Constitution : ‘संविधान बचाव’वरून विरोधी पक्ष आक्रमक; पहिल्याच दिवशी विरोधकांची घोषणाबाजी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राज्यघटना वाचविण्यावरून विरोधकांनी सुरू केलेला सरकारवरील हल्ला अठरावी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतरही कायम राहिल्याचे आज स्पष्ट झाले.
Constitution
Constitutionsakal
Updated on

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राज्यघटना वाचविण्यावरून विरोधकांनी सुरू केलेला सरकारवरील हल्ला अठरावी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतरही कायम राहिल्याचे आज स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांत आधी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी राज्यघटनेची प्रत हातात धरून ‘राज्यघटना बचाओ’ची घोषणा दिली.

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले. यापूर्वी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते भर्तुहरी महताब यांना सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्रिमंडळातील इतर ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.राष्ट्रपतींनी हंगामी सदस्यांच्या पॅनेलवर काँग्रेसचे के. सुरेश, ‘द्रमुक’चे टी. आर. बालू, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय व भाजपचे राधामोहन सिंह व फग्गनसिंह कुलस्ते यांच्या नावांना मंजुरी दिली.

सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर हंगामी अध्यक्ष भर्तुहरी महताब यांनी राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाच्या खासदारकीचा दिलेला राजीनामा गेल्या १८ जूनला मंजूर केल्याचे स्पष्ट केले. यानंतर लोकसभेचे महासचिव उत्पलकुमार सिंह यांनी नवनिर्वाचित सदस्यांची यादी पटलावर ठेवली. यानंतर काँग्रेसचे के. सुरेश यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु हंगामी अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ घेण्यासाठी पाचारण केले.

बहिष्काराने सुरुवात

हंगामी अध्यक्षांच्या पॅनेलवर असलेल्या तीन सदस्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यास नकार दिला. भर्तुहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केल्याच्या निषेधार्थ के. सुरेश, टी. आर. बालू व सुदीप बंदोपाध्याय यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. या पॅनेलवर असलेल्या राधामोहनसिंह व फग्गनसिंह कुलस्ते या दोन भाजपच्या नेत्यांनी मात्र लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

प्रधान यांच्या शपथेवेळी घोषणा

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उडिया भाषेतून शपथ घेतली. ‘नीट’ परीक्षेवरून गोंधळ उडालेला असल्याने ते शपथ घ्यायला जात असताना विरोधी सदस्य नीट, नीट अशा घोषणा देत होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर अंदमान व निकोबारच्या सदस्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश अशा क्रमाने अन्य राज्यांतील सदस्यांनी शपथ घेतली.

पहिल्या रांगेत अवधेश प्रसाद

विरोधी पक्षांसाठी असलेल्या आसन व्यवस्थेमध्ये आज पहिल्या रांगेत राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह फैजाबाद (अयोध्या) येथून जिंकून आलेले समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद बसलेले होते. फैजाबादमध्ये भाजपच्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव करून अवधेश प्रसाद प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

‘जय श्रीराम’च्या घोषणा नाही

आज पंतप्रधान मोदी यांचे सभागृहात आगमन झाले तेव्हा भारत माता की जय, मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. परंतु प्रत्येकवेळी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. आज मात्र जय श्रीरामच्या घोषणा भाजपच्या सदस्यांनी दिल्या नाहीत.

पंतप्रधानांकडून असेही अभिवादन

पंतप्रधान लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर अध्यक्षांची भेट घेऊन विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या आसनाजवळ जाऊन अभिवादन करतात. परंतु यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या परंपरेला फाटा दिला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर हंगामी अध्यक्षांना नमस्कार केला. तिथूनच विरोधी पक्षांच्या आसनाकडे दोन्ही हात जोडून अभिवादन केले. विरोधी पक्षांचे सदस्य राहुल गांधी, अखिलेश यादव, कल्याण बॅनर्जी यांच्यासह इतर सदस्यांनीसुद्धा हात जोडून पंतप्रधानांना अभिवादन केले.

घटनेची प्रत दाखवून निषेध

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा सदस्य म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. आज त्यांनी हिंदीतून शपथ घेतली. पंतप्रधान शपथ घेत असताना विरोधी पक्षांचे सदस्य राज्यघटनेची प्रत दाखवून निषेध व्यक्त करीत होते. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तेव्हा सुद्धा विरोधकांनी राज्यघटनेची प्रत दाखवून निषेध नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.