संपुष्टात आलेल्या, पक्षांतर्गत लोकशाहीचे पुनरुज्जीवन झाले होते, असे म्हणायला हरकत नाही. कारण यापूर्वी काँग्रेसच्या जिल्हा समित्यांपासून प्रदेश समितीपर्यंत सर्व पदांवर वरिष्ठ पातळीवरूनच नेमणुका होत असत.
त्यामुळे थरूर यांची राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्याची इच्छा ही पक्षातील वैचारिक प्रक्रियेचे पुनरुत्थानच म्हणावे लागेल. थरूर यांनी पक्षांतर्गत लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी दहा कलमी कार्यक्रम तयार केला आहे. थरूर यांची उमेदवारी ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील महत्त्वाची ठरणार आहे. हिंदी भाषकांची मने बदलाच्या बाजूने कौल देत थरूर यांच्याकडे झुकतात का? ते मोदींना आव्हान ठरतील का? हे देखील आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
निर्णय प्रक्रिया बदलण्यावर भर
राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून या पदावर कोण विराजमान होणार आणि पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे आव्हान कोण स्वीकारणार? याबाबत मोठी उत्सुकता आहे. थरूर यांनी पक्षात सर्वच स्तरांत सत्तेचे विकेंद्रीकरण केले जाईल, असे सांगत काही अंशी ही उत्सुकता शमविण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या गुणसूत्रातच गांधी- नेहरू घराण्याविषयीची निष्ठा असली तरी लोकशाहीवादी पक्षात काही बदल केले जातील असे सांगायलाही थरूर विसरले नाहीत. एकेकाळी काँग्रेस पक्षात अगदी कनिष्ठ पातळीवर देखील निर्णय घेण्याचे अधिकार होते, परंतु आता सर्व उलट झाले आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता त्याचे प्रश्न घेऊन काँग्रेस अध्यक्षांकडे जाऊ शकत नाही. तर त्यांच्या भोवतीचे ठराविक नेत्यांचे कोंडाळे सर्व निर्णय घेते. ही पद्धत बदलायला हवी असेही थरूर यांनी स्पष्ट केले आहे.
अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला
‘काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आलो तर, पक्षातील सर्वस्तरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील.’ असे प्रतिपादन थरूर यांनी केले आहे. मी जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता तेव्हा मला इतका विरोध झाला होता की, मला दहा मते मिळतील की नाही याची शाश्वती नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलेली असून, मला अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मी २०१४ पासून पक्षात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे थरूर यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा माझ्यावर दबाव आणला नाही. ही काही सौंदर्यस्पर्धा नाही. मी लोकांसमोर चर्चेसाठी एक विचारधारा ठेवत आहे. संघटनात्मक निवडणुका या पक्षांतर्गत लोकशाही टिकविण्यासाठी घेतल्या जातात. पूर्वी पक्षात प्रांतीय समित्या असत आणि अगदी स्थानिक पातळीपासून निर्णय घेतले जात असत ही पद्धती पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.
- शशी थरूर, काँग्रेसचे नेते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.