लखनऊ - गेल्या सहा महिन्यांपासून जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्ण सापडताच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केली जाते. त्याशिवाय संबंधित व्यक्ती ज्या परिसरात राहते तो परिसर सील करण्यात येतो. अद्याप कोरोनावर औषध आलेले नाही. त्यामुळे यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मेरठ इथं एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. खासगी रुग्णालयाच्या मालकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती केवळ अडीच हजार रुपयात कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह मिळण्याचा व्यवहार करत आहे.जिल्हा रुग्णालयातून हा रिपोर्ट देण्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. शाह आलम नावाच्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह मिळावा यासाठी पैशांचा व्यवहार करत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर मेरठच्या जिल्हा अधिष्ठात्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजकुमार म्हणाले की, या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. कोरोनाचा खोटा रिपोर्ट देण्याचं आश्वासन हॉस्पिटल मॅनेजर शाह आलम देत असल्याचं दिसतं. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक बोलताना दिसत आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे ते विनंती करतात की जिल्हा रुग्णालयातून कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह द्या. ज्यामुळे किमान आठवडाभर काही त्रास होणार नाही. याच व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती दोन हजार रुपये हॉस्पिटल मॅनेजरकडे देत असल्याचं दिसतं. तसंच उरलेले 500 रुपये कोरोनाचा रिपोर्ट मिळाल्यानंतर देऊ असंही सांगण्यात येतं.
मेरठमध्ये कोरोनाचे एकूण 1117 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 69 जणांचा म-त्यू झाला असून 772 जण बरे होऊन घरी परतले आहेत. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 28 हजार 61 रुग्ण सापडले असून 785 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18761 जण बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 6 लाख 97 हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 4 लाख 24 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दर देशात कमी असून आतापर्यंत 19 हजार 693 जणांचा मृ्त्यू झाला आहे. जगात कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.