रेमल चक्रीवादळ ईशान्येत कमकुवत होऊ लागले असले तरी तिकडच्या राज्यांतील अनेक ठिकाणे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उध्वस्त झाली आहेत. बुधवारपर्यंत, आपत्तीमध्ये 36 लोकांचा मृत्यू झाला, तर 10 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.
बाधित भागात रस्ते आणि रेल्वे संपर्कात गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून, दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रेमल चक्रीवादळाचा मिझोरामला सर्वात जास्त फटका बसला, जिथे 29 लोकांचा मृत्यू झाला, त्यात ऐझॉल जिल्ह्यातील खाण कोसळून झालेल्या कामगारांच्या मृत्यूंचाही समावेश आहे.
नागालँडमध्ये चार, आसाममध्ये तीन आणि मेघालयमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.
वादळी वाऱ्यासह संततधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांव्यतिरिक्त, झाडे उन्मळून पडली आणि वीज आणि इंटरनेट सारख्या अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या.
त्रिपुरामध्ये गेल्या २४ तासांत ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असताना जोरदार पाऊस झाला. सुमारे 470 घरांचे नुकसान झाले असून 750 लोक बेघर झाले आहेत.
ईशान्येकडील राज्यांसाठी हवामानाचा अंदाज गंभीर श्रेणीत कायम आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये संपूर्ण आठवडाभर जोरदार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. त्याचबरोबर आसाम आणि मेघालयसाठी 2 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रेमल चक्रीवादळामुळे आसाममधील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चक्रीवादळामुळे आठ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 41,000 हून अधिक लोक प्रभावित झाले.
करीमगंज जिल्ह्यात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असून, मंगळवारपासून मृतांची संख्या पाच झाली आहे. त्याचवेळी कचार जिल्ह्यातून दोन जण बेपत्ता झाले आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या आपत्कालीन काळात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी नऊ जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी रेमल चक्रीवादळामुळे प्रभावित दक्षिण 24 परगणा भागातील क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण केले. आदर्श आचारसंहिता उठल्यानंतर नुकसानभरपाईचा विचार करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. चक्रीवादळामुळे येथे सात जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.