झाले गेले विसरा पक्षासाठी एकत्र या; सोनियांनी घातली भावनिक साद

Sonia-Gandhi
Sonia-Gandhi
Updated on

नवी दिल्ली - काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे निर्माण झालेला अंतर्गत वाद मिटविण्यासाठी आज खुद्द ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी मैदानात उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर ही नेते मंडळी नाराज होती. झाले गेले विसरून जा, पक्षाच्या मजबुतीसाठी एकत्र येऊन काम करा, अशी भावनिक साद सोनियांनी या नेते मंडळींना घातली. दैनंदिन घडामोडींवर पक्षातर्फे भूमिका मांडण्यासाठी संसदीय मंडळाची स्थापना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

विशेष म्हणजे आजच्या या बैठकीपासून राहुल ब्रिगेडला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. राहुल समर्थक रणदीप सुरजेवाला, संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि राजीव सातव यांना आजच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. या बैठकीत नेतृत्व बदलाबाबत लगेच निर्णय झाला नसला तरी चिंतन शिबिर घेणे, पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत ज्येष्ठांच्या सूचनांचे विश्लेषण करणे यावर सहमती झाली. यानंतरही पक्षात अशाच बैठकांचे सत्र सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या नेत्यांची उपस्थिती
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आजारपणाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा सक्रिय झाल्या. वरिष्ठ नेत्यांची त्यांनी १०- जनपथ या निवासस्थानी बैठक बोलाविली होती. एकूण १९ नेते या बैठकीस हजर होते. यात राहुल गांधी, प्रियांका गांधी, ए. के. अँटोनी यांच्यासह राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मनीष तिवारी, शशी थरूर, विवेक तनखा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अजय माकन, कमलनाथ, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासारख्या ‘जी-२३’ या गटातील प्रमुख नेत्यांचाही समावेश होता.   

खुली चर्चा झाल्याचा दावा
पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर, झाले गेले विसरून पुन्हा नव्या जोमाने पक्षकार्यासाठी एकत्र येण्याची साद घालणारी सोनिया गांधींची आजची बैठक होती. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीनंतर खजिनदार पवनकुमार बन्सल, सरचिटणीस हरिश रावत आणि जी-२३ गटातील नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांना सामोरे जात सौहार्दपूर्ण वातावरणात पक्ष मजबुतीसाठी खुली चर्चा झाल्याचे सांगितले. नेतृत्वबदलाचा कोणताही मुद्दा बैठकीत उपस्थित झाला नसल्याचेही या नेत्यांनी स्पष्ट केले. 

पक्ष हा एक कुटुंब - सोनिया
या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधीनीही मत मांडले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सोनिया गांधींनी काँग्रेस हे एकत्र कुटुंब असून सर्वांनी पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करावे, असे भावनिक आवाहन केले तर राहुल गांधींनीही याच धर्तीवर आवाहन करताना आपल्यासाठी पद नव्हे तर पक्ष बळकट होणे महत्त्वाचे आहे, असे मतप्रदर्शन केले. संघटना, पक्षापुढील आव्हाने आणि पुढील वाटचाल यासाख्या घडामोडींवर व्यापक चर्चेसाठी मनीष तिवारी यांनी चिंतन शिबिर घेण्याची मागणी केली. या मागणीला अन्य नेत्यांकडून पाठिंबा मिळाला. 

कार्यकारिणीच्या बैठकांची मागणी
संघटना बळकटीसाठी सरचिटणीस, प्रभारींना दिल्लीऐवजी राज्यांमध्ये थांबण्यास सांगितले जावे, असे आझाद यांचे म्हणणे होते. परंतु, यावरून परस्पर विरोधी मते पुढे आली. नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी कार्यालयांमध्ये कायमस्वरुपी व्यवस्था असावी. संघटनात्मक निवडणूक आवश्यक असून तसे न झाल्यास नेतृत्वावर अकारण दोष येत असल्याचेही काही नेत्यांचे म्हणणे होते.  कार्यकारिणीच्या बैठकांचे प्रमाण वाढविण्याची मागणीही यावेळी झाल्याचे कळते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.