Crime News : अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई; देशात रोख रकमांसह साडे चार हजार कोटींची जप्ती

मागील ७० वर्षांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रमाणातील जप्तीची कारवाई या निवडणुकीपूर्वी करण्यात आलेली आहे.
drugs
drugssakal
Updated on

नवी दिल्ली - देशभरात सध्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मागील ७० वर्षांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रमाणातील जप्तीची कारवाई या निवडणुकीपूर्वी करण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी बेकायदा मार्गांचा वापर करणाऱ्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वीच ठिकठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये चार हजार ६५० कोटी रुपये किमतीची जप्ती केली आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम, अमलीपदार्थ, मौल्यवान वस्तू आणि मतदारांना वाटण्यासाठीच्या मोफत वस्तूंचा समावेश आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जप्त करण्यात आलेल्या एकंदर तीन हजार ४७५ कोटी रुपयांच्या तुलनेत यावेळी जप्तीच्या रकमेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच आयोगाने केलेल्या जप्तीमध्ये ४५ टक्के अमलीपदार्थ आहेत.

सर्वसमावेशक नियोजन, विविध सरकारी संस्थांदरम्यान सहकार्य, एकीकृत प्रतिबंधक कारवाई, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई शक्य झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

देशाच्या विशिष्ट भागांमध्ये राजकीय निधीशिवाय मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा होणारा वापर, यामुळे निवडणुकीची लढत बहुतांश संपन्न राजकीय पक्ष किंवा उमेदवारांसाठी अनुकूल होते. त्यामुळे निवडणुकीमध्ये समान संधी राहत नाही. निवडणूक प्रक्रिया प्रलोभनेमुक्त व चुकीच्या पद्धतींपासून मुक्त वातावरणात निष्पक्षपणे व्हावी यासाठी देशभरात विविध ठिकाणी आयोगाकडून नेमण्यात आलेल्या पथकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

या लोकसभा निवडणुकीत वाढीव प्रमाणात झालेली जप्ती, विशेष करून छोट्या तसेच कमी साधनसंपत्ती असलेल्या राजकीय पक्षांना समान संधी देण्यासाठी प्रलोभनांवर लक्ष ठेवणे आणि निवडणुकीत होऊ शकणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

राजस्थान अग्रेसर

या कारवाईत सर्वाधिक मोठी कारवाई राजस्थानमध्ये करण्यात आली असून या राज्यात ७७८ कोटी रुपये किमतीच्या वस्तू किंवा अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर गुजरात राज्यातही ६०५ कोटी रुपयांची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून महाराष्ट्रात या कारवाईतून ४३१ कोटी रुपयांचे पदार्थ व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही कारवाई

या कारवाईत महाराष्ट्रातही ४३१ कोटी रुपये किमतीची रोख रक्कम आणि अमलीपदार्थांची जप्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात झालेल्या कारवाईत ४० कोटी पाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात ३५ लाख ५६ हजार लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला असून या साठ्याची बाजारातील किंमत २८ कोटी ४६ लाख एवढी आहे. त्याचप्रमाणे २१३ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय ६९ कोटी ३८ लाख रुपयांचे सोने किंवा मौल्यवान वस्तू तसेच ७९ कोटी ८७ लाख रुपयांच्या मतदारांना आमिष दाखविण्यासाठी साठा केलेल्या वस्तूही महाराष्ट्रातून जप्त करण्यात आल्या आहेत.

अशी सुरू कारवाई

  • पूर्वनियोजित नसलेल्या विमानांची तसेच हेलिकॉप्टरची प्राप्तिकर विभाग, विमानतळ अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलिस अधिक्षक यांच्यातर्फे तपासणी

  • आंतरराष्ट्रीय चेकपोस्टवर बारकाईने लक्ष

  • गोदामे, विशेषतः मोफत वस्तूंसाठी वापरण्यात येणारी गोदामे यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी जीएसटी अधिकारी यांची नियुक्ती

  • देशभरात विविध मार्गांवर तपास चौक्या आणि तपास नाके,

  • सागरतटीय मार्गांसाठी तटरक्षक दलाचे जवान आणि डीएम्स आणि एसपीजी तैनात

  • पूर्वनियोजित नसलेल्या विमानांच्या तसेच हेलिकॉप्टरच्या तपासणीसह हवाई मार्गांनी होणाऱ्या वाहतुकीच्या तपासणीसाठी संस्थाना सूचना

  • बहुआयामी देखरेख प्रणालीचा अवलंब करण्यावर अधिक भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()