या निवडणुकीत गांधी कुटुंबातील एकही सदस्य उभा राहणार नाहीय.
Congress President Election 2022 : काँग्रेस पक्षाला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेतून नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच, 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीत गांधी कुटुंबातील (Gandhi Family) एकही सदस्य उभा राहणार नाहीय, असे संकेत खुद्द माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच दिले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, ती 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
आता ह्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज कसा भरायचा आणि निवडणुकीत कोण उतरणार, हा प्रश्न आहे. यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे, उमेदवार हा पक्षाचा प्राथमिक सदस्य असावा. एवढंच नाही तर त्यांना काँग्रेसच्या 10 लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवून उमेदवारी देण्यासाठी त्यांची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे. त्यांनी ही पात्रता पूर्ण केल्यास, त्या नेत्याचा उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर असेल. या निवडणूक प्रक्रियेबद्दल बोलायचं झाल्यास, एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. याच निवडणूक प्रक्रियेतून आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची काँग्रेसची ही योजना आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आहेत. या यादीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय, काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरूर हेही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. अलीकडंच त्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. त्याचबरोबर या यादीत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे शिल्पकार दिग्विजय सिंह यांचंही नाव चर्चेत आहे. त्यांनी गुरुवारी सोनिया गांधींची भेट घेतली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.