Narendra Modi : आर्थिक अराजकतेसाठी काँग्रेस प्रयत्नशील;लोकसभेत मोदींचा घणाघात

देश विकासाच्या मार्गावर निघाला असताना सहा दशके सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष अराजकता पसरवत आहे. देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याचा योजनाबद्ध प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे,’
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘देश विकासाच्या मार्गावर निघाला असताना सहा दशके सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष अराजकता पसरवत आहे. देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याचा योजनाबद्ध प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे,’’ असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेमध्ये केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवरील मोदींच्या उत्तरानंतर राष्ट्रपतींचे आभार मानणारा धन्यवाद प्रस्ताव लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने संमत करण्यात आला. यानंतर लगेचच लोकसभाध्यक्षांनी सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.

संसदेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणानंतर त्यांचे आभार मानण्यासाठीच्या प्रस्तावाला पंतप्रधान मोदींनी आज उत्तर दिले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. त्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीही झाली होती. आज पंतप्रधान मोदींच्या उत्तरादरम्यान कालच्याच गोंधळाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसले. पंतप्रधानांच्या उत्तराआधी आधी मणिपूरच्या खासदारांना बोलू द्यावे, असा विरोधकांचा आग्रह लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाकारल्याने विरोधी पक्षांच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींचे उत्तर सुरू होताच अध्यक्षांपुढील हौद्यात उतरून ठाण मांडले आणि घोषणाबाजी सुरू केली.

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या खासदारांना गोंधळासाठी हौद्यात पाठविल्याचा ठपका ठेवून पीठासीन अधिकाऱ्यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करताना राहुल गांधींची कानउघाडणीही केली. मात्र, पंतप्रधानांच्या आसनाजवळ येऊन काँग्रेस खासदारांनी सुरू केलेली आक्रमक घोषणाबाजी त्यांचे दोन तास १६ मिनिटांचे भाषण संपेपर्यंत सुरूच राहिली. ‘मणिपूर को न्याय दो’, ‘वुई वॉन्ट जस्टीस’ यासारख्या विरोधकांच्या घोषणांमुळे मोदींच्या भाषणाची लय सुरवातीची चाळीस मिनिटे संथ असल्याचे दिसले.

त्यानंतर मात्र पंतप्रधानांनी राजकीय हल्ले सुरू करताच सत्ताधारी बाकांवर उत्साह संचारला. संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदींनी प्रामुख्याने कॉंग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे आर्थिक निर्णय अराजकता वाढविणारे असून ही राज्ये देशावर आर्थिक भार बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा करणाऱ्या मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे थेट नाव न घेता ‘बालकबुद्धी’ अशी खिल्ली उडवली. तसेच, देशात हिंदूंना हिंसक ठरविण्याचे आरोप देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले.

‘काँग्रेसकडून वादांची निर्मिती’

उत्तर विरुद्ध दक्षिण, पूर्व विरुद्ध पश्चिम असा वाद निर्माण करून, महापुरूषांविरुद्ध बोलून भाषेचा वाद निर्माण करून अराजकता पसरविली जात आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान केला.‘‘देशाच्या विभाजनाबद्दल बोलणाऱ्यांना उमेदवारी देणारा काँग्रेस पक्ष एका जातीला दुसऱ्या जातीशी लढविण्यासाठी नवनवीन कथन तयार करत आहे. चार जूनला निवडणूक निकालानंतर देशात आग लागेल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले होते. त्याआधीही ‘सीएए’वरून दिशाभूल करण्यात आली. देशात दंगल भडकविण्याचे प्रयत्न झाले. आता सहानुभूती मिळविण्यासाठी नाटक केले जात आहे,’’ असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.