इंफाळ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला उद्यापासून (ता.१४) मणिपूरमधून प्रारंभ होतो आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच राहुल हे थेट पुन्हा जनतेच्या दारात जात असल्याने काँग्रेसने यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते.
या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आणि सामाजिक न्याय हे मुद्द लावून धरण्यात येतील. राहुल यांच्या या दुसऱ्या टप्प्यातील न्याय यात्रेचा पंधरा राज्यांतून प्रवास होईल तसेच शंभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ते थेट लोकांशी संवाद साधतील.
केंद्र सरकार आम्हाला संसदेमध्ये बोलू देत नाही त्यामुळे आम्ही थेट लोकांमध्ये जाऊन बाजू मांडत आहोत, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले. सामाजिक न्याय, उदारमतवाद, समता आणि बंधुत्व या राज्यघटनेत उल्लेख करण्यात आलेल्या मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी ही यात्रा सुरू करण्यात आली असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
या यात्रेमागे कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. एकीकडे २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने देशभर आक्रमक प्रचार सुरू केला असतानाच काँग्रेसने मात्र सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या रोजी-रोटीच्या प्रश्नावर आक्रमक लढा उभारण्याचे संकेत दिले आहेत.
मात्र यात्रेच्या आदल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सुरुवातीचं ठिकाण बदललं अशी माहिती समोर येत आहे. मणिपूर मधील इंफाळ ऐवजी यात्रा थौबुल मधून सुरू होणार असल्याच सांगितलं जात आहे.
पोलिस प्रशासनाने या यात्रेसाठी फक्त 1 हजार लोकांना परवानगी दिली होती मात्र यात्रेला जास्त लोक येणार असल्याने ठिकाण बदलण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे. आता इंफाळ पासून 34 किमी दूर असलेल्या थौबुल या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.